५. श्री. हिरामण वेंडूजी वरखडे
गडचिरोली
प्रश्न : पाणी पुरवणे व पाणी जिरवणे ह्याबाबत कोणकोणत्या बाबींची उपाययोजना करणे आवश्यक आहे ? नदीच्या पात्रात पूर्वी मोठमोठे डोह होते. ते डोह, नदीच्या काठावरील दरडी कोसळून पुराच्या पाण्याबरोबर गाळ वाहून गेल्यामुळे बुजून गेले आहेत. पूर्वी डोहांमुळे भूगर्भात पाणी जिरण्याची प्रक्रिया होत होती ती बंद झाली आहे. कोलमाइन्स, लोखंडाच्या खाणी, सिमेंटचा दगड काढण्याच्या खाणीमधून मोठ्या प्रमाणात पाणी उपसून बाहेर टाकले जाते. मोठी धरणे झाल्यामुळे धरणांच्याखाली हजारो किलोमीटर वाहती नदी वाहणे बंद होते. धरणांतील भूपृष्ठावरील पाणी ६६ टक्के पाणी वाफेद्वारे नष्ट होते. सागवनाच्या एक कलमी लागवडीच्या प्रक्रियेमुळे गवत उगविण्याची प्रक्रिया नष्ट झाली आहे. तेंदू पानांच्या तोडाईसाठी तेंदू पानांची जंगले अनेक वर्षापासून जाळत असल्यामुळे जमिनीखाली मुरणारे साधन नष्ट झालेले आहे. आपण खुलासा व माहिती द्या.
उत्तर : पाणी मुरवण्याच्या दृष्टीने श्री वरखडे ह्यांनी उपस्थित केलेले मुद्दे आणि त्यानुषंगाने विचारलेले पूरक प्रश्नही संयुक्तिक आणि महत्त्वाचे आहेत. सुदैवाने ह्या विषयावर बरीच चर्चा महाराष्ट्रात चालू आहे. कै. वसंतदादा पाटील ह्यांनी, राज्याचे मुख्यमंत्री असताना ह्या प्रश्नांना महत्त्वाचे स्थान दिले होते.
भूगर्भात पाणी मुरवण्याचा प्रश्न हा बहुविध स्वरूपाचा आहे. प्रश्नात उल्लेख केल्याप्रमाणे नदीच्या पात्रातील डोहाचे पाणी मुरवण्याच्या दृष्टीने बरेच महत्त्व आहे. महराष्ट्र शासनाने पाणलोट विभागसाठी जी योजना कार्यान्वित केली आहे तीसुद्धा पाणी जिरवणे व मुरवण्याच्या संदर्भात महत्त्वाची आहे. मृद-संधारण योजनेचेही असेच महत्त्व आहे. श्री. विजय बोराडे आणि श्री गांधी ह्यांनी औरंगाबाद जिल्ह्यात आडगाव येथे जो प्रकल्प कार्यान्वित केला आहे तो पाणी साठवणी, मुरवणे आणि जिरवणे ह्या बाबतीत उत्तम वस्तुपाठ म्हणून सर्वाधिक महत्त्वाचा आहे, ('जिथे हरला दुष्काळ' आडगाव प्रकल्प पृ-पहा)
पाणी मुरवण्याच्या प्रश्नाशी दुसर्या एका समस्येचा अतिशय निकटचा संबंध आहे. तो म्हणजे भूगर्भातील पाणी वर काढले जाते त्याचे प्रमाण ह्याचे ! जेवढे पाणी मुरवले जाते तेवढ्याच प्रमाणात पाणी बाहेर काढले गेले तर पाणी मुरवणे व काढणे ह्यात समतोल राहू शकेल. हा समतोल राखणे म्हणजे भूगर्भातील पाण्याची पातळी कमी अधिक प्रमाणात सारखी ठेवणे. ह्या प्रक्रियेस वनस्पती-सृष्टीच्या दृष्टीने आणि व्यावहारिक दृष्टीतूनही मोठे महत्त्व आहे.