• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

महाराष्ट्रातील दुष्काळ - १६१

११. निवृत्ती वि. उगले

जिल्हा बीड

प्रश्न :  समुद्रात वाहून जाणारे पाणी देशावर नेण्यासाठी काय अडचणी आहेत ?  सह्याद्रीच्या डोंगरावर २०० इंच पाऊस पडतो.  कोकणाला सर्व पाण्याची आवश्यकता नाही.  जे पाणी वाहून समुद्रात जाते, ते पाणी वाया न जाता कुकडी-खोरे, गोदावरी-खोरे, कृष्णा-खोरे, नर्मदा-खोरे ह्यांमध्ये वळवल्यास पावसाळ्यात ते पाणी दुष्काळी भागातील पाझरतलाव, गावतलाव, आणि पाणीपुरवठातलावात साठवून दुष्काळी अशा अहमदनगर, बीड, उस्मानाबाद व सोलापूर जिल्ह्यास देता येईल.  ह्याबाबतीतल्या अडचणी दूर करण्याचे प्रतिष्ठान कशाप्रकारे प्रयत्‍न करू शकेल ?

उत्तर :  श्री. उगले ह्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर महाराष्ट्रात अधिक विचार होण्याची गरज आहे.  पाटबंधारे खात्यानेही ह्यासंबंधी थोडाफार विचार केला असला तरी तो पुरेसा आहे, असे प्रतिष्ठानलाही वाटत नाही.  कोकणच्या सर्व गरजांना पुरून उरेल इतके पाणी कोकणात उपलब्ध आहे.  महाराष्ट्रातील एकूण पर्जन्य वृष्टीच्या पाण्यापैकी ४० टक्के ते ४१ टक्के पाणी कोकणामध्ये पावसाच्या रूपाने पडते.  कोकणात एवढ्या प्रचंड प्रमाणात पडणारे पाणी भविष्यकाळातही उपयोगात आणले जाण्याची शक्यता नाही.

तथापि, खरा प्रश्न आहे तो हा की कोकणातल्या पावसाचे पाणी व्यवहारात कसे आणावयाचे ?  सह्याद्रीला काही ठिकाणी बोगदे पाडणे शक्य आहे काय ?  ह्याचाही विचार करावा लागेल.  जगातील सर्वात समृद्ध शेती अमेरिकेतील कॅलिफोर्निया ह्या प्रांतात आहे. कॅलिफोर्निया तसा दुष्काळी प्रदेश आहे.  परंतु कॅलिफोर्नियात प्रचंड प्रमाणात बागायती शेती अस्तित्वात आली आहे.  तेथे पर्वतांची एक मोठी रांग कापून, ती ओलांडून, तेथे २,५०० फूट उंच पाणी उचलून, ते पर्वताच्या प्रदेशातल्या एका खोर्‍यातून दुसर्‍या खोर्‍यात नेण्यात आले आहे.  अशा महत्त्वाकांक्षी योजनांनुसार कोकणातील पाणी दुष्काळी महाराष्ट्रात नेण्याचा विचार केला पाहिजे.  सह्याद्रीच्या उंच टेकड्यांच्या प्रदेशातील पाणी पूर्वेकडून पश्चिमेकडे न्यायचाही नवीन पद्धतीने विचार केला पाहिजे.

महाराष्ट्रात अनेक हुषार अभियंते आहेत.  त्यांनी आपल्या बौद्धिक सामर्थ्याचा, कल्पकतेचा आणि अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा उपयोग करून श्री. उगले ह्यांनी दिलेल्या आव्हानाला प्रतिसाद दिला पाहिजे.  ह्यात एक अडचण येण्याची शक्यता आहे.  ती म्हणजे आर्थिक साधनसामुग्रीची !  कारण प्रवाहाने वाहून जाणार्‍या पाणी-अडवण्याचे प्रकल्प अजून पूर्ण झालेले नाहीत.  तेव्हा ह्या प्रश्नाकडे आताच लक्ष द्यावे काय, असाही प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे.

परंतु दुष्काळाचा प्रश्न हा मानवतेच्या दृष्टीने मूलगामी प्रश्न आहे.  दुष्काळी भागातील शेतकर्‍याला माणूस म्हणून जिवंत ठेवण्याचा आणि त्याला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी बळ देण्याचा विचार जर लक्षात घेतला तर श्री उगले ह्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचा सर्व तज्ज्ञांनी व ग्रामोद्धारातील कार्यकर्त्यांनी विचार करून योग्य तो उपाय काढण्याची जबाबदारी उचलण्यासाठी योग्य तो कार्यक्रम हाती घ्यायला पाहिजे.  कारण एवढ्या प्रचंड प्रमाणात अरबी समुद्रात पाणी वाया जाऊ देणे योग्य नाही.  जलसंपत्ती ही सोन्यापेक्षाही अधिक महत्त्वाची आहे असे मला वाटते.  म्हणून श्री. उगले ह्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचे उत्तर सापडेपर्यंत पराकाष्ठेचे प्रयत्‍न केल्याशिवाय महाराष्ट्राला गत्यंतर नाही आणि शासनाला आराम घेणे शक्य नाही.