समृद्धीकडे वाटचाल
पूर्वी होती तीच जमीन. पूर्वी पडायचा तितकाच पाऊस. पूर्वीच्याच विहिरी आणि पूर्वीचाच ओढा. पण आता पोटभर खाऊन-पिऊन तृप्त अशा टप्प्यावर गाव येऊन पोचले आहे. वाटचाल सुरू आहे ती समृद्धीकडे. आता पाऊस कितीही कमी पडो, निदान दुष्काळाने तरी आडगावकडे कायमची पाठ फिरविली आहे. ही किमया कशी घडली ? गावातील वजनदार पुढारी मंत्री झाला आणि गावाचे भाग्य फळफळले ? की आमदार-खासदारांनी खास प्रयत्न करून सरकारी योजना गावात आणल्या आणि गाव सुधारले ? की जवळपास मोठे धरण झाले आणि गावाचा कायापालट झाला ?
नेमके घडले तरी काय ?
इतर कोणत्याही खेडेगावासारख्याच असलेल्या एखाद्या गावाची अशी अपवादात्मक भरभराट झाली की, डोळ्यांपुढे आज चटकन येतात ती ही कारणे ! पण आडगावात घडले होते ते या सार्या कल्पनांना धक्का देणारे. किंबहुना ग्रामीण विकासात या सर्व यंत्रणांचे अस्तित्व मोठ्या प्रमाणावर गैरलागू ठरविणारे ! आडगावातील बदलाची प्रक्रिया जाणून घ्यायची तर तीन-चार वर्षे मागे जायला हवे ....
त्यावेळी जवाहर गांधी आणि विजय बोराडे मराठवाडा शेती सहाय्य मंडळाच्या वतीने आडगावापासून १५-१६ कि.मी. वरील देव-पिंपळगावात काम करीत होते. तेथील प्रयोगाविषयी आडगावचे लोक ऐकून होते. स्वतः गांधी-बोराडे प्रयोगाचा प्रसार करण्यासाठी पिंपळगावात शिबिरे घेत असत. अशाच एका शिबिरात थोड्या निरुत्साहानेच आडगावातील मंडळी सहभागी झाली आणि चांगलीच प्रभावित झाली.
पुढच्या वर्षीच्या शिबिरात आडगावकरांचा सहभाग वाढला होता. चर्चेत प्रयोगाचे यश तसेच अपयश यांचीही मांडणी होत असे. आडगावातील मंडळींना प्रयोगाचे महत्त्व पटले. त्यांना आपल्या गावाचे वैशिष्ट्य माहीत होते. त्यामुळे पिंपळगावात जे पूर्णपणे साकारू शकले नाही, ते आपण करून दाखवू शकू असा त्यांना विश्वास होता. पिंपळगावातील प्रयोग आडगावात करायचाच असा निर्धार, आडगावातील ग्रामस्थांनी गांधी-बोराडे यांच्या कानी घातला. १९८३ च्या सुमारास प्राथमिक कामाला सुरुवात झाली.
एकमताचा निर्णय
आडगावाचे वैशिष्ट्य काय होते ? या गावात सर्व निर्णय आपसातील चर्चेनंतर एकमताने घ्यायचा पायंडा होता. नव्हे असा तेथील अलिखित कायदाच होता. गेल्या वीस वर्षात गावात भांडण नाही. एका वृद्धाने मोठ्या अभिमानाने सांगितले. खरे तर आडगावाचा प्रयोग इतका यशस्वी झाला तो गावाच्या या वैशिष्ट्यामुळेच, असे गांधी यांचे मत.
याचा अर्थ गावात अडचणी निर्माणच झाल्या नाहीत, मतभेद झालेच नाहीत असे नव्हे, पण झाले ते तांत्रिक मुद्द्यांवर होते. व्यक्तिगत हितसंबंधांची भांडणे नव्हती. अर्थात गांधी-बोराडे यांच्यापार्यंत पोचले ते एकमताचे निर्णय आणि ते राबविताना सर्व गावाचा मनःपूर्वक सहभाग.
एक प्रकारे आडगावात प्रयोगाला सुरुवात करताना गावकरी आणि गांधी-बोराडे यांचा तोंडी करारच झाला होता. प्रयोगाचा गाभा होता, तो माती आणि पाणी अडविण्याचे कार्यक्रम. या कार्यक्रमातील सहकार्याबरोबरच, स्वतःच्या शेतांतही, आम्ही देऊ ते तंत्रज्ञान राबविले पाहिजे, ही 'करारा'तील एक अट होती. प्रयोगाचे जर चांगले परिणाम दिसले तर त्याचा विस्तार व्हावा म्हणून पदयात्रा करून आजूबाजूच्या गावांत प्रसार केला पाहिजे ही दुसरी अट होती. गावाने दोन्ही अटी मान्य केल्या आणि शंभर टक्के पाळल्या !