• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

ऋणानुबंध (44)

पहाटे सर्व राष्ट्रीय नेत्यांची धरपकड झाली. आमचीही वॉरंटे आमच्या स्वागतासाठी तयार असणार, याची खात्री होती. म्हणून मुंबईहून एकेकट्याने गुपचूप परत जावे, असे ठरले. त्याचबरोबर जिल्ह्यात गेल्यानंतर हाती घ्यावयाच्या कार्यक्रमाबद्दलही आम्ही खूप विचार केला. आमच्यापुढे दोन पर्याय होते. एक म्हणजे, ब्रिटिश सत्ता खिळखिळी करण्यासाठी त्या सत्तेला आधारभूत असलेल्या गोष्टींचा विध्वंस करणे किंवा स्वातंत्र्यलढ्याचा संदेश जनतेपर्यंत नेऊन तिला लढ्यासाठी संघटित करणे. माझ्या दृष्टीने दुसरा पर्याय महत्त्वाचा व आवश्यक होता आणि तोच आम्ही स्वीकारला. तेथूनच सातारा जिल्ह्यातील लोकविलक्षण स्वातंत्र्य-लढ्याला सुरुवात झाली.

माझ्या दृष्टीने या लढ्याचे दोन टप्पे पडतात. पहिला टप्पा जागृत जनतेने उठविलेल्या आवाजाचा आणि दुसरा टप्पा ह्याच जनतेने ब्रिटिश सरकारच्या दडपशाहीला दिलेल्या प्रत्युत्तराचा. अर्थात पहिल्या टप्प्याशी माझा फार निकटचा संबंध होता. आम्ही भूमिगत बनून जिल्ह्यात परत आलो, तरी भूमिगत आहोत, असे काही वाटत नव्हते. कारण आम्ही उजळ माथ्याने फिरत होतो. सभा घेत होतो. बैठकी घेत होतो. याचे रहस्य म्हणजे स्थानिक पोलिसांची आम्हाला असलेली सहानुभूती व जनतेचा पाठिंबा हेच होते. जिल्ह्यात येऊन आम्ही कामाला लागलो. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मोठमोठे मोर्चे काढावयाचे. ब्रिटिश सत्तेचे प्रतीक असलेल्या मामलेदार कचेरीवर हे मोर्चे न्यावयाचे आणि प्रत्येक कचेरीवर काँग्रेसचा झेंडा लावावयाचा, असा कार्यक्रम ठरला. हा कार्यक्रम साधा वाटला तरी त्यामागे बराच अर्थ होता. मोर्च्याच्या रूपाने स्वातंत्र्य-लढ्याचे लोण समाजातल्या सर्व थरांत पोचणार होते. अनेकांना स्फुरण चढणार होते आणि आपण प्रत्यक्ष ब्रिटिश सत्तेच्या मर्मस्थानावर घाव घालीत आहोत, ही भावना जनतेमध्ये निर्माण होणार होती.

ह्या मोर्च्यांनी सबंध जिल्ह्यातील वातावरण पालटले, स्वातंत्र्याच्या जाणिवेची एक प्रबळ लाट सर्व तालुक्यांत निर्माण झाली. अनेक नवे तरुण पुढे आले. ज्यांचा चळवळीशी सुतराम संबंध नव्हता, अशा सामान्य तरुणांना चेतना मिळाली. तासगावचा मोर्चा श्री. पागे यांनी यशस्वी केला. तेथे तर खुद्द मामलेदार मोर्च्याचे स्वागत करण्यासाठी पुढे आला. कराडलाही श्री. बाळासाहेब उंडाळकर यांच्या नेतृत्वाखाली असेच यश मिळाले. आमची उमेद वाढली. पण लगेच ब्रिटिश सरकारने दडपशाहीचे धोरण स्वीकारले. तरीही लोकांची जिद्द कमी झाली नाही. वडूजच्या प्रचंड मोर्च्यावर गोळीबार झाला. नऊ माणसे त्यात दगावली. हुतात्मा परशुराम पहेलवान अमर स्मृती ठेवून गेले. इस्लामपूरच्या मोर्च्यावरही असाच निर्घृण गोळीबार झाला. मला आठवते, त्या गोळीबारात किर्लोस्करवाडीला इंजिनीअर असलेला पंड्या नावाचा तरुण बळी पडला. वास्तविक त्याचा चळवळीशी काहीही संबंध नव्हता. पण तो सर्वस्व झुगारून देऊन मोर्च्यात सामील झाला होता. अशी किती तरी नावे सांगता येतील.