३ लंडन
१३ नोव्हेंबर, १९६४
मुंबईहून निघाल्यानंतर जवळ जवळ साडेचौदा ते पंधरा तासांनी लंडनला पोहोचलो. मुंबईचे दुसऱ्या दिवसाचे ३॥ वाजले होते तेव्हा आम्ही लंडन-विमानतळावर पोहोचलो.
बहरिन, कैरो, रोम, पॅरिस, लंडन असा हा प्रवास झाला. ही सर्व्हिस फार स्टेशने घेत घेत पोहोचते व त्यामुळे काहीसा कंटाळवाणा प्रवास शेवटी शेवटी वाटू लागतो.
सर्व विमानतळ सारखे दिसू लागतात. जसे लांबच्या रेल्वे प्रवासात सर्वच मोठया स्टेशनांवरील वातावरण एकसारखे वाटू लागते तसे. मोठया शहरांची फक्त नावे ऐकावयाची.
डॉ. जिवराजभाई मेहता, सौ. हंसा मेहता यांनी तुला घेऊन मी का आलो नाही असा घरी पोहोचताच मोठा अवघड प्रश्न विचारला.
हवामानाच्या दृष्टीने नोव्हेंबर महिना येथे बराच गैरसोयीचा आहे. घरामध्ये असताना खिडक्या दारे बंद करून गरम हवेची व्यवस्था करतात. घराच्या बाहेर पाऊल ठेवताच झोंबणारे गार वारे व थंडी जीव घाबरवून टाकतात.
गेले दोन दिवस सरकारी गाठी-भेटीत आणि चर्चेत गेले. नवीन (मजूरपक्षाचे) मंत्रिमंडळ उत्साहाने व जोमाने त्यांच्या कठीण प्रश्नांना तोंड देण्याचे कार्य करण्यात गुंतून गेले आहे.
मी ज्या दिवशी पोहोचलो त्याच दिवशी त्यांनी अपूर्व पध्दतीने नव्या करांची घोषणा करणारे बजेट मांडले. सर्व इंग्लंड त्याच गोष्टीची चर्चा करण्यात मश्गुल आहे.
इंग्लंडचे नवे मुख्य प्रधान श्री. विल्सन यांनी लोकमतावर चांगलाच प्रभाव पाडला आहे. स्वत:संबंधी खूपच नव्या अपेक्षा निर्माण केल्या आहेत.
या मंत्रिमंडळातील प्रमुख लोकांना मी गेल्या दोन दिवसांत भेटलो. मुख्य प्रधानांना आज भेटणार आहे. हिंदुस्थानसंबंधी मैत्रीचे भाव त्यांच्या बोलण्या-वागण्यात दिसून येतात; परंतु प्रत्यक्ष विशेष असे काही ते करतील असा विश्वास मात्र माझ्या मनात अजून त्यांनी निर्माण केलेला नाही.
मजूरपक्षीय असो वा हुजूरपक्षीय असो, पूर्वीच्या काळी ते हिंदुस्थानचे स्वामी होते ही भावना संपूर्णपणे अजून ते विसरू शकत नाहीत असे निदान मला तरी भासले. पाहूया! अजून एक आठवडाभर प्रयत्न करावयाचे आहेत. एकदम मत बनविणेही बरोबर होणार नाही.
प्रकृती बरी आहे. औषधे नियमाने घेत असतो. डॉ. जिवराजभाई लहान सहान गोष्टीतही माझी जातीने काळजी घेत असतात. त्यांच्या वागण्यातला जिव्हाळा हृदयस्पर्शी आहे.
काल रात्री लंडनच्या एका प्रसिध्द थिएटरमध्ये 'स्वानलेक' हा प्रसिध्द रशियन बॅले पाहिला. रशियात असताना ऍस्ट्राखानच्या गेस्टहाऊसमध्ये या बॅलेची आपण फिल्म पहिली होती. मला आठवते, तू मॉस्कोहून येताना या बॅलेच्या संगीताच्या रेकॉर्डस् मुद्दाम खरेदी केल्या आहेस.
रशियात असताना जे पाहू शकलो नाही ते लंडनमध्ये पाहू शकलो. कार्यक्रम फारच उत्कृष्ट झाला. तुम्हा सर्वांची प्रकृती चांगली असेल असा विश्वास आहे. तीर्थरूप आईस स. नमस्कार.
मी निघण्याचे वेळी तू बरीचशी नाराज होतीस. आता कसा आहे mood ?