जलसंपत्ती, उपलब्धता, नियोजन व वापर
स्वातंत्र्यानंतरच्या चाळीस वर्षाचा आढावा घेतला तर विज्ञानाच्या प्रगती बरोबर अज्ञानाचा गाळी आपल्या प्रगतीच्या काठावर भरपूर साठलेला आहे. त्यातून काही ज्वलंत समस्या उभ्या आहेत. त्यांचे वर्गीकरण मुख्यतः आर्थिक विषमतेवर झालेले आहे आणि त्यातूनच त्याच्या छटा निरनिराळ्या प्रश्नात दिसून येतात. ह्या समस्येवर मात करण्याचे अनेक खर्चिक प्रयोग सरकार करीत आहे. पण प्रश्न सुटण्याऐवजी ते अधिकच गुंतागुंतीचे होत आहेत. 'पाणी पंचायतीचा' एक आगळा वेगळा प्रयोग काही मूलभूत प्रश्नाला मार्गदर्शक ठरू शकेल का याचे परीक्षण संबंधितांनी करावे आणि प्रचार माध्यमांनी थोडेसे सातत्याने लक्ष पुरवावे. आपली जलसंपत्ती हीच समाजाची मोठी संपत्ती आहे आणि तिची उपलब्धता निश्चित करून त्या उपलब्धतेचे नियोजन जर सर्वांनी मिळून केला तर तिचा वापर अधिक चांगल्या रितीने आणि समाजाच्या सहभागाने होऊन सर्व समाजाची सर्वांगीण प्रगती स्वावलंबनाने होऊ शकेल.
शेती, उद्योग, आणि शिक्षण ह्या तीन क्षेत्रांची प्रगती विभागीय पातळीवर जर पूरक होऊ शकली तर आज आपणाला भेडसावणारे निरनिराळे प्रश्न राहू शकणार नाहीत पण त्याकरिता आपल्याला जलसंपतीचे नियोजन जर सर्वांनी मिळून केला तर तिचा वापर अधिक चांगल्या रितीने आणि समाजाच्या सहभागाने होऊन सर्व समाजाची सर्वांगीण प्रगती स्वावलंबनाने होऊ शकेल. ह्यासाठी आपल्या जलसंपत्तीचे नियोजन विज्ञानाच्या सहाय्याने आणि सामाजिक भाव लक्षात घेऊन केला तरच शक्य होईल. महाराष्ट्राचा विचार केल्यास जलसंपत्तीचे नियोजन हे नियोजन म्हणण्यापेक्षा कसे उधळपट्टीने होत आहे याची भावी इतिहासात नोंद झाल्याशिवाय राहणार नाही. ही धोक्याची सूचना देण्याचे काम पाणी पंचायत करीत आहे.
आज महाराष्ट्र हे एक भारतातील प्रगतिशील व औद्योगिक राज्य म्हटले जाते आणि हे दरडोई उत्पन्नाच्या आकडेवारीने कोणाला नाकारता येत नाही. औद्योगिक उत्पन्न वजा करून जर दरडोई उत्पन्नाची आकडेवारीची तुलना केली तर महाराष्ट्र हे इतर मागासलेल्या राज्याप्रमाणेच प्रगतीवर आहे हेही कोणी नाकारणार नाही आणि त्याचे मुख्य कारण महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन इथल्या जलसंपत्तीचे नियोजन करण्याच्या विचाराचा अभाव हेच आहे. जलसंपत्ती दिन साजरा करताना असाही एक विचार मांडला गेला की प्रश्नांची व्याप्ती समजण्यासाठी त्यावरील अभ्यासपूर्ण पर्यायी सूचना करण्यासाठी पुणे जिल्ह्यात १३ तालुके आणि जलसंपत्तीचा अभ्यास अधिक तपशिलवार करावा.