• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

ऋणानुबंध (57)

साशंकतेचे आणखी एक कारण होते. ते म्हणजे कारभारावरील अधिकारीवर्गाच्या पकडीचे. तेव्हाचे मुरब्बी अधिकारी होते कार्यक्षम, हुशार. पण सत्तांतरापलीकडे स्वातंत्र्याचा जो अर्थ आम्हाला अभिप्रेत होता, त्याच्याशी ते समरस झालेले नव्हते. होण्याची शक्यता दिसत नव्हती व तसा विश्वास वाटत नव्हता. त्या वेळी घडलेले काही प्रसंग, काही पेचप्रसंग, अधिका-यांशी झालेले वाद आठवत होते.

आणखी काही लोकांची सत्तेवर पकड वाढणार की काय, अशी भीती वाटू लागली होती. आम्ही जेव्हा लढत होतो, तेव्हा ज्यांचे चेहरे कधी दिसले नव्हते, त्यांच्या अंगांवर खादीचे कपडे चढले होते. सत्तेच्या नेहमीच जवळ वावरणारे हे लोक आमच्या पक्षात दिसू लागले होते. थोड्याच वेळापूर्वी असे काही चेहरे सचिवालयाच्या हिरवळीवर पाहिलेले नजरेसमोर येत होते आणि स्वातंत्र्याचा अर्थ हे लोक सार्थ करून देतील का, असे वाटत होते.

या सगळ्याचा परिणाम पक्षावर होताना मला स्पष्ट दिसत होता. पक्षात जोरात वादविवाद चालू झाले होते. नुकतीच आमच्या गप्पांत झालेली चर्चा ताजी होती. काही कार्यकर्त्यांच्या बैठका झाल्याच्या बातम्या येत होत्या. त्यांचे वृत्तान्त कळत होते. निमंत्रणे मिळत होती. एकीकडे आता जो शेतकरी कामगार पक्ष म्हणून प्रसिद्ध आहे, त्याच्या स्थापनेची तयारी चाललेली दिसत होती. काँग्रेस सोशॅलिस्ट पक्षाचे पायही रिंगणाबाहेर पडणार, असे वाटू लागले होते. पक्षांतर्गत संघर्षाची चाहूल लागली होती.

या सगळ्या गोष्टी, विचाराच्या आवर्तात घोंगावत होत्या, पण त्याच वेळी म. गांधी, पं. नेहरू यांच्या नेतृत्वाचा आधार वाटत होता. स्वातंत्र्ययुद्धाचे हे सेनानी, ज्यांनी राजकीय बदल घडविला, ते आर्थिक व सामाजिक बदल घडविल्याशिवाय राहणार नाहीत, असे मनोमन वाटत होते. तोच दिलासा होता. तेच सामर्थ्य होते. आतापर्यंतच्या निराशेच्या ढगातून प्रकाशाची रुपेरी कडा या दोघा नेत्यांच्या स्मरणातून मनात चमकून गेली आणि मनाला थोडी स्वस्थता मिळाली. विश्वासाने मी स्वत:शीच म्हणालो :

चला, पहिली मजल संपली, एक चढ चढून आलो, आता पुढल्या चढाईची वाटचाल सुरू.