• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

ऋणानुबंध (46)

ब्रिटिश सरकारने दहशतीचे व दडपशाहीचे वातावरण तीव्र करण्याचेच धोरण स्वीकारल्याबरोबर जनतेची प्रतिक्रियाही तितक्याच तीव्रतेने दिसू लागली. सरकारच्या दडपशाहीला समर्थपणे तोंड देण्यासाठी सर्व कार्यकर्ते दंड थोपटून उभे राहिले. येथून सातारा जिल्ह्यातील लढ्याचा दुसरा टप्पा सुरू झाला. सर्व राष्ट्रीय नेते तुरुंगात होते. अधिकृत मार्गदर्शन मिळत नव्हते. तथापि, श्री. अण्णासाहेब सहस्रबुद्धे आणि श्री. अच्युतराव पटवर्धन यांचे मार्गदर्शन मिळत होते. तरीही प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक कार्यकर्त्यांनाच आपापले कार्यक्रम ठरवावे लागत होते. यामुळे एक मोठा फायदा झाला. तो असा, की यानिमित्ताने अनेक धडाडीचे तरुण पुढे आले. नेतृत्व करू लागले. अशा धाडसी तरुणांचे गट तयार झाले. या गटांनी रेल्वे-स्टेशनवर हल्ले करणे, खजिना लुटणे, शस्त्रे पळविणे यांसारखे प्रखर कार्यक्रम हाती घेतले. ब्रिटिश सरकारशी प्रसंगी दोन हात करण्याची तयारी असावी, हा हेतू होता. ब्रिटिश सरकार खिळखिळे करणे एवढेच ध्येय त्यांच्यापुढे होते. कराडच्या आसमंतात लक्ष्मणराव धन्वंतरी, काशिनाथ शेटजी, सदाशिव पेंढारकर, महादेवराव जाधव, भिकूबा साळुंखे, बाबूराव कोतवाल अशी किती म्हणून नावे सांगावीत? त्यांच्या त्या वेळच्या धडाडीचे कौतुक करायला शब्द अपुरे पडतात.

त्याचबरोबर जिल्ह्याचे नेतृत्व करायला श्री. नाना पाटील, श्री. किसन वीर, श्री. पांडू मास्तर, श्री. नागनाथ नायकवडी, श्री. जी. डी. लाड, बर्डेमास्तर, श्री. वसंतरावदादा यांच्यासारखे जबरदस्त व कणखर कार्यकर्ते चळवळीच्या पाठीशी होते. यांच्यापैकी एकेकाचे कर्तृत्व सांगायचे, तर स्वतंत्र पुस्तक लिहावे लागेल. स्वातंत्र्य-चळवळीतील सातारा जिल्ह्याची भूषणे म्हणून यांचा उल्लेख करायला हरकत नाही. श्री. किसन वीर पकडले गेले, याचे आमच्यापेक्षा त्यांनाच जास्त दु:ख झाले. ही गोष्ट त्यांना इतकी लागली, की सहा आठवड्यांच्या आत हा मनुष्य तुरुंग फोडून इतर सहका-यांसह बाहेर आला. श्री. वसंतरावदादाही असे बहादुरीने तुरुंग फोडून बाहेर आले. श्री. नाना पाटलांच्या कथा तर सातारा जिल्हा हजारो जिभांनी अजून सांगतो.

ब्रिटिश सरकार या सर्वांच्या मागे हात धुऊन लागले होते. त्यासाठी निरनिराळे मार्ग अवलंबिण्यात येत होते. सरकारची खुशमस्करी करणारा एक वर्ग समाजात नेहमी अस्तित्वात असतो. तसा त्या वेळीही होता. अशा सरकारधार्जिण्या लोकांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या संबंधांत अनेक गुन्हे केले. गावात अत्याचार केले, अनैतिक प्रकार केले. पोलीस त्यांना पाठीशी घालीत असल्यामुळे त्यांना कुणाची भीती वाटेनाशी झाली. सामान्य जनतेला त्यांच्यापासून उपद्रव होऊ लागला, तेव्हा ज्या जनतेने भूमिगत कार्यकर्त्यांना मोठ्या मायेने वागविले होते, त्या जनतेचे संरक्षण करणे कार्यकर्त्यांना आपले कर्तव्य वाटले. म्हणून अशा गुन्हेगारांना पकडून शिक्षा करण्याचे कार्य भूमिगत कार्यकर्त्यांना अंगावर घ्यावे लागले. अशा रीतीने गुन्हेगारांना शासन करणारे प्रतिसरकार सातारा जिल्ह्यात स्थापन झाले. पत्री सरकार हे त्याचे अतिशयोक्त वर्णन होय. हे प्रतिसरकार स्थापन झाले तरी त्याचे मूलभूत धोरण हेच होते, की मुद्दाम कुणाला ठार करावयाचे नाही आणि खाजगी मालमत्तेला हात लावायचा नाही. फक्त समाजाविरुद्ध व स्वातंत्र्य-चळवळीविरुद्ध गुन्हे करणा-यांना योग्य ती शिक्षा देण्यासाठीच या प्रतिसरकारचा जन्म झाला होता.