• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

विदेश दर्शन - १२७

६६ न्यूयॉर्क
३० सप्टेंबर, १९७५

गेले आठ दिवस इतक्या गर्दीचे गेले की, सकाळी ८॥ वाजल्यापासून रात्री ११-१२ वाजेपर्यंत काही ना काही कामात गुंतून राहिलो.

राष्ट्रसंघाच्या या बैठकींचा माझ्या दृष्टीने सर्वांत मोठा फायदा आणि उपयोग म्हणजे या निमित्ताने अनेक राष्ट्रांच्या परराष्ट्रमंत्र्यांशी भेटण्याची आणि तपशीलवार चर्चा करण्याची संधी मिळते. या सर्व देशांना भेट दिल्यासारखे होते म्हटले तरी चालेल.

गेल्या ८-१० दिवसांत दररोज ४ ते ५ परराष्ट्रमंत्र्यांना स्वतंत्रपणे भेटून महत्त्वाच्या प्रश्नांबाबत बोलता आले. फ्रान्स, नेदरलँड, पोलंड आणि सोव्हिएट रशियाचे श्री. ग्रोमिको, स्वीडन वगैरेंशी चर्चा अधिक उपयोगी झाली.

श्री. ग्रोमिको यांना मी पूर्वी ते ताश्कंदला श्री. कोसिजिनबरोबर आले होते त्या वेळी आणि गेल्या दोन वर्षांपूर्वी ते श्री. ब्रेझनेव्हबरोबर दिल्लीला आले होते तेव्हाही भेटलो होतो. पण माझ्या सध्याच्या नव्या जबाबदारीनंतर ही पहिलीच भेट होती.

त्यांनी त्यांच्या मिशनमध्ये एक-दीड तास मनमोकळी चर्चा केली. सोव्हिएट रशियाची हेलेसिंकी परिषदेनंतरची भूमिका आणि मध्यपूर्वेकडील घडामोडींबाबत प्रतिक्रिया समजून घेण्याचा माझा मुख्य उद्देश होता.

बांगलादेशचे श्री.चौधरी येथेही भेटत राहिले. फारच गोड बोलतात. त्यामुळे मनाला उगीच शंका चाटून जाते की, हे सर्व नाटक तर नाही ?

पाकिस्तानचे श्री. असीर अहमदी यांनी मुद्दाम त्यांचे मिशनवर श्री. जयपाल यांना व मला लंचसाठी बोलाविले. आदरातिथ्य भरपूर होते. परंतु महत्त्वाच्या गोष्टी निघाल्या नाहीत. सर्वसामान्य भाषेत बोलणे झाले. संबंध सुधारले पाहिजेत, आमची इच्छा आहे आणि आम्ही प्रयत्न करीत आहोत, परंतु आमच्या जनतेला बरोबर घेऊन चालायचे असल्यामुळे उशीर लागतो आहे वगैरे. सिक्युरिटी कौन्सिलच्या इलेक्शनचा विषय निघाला परंतु त्यातून काही निष्पन्न झाले नाही. संबंध प्रस्थापित करण्याचा त्यांनी प्रयत्न केला यात शंका नाही. आता त्याचा ते कसा उपयोग करतात ते पाहिले पाहिजे.

ता. २६ ला हिंदुस्थानतर्फे यू. एन्. चे आमसभेत मी निवेदन केले. त्याचे चांगले स्वागत झाले. सर्व देशांचेमार्फत अशी निवेदने येथे होतात. त्यामुळे हे काम 'रूटीन' वाटते. परंतु जगापुढे असलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांबाबत प्रत्येक राष्ट्राचा काय दृष्टिकोन आहे याची सविस्तर कल्पना येते. मला वाटते याची आवश्यकता आहे.

लंच आणि डिनर हे तर दररोजचेच. तेथे अनेक प्रमुखांच्या दाट ओळखी झाल्या. लिमापासून आजपर्यंत जवळ-जवळ दोन महिने वारंवार संपर्क येत राहिला आहे. त्यामुळे या आंतरराष्ट्रीय क्लबचा मी फार जुना मेंबर आहे असे वाटू लागले आहे.