महाराष्ट्रातील दुष्काळ - ८३

१२.  झाडे लावणे व जगवणे  :  हीच मोहीम !

ऍड. भाई जगन्नाथराव औटे
बीड येथील नामवंत वकील आणि विज्ञाननिष्ठ शेतकरी
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

महाराष्ट्राचे वाळवंट होऊ नये, भावी पिढीला शुद्ध हवा मिळावी आणि पाण्याचा तुटवडा नाहीसा करणे ह्यासाठी प्रत्येक व्यक्तीने, संस्थेने झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेणे आवश्यक आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

महाराष्ट्र व सह्याद्री, बालाघाट, गोदावरी, कृष्णा, प्रवरा, मांजरा, भिमा, सिना इत्यादी नद्या व पर्वतांनी व्यापलेला प्रदेश आहे.  निसर्गाची सतत कृपा असलेला प्रदेश आहे.

मात्र १९७२ पासून महाराष्ट्रामध्ये दुष्काळाचे जे सत्र सुरू आहे ते काही संपेना, उलट प्रत्येक वर्षी गेल्या वर्ष्यापेक्षा कमी पाऊस पडतो, अशीच नोंद होऊ लागलेली आहे.  जर कमी जास्त पाऊस झाला तर तो अवेळी पाऊस पडतो व त्यापासून फायदा होत नसून तोटा होतो व जर असेच चालू राहिले तर लवकरच महाराष्ट्राभूचे राजस्थानभू सारखे वाळवंटामध्ये रूपांतर झाल्याशिवाय राहाणार नाही व याची संपूर्ण जबाबदारी आजच्या नागरिकांवर व शासनावर आहे.

भावी पिढीसाठी नुसते आपण वालुकामय प्रदेश हवाली करणार आहोत व आपले नागडे प्रदर्शन नाकर्तेपणाचे दाखविणार आहोत.  भावी पिढी या पिढीस माफ करणार नाही याची गंभीर दखल घेतली पाहिजे.  पूर्ण मानव समाजच आपण एका भयंकर संकटात लोटीस आहोत.  या महाभयंकर दुष्काळापासून सुटका करण्यासाठी काही उपाय आहेत की, नाही आहेत ?  कारण हा दुष्काळ काही नैसर्गिक दुष्काळ नाही, तर हा दुष्काळ मानव-निर्मित आहे.  मानवाने अनेक गोष्टीवर मात केलेली आहे, त्या मानाने दुष्काळावर मात करणे फार अवघड नाही.  मात्र त्यासाठी कष्टाची व कडक प्रशासनाची गरज आहे.

दुष्काळ निवारण्यासाठी अनेक उपाय आहेत.  त्यापैकी वृक्षलागवड हा एक अति महत्वाचा उपाय आहे.  वृक्षवाढ करणे ही काळाची अत्यंत गरज आहे.  मानव समाज जर वाचवायचा असेल तर झाडे वाचली पाहिजेत.  महाराष्ट्रात आज झाडांची बेसुमार तोड झालेली आहे.  ती चालू आहे.  जमीन बोडखी झाली आहे.  गावेच्या गावे विनावृक्ष झालेली आहेत.  दररोज हजारो वृख कचाकच तोडले जात आहेत.  डोंगरमाथे उजाड झालेले आहेत.  ह्याची कोणालाही कसल्याही प्रकारची खंत वाटत नाही.  ह्याचेच अत्यंत वाईट परिणाम भोगावे लागत आहेत.  पावसाचे प्रमाण कमी झालेले आहे व ते दर वर्षी अत्यंत कमी होत चालले आहे.  म्हणून अन्नधान्य, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, इत्यादी प्रश्न निर्माण होतात व ते प्रश्न सोडवणे कठीण आहे.  या शिवाय जमिनीची धूप सारखी कमी होत आहे.  कारण आभाळातून पडणारे पाणी अडवायला कोणीच नाहीत म्हणजे वृक्ष नाहीत.  म्हणून पावसाचे पाणी निघून जाते व ते पाणी जमिनीत मरत नाही.  म्हणून पाण्याची पातळी अत्यंत खोल गेलेली आहे व पाण्याचा जमिनीतील साठा आटत आलेला आहे.  यासाठी वृक्ष लागवड होणे अत्यंत जरूर आहे.

या शिवाय या वृक्षतोडीमुळे पर्यावणाचा समतोल बिघडलेला आहे.  शहरामध्ये शुद्ध हवा मिळणे अत्यंत कठीण झालेले आहे.  म्हणून ज्या ज्या ठिकाणी शुद्ध हवेचा प्रश्न निर्माण होतो तेथे तेथे भावी पिढी अत्यंत कमजोर जन्मास येण्याचा मोठा धोका निर्माण झालेला आहे.  त्याचा परिणाम म्हणून अपरिमित राष्ट्रीय नुकसान होणार आहे.  भावी पिढी अत्यंत कमजोर जर जन्मास आली तर पुढील अनेक आव्हाने ही भावी पिढी पेलू शकणार नाही.  झाडांचे महत्व फार फार पुरातन काळापासून लोकांना माहीत आहे म्हणून समाजाकडून वड, पिंपळ, उंबर, लिंब, आंबा, जांभूळ इत्यादी वृक्षांची पूजा केली जात असे व आजही केली जात आहे.  मात्र आज ही झाडे दिसून येत नाहीत.  झाडांची निव्वळ चित्रे काढण्याची पाळी शहरी नागरिकांवर आलेली आहे.

संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनीसुद्धा वृक्षांना सोयरे म्हटले आहे.  ते उगीच नाही.

या वृक्षांची वाढ व जोपासना करण्यासाठी प्रत्येक माणसाने, महाराष्ट्र शासनाने, सामाजिक व शैक्षणिक संस्थांनी, आणि राजकीय संस्थांनी पुढाकार घेऊन वृक्ष वाढ केली पाहिजे.

याबाबत महाराष्ट्र शासनाने अत्यंत दक्षतेने डोळ्यात तेल घालून कडक उपाय योजून वृक्षांची लागवड व जोपासना केली पाहिजे.