• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

ऋणानुबंध (42)

पं. जवाहरलाल यांच्यावरही माझी अशीच श्रद्धा होती. परमेश्वर म्हणून कोणी व्यक्ती आहे, यावर माझी श्रद्धा नसेलही. नास्तिक म्हणवून घेण्यातच मोठेपणा मानण्याचे एक वय असते. मीही त्या वयातून, त्या भावनेतून गेलो आहे. पण आज माझी प्रार्थनेवर श्रद्धा आहे, हे कबूल केले पाहिजे. आपले जीवन शुद्ध राहावे, सद्विचार मनात यावेत, समाजाची सेवा करण्याची संधी मिळावी, अशी माझी नित्य प्रार्थना असते. प्रार्थनेसाठी, समोर काही प्रतीक असलेच पाहिजे, असाही माझा आग्रह नसतो आणि नाही. आई-वडील यांच्या तसबिरीसमोर उभा राहूनच मी ही प्रार्थना करतो. बाहेर कुठे असलो, तर महात्मा गांधींची तसबीरही त्यासाठी मला पुरते. दगडात देव आहे, असे मी कधीच मानले नाही; परंतु हे म्हणत असताना पंढरीच्या विठ्ठलासमोर किंवा प्रतापगडावर भवानीमातेसमोर उभे राहून नमस्कार करण्यानेही मनाला एक आगळे समाधान वाटते. ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास, छत्रपती शिवाजी यांच्यासारखे महापुरुष या मूर्तींसमोर उभे राहिले होते, याचा एक वेगळा आनंद वाटतो, हे मान्य करायलाच हवे. माझी ही आस्तिकता-नास्तिकता माझ्यापुरतीच मर्यादित आहे. मी कोणावर ती लादीत नाही आणि लादायचीही नाही. माझी पत्नी सौ. वेणूबाई यांची साईबाबांवर नितांत श्रद्धा! मीही त्यांच्याबरोबर कधी कधी दर्शनाला जातो. सौभाग्यवतीची हौस पूर्ण करतो. पण त्यांना 'त्यात काय?' असे व्याख्यान देत नाही. त्यांच्या आनंदातच सहभागी होतो.

नाही म्हटले तरी राजकारणातल्या मोठेपणाची बंधने आज सभोवती आहेत. मनाला मुरड घालावीच लागते. जुने छंद आठवायचे आणि नव्या छंदात गुंतवून घ्यायचे, तेही मुक्तपणाने नव्हे - एवढेच आज करता येते. छंद म्हणा हवे तर, पण सश्रद्ध जीवन जगायचे, हा माझा आजचा छंद आहे. आईच्या तसबिरीसमोर रोज उभे राहिले, की श्रद्धा साकार होत आहे, असा साक्षात्कार घडतो. तोच आनंद ! तेच सार्थक !!

जीवनाची गंगा वाहत असते. गंगौघात काटेकुटे, गदळ, रेती, सतत मिसळतच असते. वाहत्या ओघातून काटेकुटे आपोआपच तीरावर ढकलले जातात. निसर्ग, नियतीच ते करीत असते. गंगौघ शुद्ध राहावा, मानवी मनावर त्याचा संस्कार घडावा, ही नियतीचीच रचना आहे. आनंद असतो, तो असा जीवनौघ मागे वळून पाहण्यात !