पंडित नेहरूंचा तो प्रश्न मला एवढा अकल्पित होता, की मी क्षणभर स्तिमितच झालो होतो. 'हो' किंवा 'नाही' असे या प्रश्नाचे तातडीने उत्तर देणे फारच अवघड होते. त्यातून हा विषय इतर कोणाशी बोलायचा नाही, असे बंधन खुद्द पंडितजींनीच माझ्यावर घातले होते, त्यामुळे मी कोणाशी बोलूही शकत नव्हतो.
पंडितजींना मी म्हटले,
'तुमचा प्रश्न एवढा अनपेक्षित आहे, की मला चटकन् निर्णय ठरविणे फारच कठीण आहे. तुम्ही ज्या आग्रहाने मला बोलावीत आहात, तो पाहून तर माझी स्थिती अधिकच अवघड झाली आहे.'
पं. नेहरू म्हणाले,
'तुम्ही आत्ताच उत्तर द्या, असा माझा आग्रह नाही. विचार करून, दोन दिवसांत कळविले, तरी चालेल. पण हे पाहा, सुरुवातीला मी बोललो, ते ध्यानात ठेवा. कोणाशी बोलू नका.'
त्यांच्या सूचनेवर मी गमतीने म्हटले,
'जवाहरलालजी, ही तुमची अट पाळणेसुद्धा मला फार कठीण आहे. निदान एका व्यक्तीशी तरी मला बोललेच पाहिजे. ते टाळता येणे अशक्य आहे.'
किंचितशा रागावलेल्या स्वरात पंडितजींनी विचारले,
'अशी कोण व्यक्ती आहे, की जिच्याशी हा विषय बोलल्याशिवाय तुमचे निभणार नाही?'
मी चटकन् उत्तर दिले,
'पंडितजी, मुंबई सोडून दिल्लीला यावयाचे, तर निदान मला माझ्या पत्नीला तर विचारले पाहिजे.'
अगदी मोकळ्या मनाने हसून पंडितजी म्हणाले,
'बरोबर आहे. सौ. चव्हाणांशी तुम्ही जरूर बोला. मला एक-दोन दिवसांत कळवा. तुमच्या फोनची मी वाट पाहत आहे.'
पंडितजींच्या मनाच्या मोकळेपणाच्या किती तरी हकिगती आज माझ्या मनात दाटून येत आहेत. आणखी एक आठवण, प्रतापगडच्या मोर्च्याच्या वेळची येथेच सांगून टाकतो. पुण्याहून आम्ही प्रतापगडाकडे निघालो. राज्यपाल श्रीप्रकाशजी एका कडेला, मध्ये मी व दुस-या कडेला पंडितजी असे आम्ही गाडीत बसलेलो होतो. वाई जवळ आली तसे पंडित नेहरूंना कडेला बसू न देता मध्ये बसवावे, असे माझ्या मनात आले व मी तसे पंडितजींना म्हटले. वाईजवळ निदर्शने होणार, निदर्शकांची गर्दी रस्त्यावर असणार, तेव्हा कडेला पंडितजी असू नयेत, हा माझ्या म्हणण्यातील अर्थ त्यांच्या बरोबर ध्यानात आला होता. पंडितजी म्हणाले,
'गैरसोयीच्या जागी आम्ही दोघे बसलो आहो. आमच्यापैकी जास्त वृद्ध कोण आहे, त्याने प्रथम सोयीच्या जागेवर बसावे.' असे म्हणून श्रीप्रकाशजींना त्यांनी कडेच्या जागेवरून मध्ये बसविले आणि आपण स्वत: त्याच जागी बसून राहिले.