ऋणानुबंध (71)

कृष्णाकाठ धुंडाळावा, डोंगरद-यांतून हिंडावे, निसर्गशोभा लुटावी, हा माझा छंद जुना आहे. या छंदापायी तरुणपणी कराडच्या जवळचे आणि लांबचे अनेक गड, किल्ले चढलो. वसंतगड, सदाशिवगड, मच्छिंद्रगड हे तर आमच्या परिसरातील गड. सातारचा अजिंक्यतारा, परळीचा सज्जनगड, कोल्हापूरजवळचा पन्हाळा या किल्ल्यांवरूनही सफरी केल्या. प्रतापगड, रायगडची मजल केली. गड आणि किल्ले चढण्याचा एक वेगळाच आनंद असावयाचा. किल्ला चढताना आणि चढून गेल्यावर त्या किल्ल्याचा निसर्ग आणि इतिहास यांचे तर दर्शन घडतेच, परंतु एकदा किल्ल्यावर चढून उभे राहिले आणि अवतीभोवती, सभोवार नजर टाकली, म्हणजे खालून वाहणा-या नद्या, पाण्याने भरलेली त्यांची पात्रे, नागमोडी वळणांचा त्यांचा तो मार्ग आणि तीरांवरील वृक्षांच्या रांगा पाहून मन हरखून जात असे.

शेतांची शोभा वेगळीच. काही शेतांतली पिके निघालेली, काहींतली उभी. मध्येच एखादे गवताचे, सरमडाचे, कडब्याचे बुचाड शिखरासारखे दिसायचे. एकाच गालिच्यावर निरनिराळ्या रंगांचे आणि आकारांचे पट्टे काढून गालिचा आकर्षक बनवितात, तसा हा शेतीचा अंथरलेला गालिचा उंचावरून मोठा सुंदर दिसतो. सृष्टीच्या रूपाने अशा वेळी मला वारक-यांचेच दर्शन घडायचे. कराडहून पंढरपूरला जाणारे वारकरी मी पाहत असे. वारक-याची पताका, गळ्यातला वीणा, खांद्यावरची पडशी, हातांतले टाळ, गळ्यातली माळ, डोक्यावरचे मुंडासे, प्रत्येकाचा रंग वेगळा. चेह-याचेही तसेच. कपाळावर बुक्क्याचा टिळा आणि इतरत्र गोपीचंदन. निरनिराळ्या रंगांच्या मुद्रा उठविलेल्या, पाहताक्षणीच निरागसता लक्षात यावी, पवित्र वाटावे, अशी एकूण ठेवण. डोंगरावरून शेतांचे, सृष्टीचे दर्शन असेच व्हावयाचे. जीवनातले ते दिवस सुगीचे वाटत असत.

हळूहळू ते दिवस मागे सरकले. विचाराने, कृतीने, मनाने राजकारणात राहून मी धावपळ करीत होतो. टप्पे ओलांडीत राजकारण पुढे चालले, तसा मीही जात राहिलो. भारत आता स्वातंत्र्याच्या टप्प्याजवळ येऊन पोहोचला होता आणि मी मुंबईत येऊन थांबलो होतो. कराडच्या प्रीतिसंगमाच्या आठवणी बाळगून आणि कृष्णाकाठाची प्रदक्षिणा करण्याचे स्वप्न मनात धरून, मुंबईत सरकारी कामे करीत होतो. भारत स्वतंत्र झाला आणि राजकारणात मला आणखी एक पुढची झेप घ्यावी लागली. प्रवासाची कक्षा आता थोडी रुंदावली.

कामानिमित्त दिल्लीला आणि अन्यत्र कुठे कुठे जात-येत होतो; परंतु संपूर्ण भारत अजून मनानेच पाहत होतो. मी धावत असताना, मन माझ्याही पुढे पळत राहिले. वर्षामागून वर्षे ही पाठशिवणी चालूच राहिली. भारतयात्रेचे प्रस्थान मी ठेवले, तेव्हाच ही पाठशिवणी थोडी थांबल्यासारखी वाटली; परंतु तोपर्यंत १९६२ साल उजाडले होते. वयाने जवळजवळ पन्नाशी गाठली होती. जबाबदारीच्या कामासाठी आता मला भारतभ्रमण करावे लागणार होते, समाधान होते, देशाटनाची इच्छा पूर्ण होत असल्याचे.