• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

विदेश दर्शन - १३

                             दर्शन पहिले

                     संरक्षणमंत्री  (नोव्हेंबर १९६२ ते नोव्हेंबर १९६६)
----------------------------------------------------------------------------
१ जोरहाट

१० नोव्हेंबर, १९६३.

प्रिय सौ. वेणूबाईस

आता रात्रीचे दहा वाजले आहेत. सबंध दिवसाचे कार्यक्रम संपवून थोडयाच वेळापूर्वी मोकळा झालो. उद्या सकाळी ७ वाजता पुन्हा प्रवास सुरू होईल.

जोरहाट हा आसामच्या पूर्वेकडील जिल्हा. हे या जिल्ह्याचे प्रमुख स्थान. ५५-६० हजार वस्तीचे गाव आहे.

ब्रह्मपुत्रेच्या दक्षिण किनाऱ्यावर पसरलेला हा जिल्हा नागाभूमीचा शेजारी आहे. या ठिकाणी आपले वैमानिक-दलाचे एक केंद्र आहे. त्या केंद्रात मी तीन-चार तास काढले. संध्याकाळी नागरिकांची एक जाहीर सभा झाली. त्या सभेत शहर-नगरपालिकेने मानपत्र देऊन सन्मानही केला. कशासाठी कोण जाणे?

मंत्र्यांना अजूनही मानपत्र देणारे लोक पाहिले की, मला तरी हसायला येते. पण गंभीर मुद्रा करून ते स्वीकारावे लागते. तसे ते मी स्वीकारलेही.

सकाळी दीड तासाच्या प्रवासानंतर प्रथम अलाहाबादला उतरलो. या प्रसिध्द शहराच्या भूमीस मी तर प्रथमच स्पर्श केला. सर्व वेळ, विमानतळावर काढून तेथूनच पुढचा तीन तासांचा प्रवास करून येथे आलो. अलाहाबाद शहराचे दर्शन आकाशातूनच घेतले. पुन्हा केव्हा तरी शहर पाहण्यासाठी आले पाहिजे.

अलाहाबादच्या विमानतळावर एक फार छानदार कार्यक्रम झाला. तेथे शहरवासीयांची एक यात्राच भरली होती म्हणाना! शाळा-कॉलेजांतील विद्यार्थि-विद्यार्थिनी यांची तर झुंबडच उडाली होती.

अलाहाबाद ते जोरहाट हा प्रवास मात्र फारच सुरेख झाला. आम्ही १७ हजार फूट उंचीवरून चाललो होतो. आकाश अगदी स्वच्छ होते. ऐन दुपारची १२॥ची वेळ. सूर्यप्रकाशाने अस्मान एकदम उजळून गेले होते. त्या वेळी  उत्तरेकडे हिमालयाच्या हिमाच्छादित शिखरांची एक रांगच रांग उभी होती.

जगप्रसिध्द सर्व उंच शिखरे कवायतीसाठी जणू काय एका ओळीने शिस्तीत उभी आहेत काय असे माझ्या मनात येऊन गेले. विशेषत: धवलगिरी, माउंट एव्हरेस्ट (गौरीशंकर) आणि कांचनगंगा यांचे स्पष्ट दर्शन झाले. विशेष म्हणजे या सर्वांचे एकसमयावच्छेदे-एका नजरेत एकदम दर्शन!

माझे मन तर फुलून गेले. हे सर्व चित्र जवळजवळ अर्धा तास एकसारखे डोळयांपुढे होते. हा आनंद मिळवतो म्हटले तरी पुन्हा मिळेलच असे सांगता येणार नाही.

आमचे विमान चालले होते तेथून सुमारे १००-१२५ मैलांवर ही सर्व शिखरांची रांग होती. पण दहा-वीस मैलांवर असावी इतकी ती जवळ वाटत होती.

दुरून रम्य दिसणारे हे दृश्य जवळ गेल्यानंतर किती कठोर होते याचे अनुभव तेथे प्रत्यक्ष गेलेल्यांनी जाहीर केलेलेच आहेत. ही गोष्टही मनात आल्यावाचून राहिली नाही.

या गावात सूर्य ४॥ वाजताच मावळतो. थंडी बेताचीच वाटली.

- तुझा
यशवंतराव