ऋणानुबंध (154)

उदारमतवादी केळकर

तात्यासाहेब केळकरांच्या जन्मशताब्दी महोत्सवात सहभागी होण्याचे मी आनंदाने मान्य केले. तरुणपणी त्यांनी लिहिलेले टिळक चरित्र व त्यानंतरचे त्यांचे लेखन कुतूहलाने मी वाचले आहे. केळकर हे पुण्याच्या बुद्धिवैभवाचे प्रतीक होते. महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनाचे ते आधारस्तंभ होते. आचार्य अत्र्यांनी म्हटल्याप्रमाणे केळकर-साहित्य हे केळकर-विद्यापीठच होते. अशा या चतुरस्रबुद्धीच्या व निर्मळ मनाच्या महापुरुषाला नव्या पिढीने आदरांजली वाहिली पाहिजे आणि जुन्या पिढीने थोड्याशा तटस्थपणे केळकरांचे पुनर्मूल्यमापन केले पाहिजे. जन्मशताब्दीचा उत्सव हा या दृष्टीने उपयुक्त असतो. समकालीन मूल्यमापनात ऐतिहासिक दृष्टी व तटस्थपणा नसतो. त्यामुळे परिस्थितीच्या फे-यात सापडणा-या किंवा परिस्थितीशी झुंज देणा-या सर्वच कर्तृत्ववान पुरुषांचे योग्य मूल्यमापन होत नाही.

मला वाटते, केळकरांचे इतिहासनिष्ठ न्यायबुद्धीने पुन्हा मूल्यमापन केले पाहिजे. केळकर हे अष्टपैलू व्यक्तित्वाचे, व्यापक बुद्धीचे व अनेकांगी कर्तुकीचे पुढारी होते. पण त्यांचे मूल्यमापन मात्र मुख्यत: त्यांच्या राजकीय जीवनाच्या अनुषंगाने झाले आहे. त्यामुळेच त्यांच्यावर काहीसा अन्याय झाला आहे. राजकारणातील आवेश, अभिनिवेश, पूर्वग्रह, त्या त्या काळचे वातावरण, या सर्वांमुळे राजकीय महापुरुषांचे अनेक सद्गुण झाकले जातात किंवा त्यांचे धूसर दर्शन होते. अनेकदा राजकीय पुरुष त्यांच्या कमी महत्त्वाच्या गुणांनी प्रसिद्धी पावतात. म्हणून राजकीय मापाने अशा अष्टपैलू व्यक्तीचे मूल्यमापन करणे हे तर्कदुष्ट व अशास्त्रीय आहे. केळकरांसंबंधी आता विचार करताना त्यांच्या काळातील विचारकलह, राजकीय संघर्ष व राजकीय तणाव मनात ठेवता कामा नयेत. स्वत: केळकरांनी आपल्या आत्मचरित्रात व वेळोवेळी केलेल्या भाषणांत उत्कृष्ट, प्रांजल आत्मपरीक्षण केले आहे, ते आपण मानले पाहिजे. एखादा मनुष्य आपले जीवन जगतो, आपल्या बुद्धीप्रमाणे व कुवतीप्रमाणे स्वत:चे स्थान निर्माण करतो आणि आयुष्यात शेवटी त्याचे विहंगमावलोकन करतो. तसे केळकरांनी अत्यंत रमणीय भाषेत हे आत्मपरीक्षण केले आहे. त्यात नितळपणा आहे.

केळकरांविषयी जी वादळे उठली, त्यांच्या लोकप्रियतेचे जे चढउतार झाले, त्यांमागे तत्कालीन राजकीय वातावरण जसे होते, तसे त्यांचे व्यक्तिमत्त्वही होते. मला वाटते, केळकरांचे व्यक्तित्व, त्यांचे मन, त्यांची बुद्धी, त्यांचे जीवनकार्य अत्यंत सुसंगत व संघटित होते. केळकरांनी स्वत:च्या मर्यादा जाणल्या होत्या. स्वत:ची प्रवृत्ती काय आहे, हे त्यांना माहीत होते. त्यांनीच स्वत: माणसांचे तीन प्रकार कल्पिले आहेत : एक आज्ञाकारक, दुसरा आज्ञाधारक आणि तिसरा स्वातंत्र्यप्रिय. केळकर हे तिस-या प्रकारच्या मनुष्यस्वभावाचे होते. त्यांनीच म्हटले आहे, 'स्वातंत्र्यप्रिय हे कोणाचे धनी किंवा कोणाचे गुलाम म्हणून राहू इच्छीत नाहीत. त्यांना आपल्या स्वातंत्र्यप्रेमाची किंमत द्यावी लागते आणि ही किंमत म्हणजे हुकमी सत्तेची अभिलाषा सोडणे किंवा प्रसंगविशेषी बाजूला पडण्याची, मागील बाकावर बसण्याची मनाची तयारी ठेवणे ही होय.' केळकरांनी ही किंमत दिली. त्यांनी स्वत: म्हटले आहे, की 'मी सत्ताभिलाषी असतो, तर गांधींच्या धोरणाला विरोध केला नसता किंवा केसरी ट्रस्टचा अधिकार आपण होऊन सोडला नसता.' दुसरे असे, की स्वातंत्र्यप्रिय माणसाला - विशेषत:, विचारवंताला - लोकप्रियतेविषयी उदासीन राहावे लागते. कारण सदैव लोकांना प्रिय होईल, असे बोलणे वा लिहिणे अशा व्यक्तींना अशक्य असते. जनतेच्या अनुनयापेक्षा उद्बोधनाकडे त्यांचे लक्ष असते, तेव्हा स्वतंत्र प्रज्ञेच्या विचारवंताला, लेखकाला त्याचीही तयारी ठेवावी लागते.