• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

ऋणानुबंध (55)

आज बरीच वर्षे लोटली. मरीन लाईन्समधून आम्ही मलबार हिलवर गेलो आणि गेली काही वर्षे आमचे बि-हाड दिल्लीला आहे. घराच्या जागा बदलल्या. कालमानानुसार घरातले फर्निचर बदलले. अनेक कलावस्तूंचीही भर पडली. पण बदलली नाही अशी एकच वस्तू म्हणजे म. गांधींचा तो फोटो.

या फोटोचा विषयच निघाला, म्हणून सांगायला हरकत नाही. सौ. वेणूबाईंची त्या फोटोवर अपरंपार श्रद्धा जडलेली आहे. का, कोणास ठाऊक, त्या फोटोला ती कधीही नजरेआड होऊ देत नाही, फुटू नये, म्हणून तिने त्याची काच काढून ठेवली आहे, प्रवासाला निघाली तर म. गांधींची ती तसबीर तिच्या सामानात हलक्या हाताने, कपड्याच्या घडीत जपून ठेवलेली असते.

म. गांधींची तसबीर लावली आणि थोड्याच वेळात एका सभेसाठी मी भायखळ्याला गेलो. जागा आता नक्की आठवत नाही. पण बहुधा डिलाईल रोडवरील चाळ असावी. सातारा जिल्ह्यातील कामगारांनी स्वातंत्र्यदिनाची सभा ठेवली होती. एक स्वातंत्र्य-सैनिक म्हणून स्वातंत्र्यदिनाच्या त्या सभेत भाग घेताना मला अतिशय आनंद झाला होता. माझे भाषण लोकांना कसे वाटले, कोणाला ठाऊक, पण मला ते अजून आठवते आहे. एका भारावलेल्या मन:स्थितीत मी भाषण संपवून बसलो होतो. म. गांधींच्या तसबिरीचा विषय ताजा होता. म. गांधींच्या नेतृत्वाबद्दल, त्यांच्या शिकवणुकीबद्दल त्या सभेत मी बरेच काही सांगितले. त्या दिवशी मी अगदी गांधीमय होऊन गेलो होतो.

सभा संपवून मी घरी निघालो. रात्रीच्या मुख्य समारंभाला हजर राहण्याची घाई होती. सभेला मी आलो, तेव्हा ध्यानात न आलेली एक गोष्ट आता दिसत होती. लोकांचे जथेच्या जथे आनंदोत्सवात भाग घेण्यासाठी निघाले होते. रोशणाई झाली होती. स्वातंत्र्याचे वारे संचारले होते. एक गुलाम देश स्वतंत्र झाला होता. आजच्या पिढीला या आनंदाची कल्पना सांगूनही येणार नाही. एक प्रकारच्या बेहोशीतच मी घरी पोचलो होतो. स्वातंत्र्य घोषित व्हायला आता अवघे दोन तास उरले होते. उत्कंठा, औत्सुक्य, उत्साह, समाधान, इत्यादी भावनांचे अमृतमय रसायन या दोन तासांत इतके उदंड भरले होते, की विचारू नका. थोड्याच वेळाने जुन्या सचिवालयात मी पोचलो. ओव्हल मैदानाच्या बाजूला जी चिंचोळी बाग, त्या बागेत आम्ही उभे होतो. बाळासाहेब खेर मुंबई राज्याचे मुख्यमंत्री होते. जुन्या सचिवालयाच्या पोर्चवर त्यांनी राष्ट्रध्वज फडकावला, विश्वविजयी प्यारा तिरंगा वायुलहरींवर डोलू लागला. भारत स्वतंत्र झाल्याची ती निशाणी होती. ध्वजवंदन झाल्यावर, मला वाटते, बाळासाहेब खेरांचे थोडा वेळ भाषण झाले. आज त्या भाषणातले मला काहीच आठवत नाही. झेंडावंदनाच्या वेळची धुंदी, हर्ष मात्र, आज अनेक वर्षे झाली, तरी डोक्यात घर करून बसला आहे. पुढे अनेक महत्त्वपूर्ण प्रसंगी झेंडावंदने झाली. मी राज्याचा मुख्यमंत्री झालो, तेव्हा झेंडावंदन झाले. संरक्षणमंत्री म्हणून लाल किल्ल्यावर होणा-या झेंडावंदनाच्या समारंभाचे यजमानपदही मी भूषविले. पण जुन्या सचिवालयाच्या छोट्याशा हिरवळीवर झालेले स्वतंत्र भारतातील पहिले झेंडावंदन अजूनही आठवते.