स्वातंत्र्याचा पहिला दिवस
स्वातंत्र्य ! जी कालपर्यंत एक अमूर्त कल्पना होती, ती आज मूर्त स्वरूपात येत होती. जे, काल एक स्वप्न होते, ते आज सत्य ठरणार होते. जो, कालपर्यंत एक संकल्प होता, तो आज सिद्ध होणार होता. कालपर्यंत गुलाम असलेला एक देश आज स्वतंत्र होणार होता. पारतंत्र्याचा काळोख संपून स्वातंत्र्याची मंगल प्रभात आज उगवणार होती.
अननुभूत आनंदाचा तो एक दिवस, कृतार्थ भावनेचा तो एक दिवस, आज अनेक वर्षांनंतरही माझ्या डोळ्यांसमोर ताजा आहे. अनेक वर्षे झाली. कालगणनेचे चक्र चालू आहे. अव्याहत चालू आहे, त्याची नोंदच आहे ती. ती चुकेल कशी? पण त्या दिवसाची आठवण झाली, की मनाचे हरिण केव्हाच त्या पवित्र दिवसापाशी जाऊन पोचते.
तो स्वातंत्र्यदिन लौकिकार्थाने दि. १५ ऑगस्ट खरा; पण दि.१४ ऑगस्टलाच आम्ही त्याच्या स्वागतासाठी सिद्ध झालो होतो. त्या दिवशी मध्यरात्री जुन्या सचिवालयाच्या इमारतीवर तिरंगा फडकणार होता. अधिकृत अशा त्या स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य कार्यक्रमाचे वेध, तसे म्हटले, तर सकाळपासूनच लागले होते. मी तेव्हा पार्लमेंटरी सेक्रेटरी होतो आणि त्या समारंभाला मला हजर राहावयाचे होते. आमचे बि-हाड तेव्हा मरीन लाइन्सजवळ होते. येणा-या-जाणा-यांची वर्दळ घरी तेव्हा खूप असायची. त्याही दिवशी सकाळपासून मित्रमंडळी येत-जात होती. गप्पा-गोष्टी चालल्या होत्या. विषय स्वातंत्र्याचाच होता. माझे काही मित्र, स्वातंत्र्य-लढ्यातले माझे सहकारी मुंबईतला स्वातंत्र्यदिन-सोहळा पाहण्यासाठी मुद्दाम आले होते; तेही घरी होतेच. एका धन्यतेच्या भावनेने आम्ही स्वातंत्र्याबद्दल गोष्टी बोलत होतो. हा दिवस इतक्या लवकर पाहायला मिळेलसे आम्हाला बेचाळीस साली काही वाटले नव्हते. पण आज स्वातंत्र्याची पहाट झाली होती. ती कोवळी उन्हे अंगावर खेळवत असतानाच आम्हाला आमच्या स्वातंत्र्याच्या लढाईतील काही प्रसंग आठवत होते, काही सहका-यांची याद येत होती. स्वातंत्र्य मिळाले, आता पुढच्या जबाबदा-या कोणत्या, त्याची चर्चा आम्ही करीत होतो.
गप्पागोष्टी चालल्या होत्या आणि माझ्या एका सहका-याने आम्हाला जवळजवळ सोळा वर्षे मागे खेचून नेले. आम्ही साज-या केलेल्या पहिल्या स्वातंत्र्यदिनाची आठवण निघाली होती. स्वातंत्र्य-चळवळीचा एक भाग म्हणून लाहोर काँग्रेसमध्ये संपूर्ण स्वातंत्र्याचा प्रस्ताव संमत झाला, त्या दिवशी, २६ जानेवारीला स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचे आदेश काँग्रेसने दिले होते. १९३० सालची २६ जानेवारी जवळ येत चालली होती. कराडमध्ये हा स्वातंत्र्यदिन कसा साजरा करावयाचा, याचा आम्ही काही तरुण मंडळी विचार करीत होतो. मी तर तेव्हा वरच्या वर्गातला शाळकरी विद्यार्थीच होतो; पण काँग्रेसच्या चळवळीत स्वत:ला लोटून दिलेले होते.