महाराष्ट्रातील दुष्काळ - १३२

१४.  पांडुरंगा, चंद्रभागा फाटक्या माणसासाठी अडवली आहे

ना. धों. महानोर
आधुनिक तंत्राने शेती करणारे प्रज्ञावंत कवी
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आधुनिक पद्धतीचे पाणी वाटप, यंत्र व अन्य साधने ही आयुधे शेतकर्‍याकडे पोहोचवा.  तो बलवान होईल व देशालाही शक्तिमान करेल.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------''एवढी सगळी चर्चा झालेली आहे, तेव्हा माझ्या दृष्टीने केवळ १० मिनिटात जे काही सांगायचे ते बोलणार आहे.  तसे आता सांगण्यासारखे फारच कमी उरले आहे.

महाराष्ट्रामध्ये भिमा नदीवरील उजनीच्या भूमिपूजनाच्या वेळेला महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण म्हणाले होते की, ''पंढरीच्या विठ्ठलाच्या या परिसरात, त्याच्या या पंचक्रोशीत आज मोठ्या आनंदाने आलो आहे.  येताना मी मनात विठ्ठलाला म्हणतो - चंद्रभागा तुझ्या अंगणात पोहोचण्यापूर्वीच आज आम्ही तिला अडवली आहे.  तुझ्या चरणांजवळ ही चंद्रभागा अठ्ठावीस युगे वाहात आली.  या चंद्रभागेला उजनीजवळ आज आम्ही थांबवितो आहोत.  महाराष्ट्रातील शेतकरी, दरसाल आषाढी-कार्तिकी एकादशीला खांद्यावर पडशी टाकून ग्यानबा तुकाराम म्हणत तुझ्या दाराशी येत असतो.  त्या ग्यानबा तुकारामाच्या शेतीत आणि झोपडीत तू भेट.  पांडुरंगा, तुझ्या या गंगेच्या पाण्यामध्ये स्नान करणार्‍या, ग्यानबा तुकाराम म्हणणार्‍या माणसाच्या आंघोळीचं पाणी हे बंद करत आहेत.  हा मोठा गुन्हा करतो आहे.  आणि हे काम करीत असताना मी हे पाणी अडवतोय.  परंतु जो फाटका तुटका माणूस ह्या महाराष्ट्रातला, विशेषतः सोलापूरसारख्या दुष्काळी प्रदेशातील माणूस तुझ्याकडे त्याला फाटलेला संसार घेऊन येतो आणि माझे दुःख दूर कर असे म्हणायला आलेला आहे.  अशा फाटलेल्या माणसाच्या झोपडीपर्यंत पाणी गेलं पाहिजे एवढ्यासाठी मी हे करतो.''

अशी त्यावेळी यशवंतरावजी चव्हाण प्रार्थना करत होते.  ''आणि गुन्हा करतोय ही गोष्ट जरूर आहे परंतु हे पाणी अडवण्याचे काम - आणि तुझ्या गंगेचे पाणी अडवायचं हे जर काम इथं करतो आहे.  हे मुद्दाम तुझ्याचसाठी करतो, की जो माणूस इथं तुझ्यासाठी भिक्षा पात्र घेऊन आलेला आहे.  त्याच्यासाठीच करतो आहे.''  असे त्यावेळी यशवंतरावजी चव्हाणसाहेबांनी सांगितले आहे.

मी ही जी गोष्ट सांगितली, त्यानंतर १९६२ साली बर्वे कमिशन स्थापन झाले आणि त्याच्या नंतर जी ४-५ कमिशने स्थापन झाली आहेत.  गेल्या २० वर्षामध्ये कोठेही कालबद्ध कार्यक्रम झालेले नाहीत.  हा महाराष्ट्रातला माणूस उभा राहील या पद्धतीने काहीही काम झालेले नाही.  ही गोष्ट खरी आहे.  याच्याविषयी अण्णासाहेबांनी अनेकदा इशारा दिला आहे.  आणि बाकीच्या नामवंत व जाणकार मंडळींनीही कितीतरी वेळेला चिंता व्यक्त केली आहे.  त्याचा मी पुनरोच्चार करत नाही.  फक्त मुद्याच्या गोष्टीसंबंधी माझी आपणाबरोबर चर्चा करण्याची इच्छा आहे.

याच्या अगोदर थोर मंडळींनी या प्रश्नांशी संबंधित विचार व्यक्त केले आहेत, की ८५ टक्के ते ९१ टक्के पाणी वाहून जात आहे.  हे समुद्रात जाऊन मिळते.  हे वाहून जाणारे किंवा समुद्राला मिळणारे पाणी अडवले पाहिजे.  पाण्याबरोबर गाळ आणि माती वाहून नेणार्‍या पाण्याचे नियोजन केले पाहिजे.  म्हणून पाणी (वॉटर मॅनेजमेंट) आणि (सॉईल मॅनेजमेंट) जमीन व्यवस्थापन हा महत्त्वाचा भाग आहे.