९. आमदार प्रा. लक्ष्मण ढोबळे
मंगळवेढे
प्रश्न : कोणत्या ठिकाणी कोणते धरण बांधावे या बाबतचे महाराष्ट्र शासनातर्फे लेखी आदेश फार वर्षापूर्वी निघाले होते. परंतु चुकीच्या ठिकाणी धरणे बांधून सर्वच अर्धवट ठेवण्यात आले आहे असे दिसते.
९० इंच (.२२५ सें.मी.) पावसाच्या प्रदेशात मोठी धरणे
६० इंच (१५० सें.मी.) पावसाच्या प्रदेशात मध्यम धरणे
३० इंच (७५ से.मी.) पावसाच्या प्रदेशात लहान धरणे
३०-० इंच (७५ सें. मी.) पेक्षा कमी पावसाच्या प्रदेशात पाझर तलाव व गावतळी असे महाराष्ट्राचे चार झोन पाडण्यात आले होते. तो नियम राजकीय दबावामुळे पाळला जात नाही. ह्याबद्दल आपले काय मत आहे ?
उत्तर : प्रा. ढोबळे ह्यांनी पाणी कसे अडविले जाईल ह्या संबंधीचा प्रश्न उपस्थित केला आहे. प्रा. ढोबळे ह्यांनी, पावसाचे प्रमाण लक्षात घेऊन धरणे बांधण्यासंबंधी बर्याच वर्षापूर्वी शासनाने काही पायाभूत तत्त्वे मान्य केली होती, ती आजही मान्य करून त्या आधारेच कार्यक्रम राबवावा असे सूचित केले आहे. गेल्या अर्ध्या शतकात आणि विशेषतः गेल्या दोन दशकात, मोठी धरणे बांधावीत ह्यासंबंधी बरेच नवीन मुद्दे पुढे आले आहेत. हल्ली तर लहान धरणे विरूद्ध मोठी धरणे असे वादही राष्ट्रीय पातळीवर चालू आहेत. मात्र आता सर्व प्रकारच्या प्रदेशात आणि सर्व पाणलोटातील प्रदेशात सर्वकष पाणी अडविण्याच्या योजना कार्यान्वित कराव्यात हा विचार जवळजवळ राष्ट्रीय पातळीपासून तो गावपातळीपर्यंत सर्वमान्य होऊ पाहात आहे. कोकणासारख्या अधिक पाऊस पडणार्या प्रदेशातसुद्धा फक्त मोठी धरणे बांधून चालणार नाही, हे सर्व जाणकारांच्याही लक्षात आले आहे. पाणलोटाच्या सर्व प्रदेशातील पाणी जागोजागी थांबवले व मुरवले पाहिजे. १००-१५० इंच (२५०० मि.मी. ते ३०० मि. मीटर) पावसाच्या कोकणसारख्या प्रदेशात, उन्हाळ्यात पिण्याचे पाणी मिळू नये ही दुर्दैवी परिस्थिती बदलता येणार नाही काय ? शिवाय, आता डोंगर आणि टेकड्यांच्या चढउतारावर देखील बागायती शेती होऊ शकते. हे जगातील अनुभवाने सिद्ध होऊ शकते. म्हणून सर्व पाणलोटाच्या प्रदेशातही अधिकाधिक पाणी अडवावयाचे आणि जमिनीत मुरवावयाचे असा कार्यक्रम सर्व प्रकारच्या प्रदेशात कार्यान्वित करावा लागेल. जमिनीची धूप थांबवण्याच्या दृष्टीने अशा कार्यक्रमाला अग्रक्रम द्यावा लागेल. प्रा. ढोबळे हे आपल्याकडील मोठे जाणकार कार्यकर्ते आहेत. त्यांच्यासारख्यांनी महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर आता नेतृत्व करण्याची गरज आहे. ह्या नवीन दृष्टिकोनातून जनतेला मार्गदर्शन करावे अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे.