• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

विदेश दर्शन - १०९

युध्दभूमीवरील, माणुसकीला लाजविणारे हे दु:खचित्र पाहून कष्टी मनाने परतलो.

रात्री येथील विदेशमंत्री अब्दुल हालिम खदाम यांचे जेवण होते. मंत्रिमंडळातील इतर प्रमुख मंत्री आणि प्रमुख देशांचे राजदूत हजर होते. योग्य ती भाषणे होऊन कालचा दिवस ११ वाजता रात्री संपला. आज सकाळपासून आत्तापर्यंतचा वेळ खूपच गर्दीचा गेला. ९॥ ते १२॥ विदेशमंत्र्यांशी चर्चा करण्यात गेला. भाषांतरामुळे अधिक वेळ गेला. तत्त्वांची चर्चा व मांडणी त्यांनी चांगली केली. पाकिस्तानचा प्रश्न आला म्हणजे, नाही म्हटले तरी त्यांची काहीशी मानसिक गडबड होते.

इजिप्तच्या व त्यांच्या भूमिकेत मूलभूत फरक दिसतो प्रो-सोव्हिएट तर आहेतच. जिनिव्हा झाले पाहिजे व त्यात आशिया, आफ्रिका आणि नॉन-अलाइन्ड यांना प्रतिनिधित्व दिलेच पाहिजे वगैरे. पी. एल्. ओ. बाबत आणखी एक सूक्ष्म फरक ध्यानात आला.

त्यांच्या मनात आत कोठेतरी अशी भावना आहे की, पॅलेस्टाइन व सिरिया यांचे एक राज्य व्हावे. इराण व इराक यांच्या नव्या स्नेहाबाबतही त्यांनी लावलेला अर्थ वेगळा आहे.

दोन्ही देशांत (इराक व सिरिया) Bath पार्टीचे राज्य आहे. परंतु अलीकडे युफ्रेटिस नदीच्या पाणीवाटपावरून व व्यक्तिगत राजकीय संघर्षामुळे त्यांच्यात बेबनाव झाला आहे. उघड उघड एकमेकांवर जाहीर टीका व आरोप प्रत्यारोपांची खैरात होत आहे.

इराणने आपले वैर विसरून जी मैत्री केली त्याचे पाठीमागे इराकमधून सोव्हिएट मैत्रीची हकालपट्टी करण्यासाठी टाकलेला भांडवलशाही डाव आहे. सौदी अरेबियाच्या द्वारे हाच डाव इजिप्तमध्ये खेळला गेला व तेथे अमेरिकेचे वर्चस्व वाढवून रशिया व इजिप्त यांमध्ये अंतर निर्माण केले. इराणमध्ये शस्त्रात्रांच्या जबरदस्त वाढीच्या पाठीमागे बदललेली दुनिया लक्षात घेऊन साम्राज्यशाहीने टाकलेले हे नवे पाऊल आहे.

'डिडांट' च्या पार्श्वभूमीवर Alliamon चे महत्त्व कमी झाले आहे. आता वेगवेगळया विभागांत आपल्याला अनुकूल नवी (centres of power) शक्तीची केंद्रे उभारण्याची नवी नीति सुरू झाली आहे. इराण हे गल्फसाठी व हिंदीमहासागराचे भविष्य घेऊन या हेतूने निवडले गेले आहे. नव्या घडामोडींचे त्यांचे हे विश्लेषण आहे. आमच्या मतांशी जुळणारे हे विश्लेषण आहे. परंतु आर्थिक क्षेत्रात इराणशी लांब मुदतीची सहकार्य-क्षेत्रे निवडण्याचे आमचे - भारताचे - धोरण दूरदृष्टीचे व योग्य असेच आहे असे त्यांनी मत व्यक्त केले.

विदेशमंत्र्यांना भेटून एकच्या सुमारास हॉटेलवर परतलो. १॥ ते २ च्या सुमारास सर्वांनी एकत्र जेवावयाचे असे आम्ही ठरविले होते. दीड वाजल्यानंतर एकाएकी प्रेसिडेंट श्री. आसद यांनी लगेच भेटीस बोलाविले आहे असा पॅलेसवरून निरोप आला. त्यांची ही नेहमीचीच पध्दति आहे असे सांगण्यात आले.

आधी वेळ व जागा कळविली जात नाही. एकपक्षीय राज्यातील हे सर्वाधिकारी अध्यक्ष असेच वागतात म्हणे!

४०-५० च्या वयाचे काहीसे गंभीर परंतु Relaxed म्हणता येईल असे व्यक्तित्व दिसले. एक तासभर मी तेथे होतो. त्यांचे विदेशमंत्रीही हजर होते. शांत आणि सावकाशपणे त्यांनी इस्त्राएलच्या प्रश्नाचा इतिहास सांगितला.