१० लाख वस्तीचे हे शहर विस्तृत पसरले आहे. नवे विभाग आधुनिक बनत आहेत. जुने काबूल तसेच जुने आहे. संध्याकाळी 'खैबर सूट' मधून काबूल शहर पाहिले. एक विलक्षण शांत-सुंदर, मनोहारी दृश्य दिसते.
भारतीय क्लासिकल संगीत येथे लोकप्रिय आहे. आपल्यासारख्या बैठकी येथे रंगतात. अफगाण गायक श्री. सारंग यांचे गायन, मी आलो त्या रात्रीचे जेवणानंतर विदेश-मंत्रालयाने ठेवले होते. बडे गुलाम अलीची आठवण झाली, सुरावट तीच. आरोह-अवरोहाचे नखरे तेच. देहयष्टीही तशीच.
अफगाण तरुण तबलजी तर मला पहिल्या प्रतीचा वाटला. भारतीय सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे श्री. देशपांडे म्हणून गायक येथे काही महिने राहण्यासाठी आले आहेत. त्यांचीही बैठक अशीच रंगली.
अफगाण-मंत्रिमंडळाचे सदस्य देशपांडे यांना फर्माइश देऊ लागले. कोणी म्हणाले, काफी-तराना म्हणा, कोणी म्हणाले मालकंस होऊ द्या तर कोणाचा आग्रह होता ठुमरीचा!
आज सकाळी सरकारी छोटया विमानाने 'बामियान' ला गेलो होतो. तेथे १५०० ते १६०० वर्षांपूर्वीचे भगवान बुध्दाचे दोन भव्य पुतळे डोंगरकपारीत कोरलेले आहेत सांस्कृतिक लेणे आहे. दोन मूर्ति आहेत. एक १५०-१६० फूट उंचीची व दुसरी असेल १०० फूट उंचीची.
त्या डोंगरकपारीत असंख्य लेणी आहेत. त्यांच्या समोरून बामियान नदीचे पात्र जाते. या दिवसात लहानसा प्रवाह आहे. नदीच्या अलीकडच्या तीरावरून लेणी असलेली डोंगर-भिंत पाहिली म्हणजे अजंठा-वेरुळची आठवण येते. काही गुहांमध्ये अजंठासारखी चित्रेही असली पाहिजेत याचा पुरावा दिसतो.
भारत-अफगाण-सरकारांच्या सहाय्याने हे अवशेष सुरक्षित राहिले पाहिजेत म्हणून गेले काही वर्षे तज्ज्ञांच्यामार्फत प्रयत्न चालू आहेत.
भारतीय टीमचे श्री. सेन आमच्याबरोबर होते. त्यांनी त्याचा सारा तपशील सांगितला.
उद्या काही करारनाम्यावर सह्या करण्याचा समारंभ होईल. नंतर या शहरातील काही ऐतिहासिक स्थळे पाहून तेहरानसाठी प्रस्थान ठेवीन.
मोंगल साम्राज्याचे संस्थापक बाबर यांची कबर येथे आहे. ती पाहणार आहे. अफगाणिस्तानच्या उत्तरेकडील विभागात राहणाऱ्या एका जमातीचे (Tribe) लोक उत्तम घोडेस्वार आहेत. ते अनेक धाडसी प्रयोग करतात. त्यांची येथे उत्सव-स्पर्धा आहे. तीही पाहणार आहे.
बामियानच्या खोऱ्यात चेंगिझखानाच्या क्रौर्याचे काही अवशेष पाहिले. बुध्द मूर्तीच्या खालच्या एका उंच टेकडीवर 'श्केर गुल्गुल्' म्हणून शहर होते.
चेंगिझखानाने त्या शहराचा संपूर्ण विध्वंस केला. स्त्री-पुरुष-मुले सर्वांचा संहार केला. आताही ते उद्ध्वस्त शहर या अमानुष क्रौर्याची साक्ष देत उभे आहे.
करुणेची मूर्ति भगवान बुध्दही उभे आहेत आणि चेंगिझखानचे क्रौर्यही शेजारीच उभे आहे. इतिहासात क्रौर्य आणि करूणा यांची जणू काही स्पर्धा चालू आहे. कुणाचा विजय होतो आहे? करूणेचा की क्रौर्याचा? मन कधी कधी साशंक होते. आजच्या जगाकडे पाहिले की हा प्रश्न भेडसावू लागतो.
मानवाची प्रगति होत आहे असा आमचा दावा आहे. हा खरा असेल तर करूणेचाच विजय होतो आहे असे मानावे लागेल. पण अण्वस्त्रांच्या रूपाने आधुनिक चेंगिझखानचे क्रौर्य उभे आहे. याची जाणीव झाली की मग पुन्हा मन अस्वस्थ आणि साशंक बनते.
अर्थात् पुरुषार्थ करणारांनी करूणेचाच मार्ग पत्करला पाहिजे. आणि याच श्रध्देने मी बामियानहून आज परतलो.