• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

विदेश दर्शन - १५१

दुपारचे जेवण राजदूतांचे घरी झाले. आपल्या मालकीचे घर म्हणजे भारतभूमीचा एक तुकडाच इथे आहे. फार सुरेख जागा निवडली आहे. घर सुध्दा फारच सुंदर आहे. सर्वांच्या नजरेत भरण्याजोगे. महत्त्वाच्या लोकवस्तीत व महत्त्वाच्या रस्त्यावर. ज्याने कुणी ही निवड केली व बांधकाम करून घेतले असेल त्या राजदूताची नित्य आठवण येत राहील.

या जेवणास फक्त भारतीय होते. दूतावासांतील जोडपी, त्याचप्रमाणे येथे विश्वविद्यालय, यू. एन्. संस्था, व्यापार वगैरेमध्ये काम करणारी मंडळी होती. घरच्यासारखे मोकळे वातावरण होते. हिंदुस्थानसंबंधी त्यांना पुष्कळ ऐकावयाचे होते. मी त्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे देऊन एक छोटेसे भाषणही केले.

यावरून आठवण झाली. तुर्कस्थानचे सर्व वातावरण आधुनिक आहे. त्याचे उत्तम प्रतिक येथील स्त्री आहे. अतातुर्क केमालने देशच स्वतंत्र केला असे नव्हे, तर सामाजिक, सांस्कृतिक नवे युगच आणले. फक्त पडदाच काढला एवढे नव्हे, तर पोषाख, शिक्षण, सरमिसळ हिंडणे, फिरणे सर्व काही अगदी युरोपीय वातावरण दिसते.

त्यांनी अरबी लिपी टाकून लॅटिन लिपी घेतली आहे. कुटुंबसंस्थेचे लागेबांधे-ओढ-जिव्हाळा हे जुने संस्कार आजही मजबूत आहेत. मिसेस् चलयांजिल जेवणाच्या वेळी तिच्या जुजबी इंग्रजीमध्ये सांगत होती की तिला एकच मुलगी आहे. तिला चार नातवंडे आहेत. सुट्टीच्या निमित्ताने तिच्याकडे आली आहेत. तिच्या चेहेऱ्यावर जो आनंद दिसत होता तो पाहून कुणाचेही मन भरून गेले असते. भाषा अपुरी होती म्हणून की काय तिच्या चेहऱ्यावरील भाव - डोळयांतले वात्सल्य - हाताच्या खुणा हे सर्व काही सांगून गेले.

जेवण संपेपर्यंत या आमच्या चाललेल्या संभाषणातून एक गोष्ट पुन्हा पुन्हा माझ्या मनात येऊन गेली की, उत्तम भाषा जाणणारा, आपले विचार व भावना हुषारीने लपवू शकतो. एका अर्थाने भाषेचे ज्ञान, कौशल्य, अभिव्यक्तिसाठी की काही खुबीने राखून ठेवण्यासाठी? साहित्यसंमेलनात चर्चेसाठी घेण्यासारखा विषय आहे. दुपारी प्राईम मिनिस्टर डेमरेल यांना भेटलो. हुषार राजकारणी, Rightist आहे. करामती आहे. बोलण्याचा शोक आहे. ४५ मिनिटांच्या आमच्या बोलण्यात ३० मिनिटे तोच बोलत होता.

हिंदुस्थानमध्ये चालू असलेल्या इमर्जन्सीबाबत अनुकूल बोलत होता. कोर्टस् कशा अडचणी निर्माण करतात आणि त्यामुळे शिस्त, स्थैर्य राखणे कसे अवघड जाते वगैरे.

आर्थिक प्रगतीच्या पहिल्या दुसऱ्या टप्प्यावर असणाऱ्या देशांमध्ये लोकशाही संस्था टिकविणे हे महान् कठीण होत चालले आहे. त्यांच्या संविधानामध्ये इमर्जन्सी जाहीर करण्याची सोय नाही अशी बारीकशी तक्रारही केली. श्रीमती गांधींना मुक्तकंठाने पाठिंबा देत होता.

मी त्यांच्या काही गैरसमजुती दूर केल्या. संविधानाप्रमाणे आमची इमर्जन्सी तात्पुरती आहे. आम्ही फ्रेंच संविधानाच्या धर्तीवर जाण्याची शक्यता नाही. लोकशाही संस्था टिकविण्यासाठीच आम्हाला इमर्जन्सीचा वापर करावा लागला. अर्थात् त्याचा परिणाम अनेक क्षेत्रांत चांगला दिसून येत आहे.