महाराष्ट्रामधल्या भू-विभागातील उरलेल्या पाण्याच्या बॅलंसचा अभ्यास करायला पाहिजे. वॉटर बॅलंसचा थोडाबहुत अभ्यास केल्यानंतर मला असे दिसून आले आहे की शेतीला लागणारे पाणी, पिण्याचे पाणी आणि फळशेतीला लागणारे पाणी, असा जर हिशोब केला तर असे गावाला साधारणपणे ८ ते १० लाख घन मीटर वार्षिक पाणी लागते. म्हणजे दर वर्षाला साधारणपणे एका माणसाला ५०० घन मीटर पाणी द्यावे लागते. आम्ही ५०० घन मीटर जेव्हा म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये पिण्याचे पाणी आले, जनावरांना लागणारे पाणी, गव्हाला पाणी, या सर्व कामासाठी लागणारे पाणी आले. ह्याचा अर्थ असा की एवढ्या पाण्यात वर्षाचे व्यवहार होऊ शकतात. म्हणजेच वार्षिक फक्त आठ इंच किंवा २०० मिली मीटर पाऊसपाणी पडले असतानाही योग्य रीतीने पाणी पडवले, जिरवले आणि पाणीवाटप केले तर लागणार्या सर्व पाण्याची गरज भागू शकते. हे राळेगण शिंदीने दाखवून दिले आहे. आता हे जे मी सांगितले आहे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. ती अशी की राळेगण शिंदीमधील खेडुतांनी आपल्या पाण्याचा प्रश्न सोडवून टाकला आहे. अवर्षणग्रस्त भागात बायका मुली आणि मुले पडलेल्या काटक्या गोळा करताना दिसतात. असले दृष्य ह्या गावात दिसत नाही. राळेगण शिंदीमधील २१०० लोकांना ४२० टन पाणी वर्षाला लागते. त्यांनी २६-२७ गोबर गॅस प्लॅण्ट घातल्यामुळे जवळ जवळ ३८ टन जळणाची गरज गोबर गॅसने भागवली आहे. असे प्रयत्न अवर्षणग्रस्त प्रदेशात केले आहेत. म्हणजेच योग्य नियंत्रण केले, तर पाण्याची कमतरता काही प्रमाणात दूर होऊ शकते. महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी असे अभ्यास व्हायला पाहिजेत. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे काही मदत घेऊन जर आपण अभ्यास केला, फक्त एखादा नमुना दिला तरी त्याचा फायदा ग्रामीण महाराष्ट्राला होईल. असे मला वाटते.
जिथे आपण पाणी अडवलेले आहे. ते जिरवण्यासाठी नाही, तर ते पाणी, वापरण्यासाठी आहे. जे मोठे मध्यम आणि लघुप्रकल्प आहेत, त्यांचे प्रश्न एकमेकापासून वेगवेगळे आहेत. तिथे पाणी अडवा आणि त्यांचा योग्य वापर करा हे धोरण राबवावे. ह्या बाबतही ५-२५ प्रश्न आहेत. येथे त्यांची चर्चा करीत नाही.
धरणाची पाणी क्षमता अपेक्षेप्रमाणे नाही
मी धरणांचा अभ्यास केला आहे म्हणून सांगतो. पाणी साठविण्यासाठी बांधलेल्या धरणांची क्षमता काय आहे ? येथे किती पाणी एका वर्षात साठते ? त्याची घनक्षमता काय ? दोनच गोष्टी लक्षात घ्या. साठण्याची शक्ती किती आहे ? आज जे धरण आहे. गेली दोन वर्षेही वाईट गेली आहेत. हे मी मान्य करतो. पण गेल्या ३० वर्षाची जर तुम्ही आकडेवारी पाहिली तर त्या ३० वर्षामध्ये हे धरण फक्त चार वर्षेपूर्ण भरलेले होते. ज्याला आपण ७५ टक्के विश्वासार्हता म्हणतो. म्हणजे १० वर्षामध्ये ७॥ वर्ष भरणारे आहे की २० वर्षात फक्त २० टक्केच भरलेले आहे ? याचाच अर्थ असा की ८० वर्षे ते भरणार नाही. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही पाण्याचे वाटप कसे करणार ? याचाही विचार करावा लागेल. मी पाणी क्षमतेबद्दल बोलत आहे. पाणी क्षमता म्हणजे एवढी आपली सिंचनक्षमता आहे. पण एवढ्या सिंचनक्षमतेचा वापर होत नाही. याच्यात शेतकर्यांचा दोष नसून तो सरकारी अधिकार्यांचा आहे. म्हणजे कॅनॉल्स वगैरे त्यांचा. ह्या दोषांची एक किंवा दोन उदाहरणे सांगतो.