मला असे पुष्कळ छंद होते.
मनमुराद संगीत ऐकावे, गाणे ऐकावे, या माझ्या छंदापायी मी भजनी मंडळात जात असे. संगीत भजनासाठी मी रात्र रात्र जागलो आणि हिंडलो. भजन म्हटले, टाळ वाजवले, नाचलो, मला चांगले आठवते, शिवजन्मोत्सवासाठी म्हणून सातारा, सांगली, कोल्हापूर येथील भजनांचे फड मी कराडात भरवले. कोल्हापूरचे कृष्णा बागणीकर, तसेच, म्हैसूरकर महाराज, भागवतबुवा, बाबा आळतेकर, पंढरीनाथ यांच्यासारखे अप्रतिम संगीत भजन गाणारे, औंधच्या दाजी गुरवासारखे पखवाजवादक यांनी रात्रीच्या रात्री जागविल्या. त्या हरिजागरात माझ्या किती तरी रात्री मी स्वच्छंदपणे घालविल्या. हजारो माणसे त्यासाठी रात्रीच्या रात्री जागवत.
नाटके पाहण्याचा छंदही असाच मनमुराद केला. नाटकासाठी कराडहून कोल्हापूरला जावे जागे. मला नेण्याचे माझ्या एका शिक्षक स्नेह्याने कायमचेच ठरविले होते. सोबत म्हणून ते मला मोटारीने नेत असत. गंधर्व मंडळी, पेंढारकरांची ललितकलादर्श मंडळी यांची नाटके कराडला येत नसत. कोल्हापूरला आम्ही ती पिटात बसून पाहिली. त्याचबरोबर नाटकांच्या वाचनाचा शौक केला. गडकऱ्यांच्या नाटकांतले संवाद माझ्या तोंडपाठ होते. 'राजसंन्यास' मधला तर एक सबंध प्रवेशच मी पाठ केला होता. त्यांच्या भाषेचा आणि त्या विषयाचा मनावर मोठाच परिणाम होत असे. अर्थात हे सर्व राजकारणाची ओढ लागण्यापूर्वीच !
संस्कृतचा असाच एक भारी छंद मला जडला. कराडच्या आमच्या टिळक हायस्कूलचे हेडमास्तर होते श्री. द्विवेदी या नावाचे. ते रहिमतपूरचे. संस्कृतमध्ये वाचावे, बोलायला, लिहायला शिकावे, असा माझा प्रयत्न. द्विवेदींचे लक्ष माझ्या या छंदाने वेधून घेतले होते. वर्गातल्या मुलांच्या बरोबरीने माझी संस्कृतची वाटचाल चालू असायची.
पुढे पुढे वर्गातल्या काही मुलांनी, संस्कृतसाठी गावातल्या शास्त्री-पंडितांची घरे गाठली. असे एखादे घर गाठणे प्रयत्न करूनही मला जमेना. म्हणजे माझी तयारी होती; पण ते जमले नाही, एवढे खरे. म्हणून मॅट्रिकला असताना मी संस्कृतवर प्रभुत्व मिळविण्याचा नाद सोडला आणि चक्क 'मराठी' घेतले. त्यात उत्तम रीतीने उत्तीर्ण झालो. म्हणून काही संस्कृतची गोडी संपली नव्हती. त्या वेळी आमच्यांत 'रघुवंश' की 'मेघदूत' असा पाठांतराबद्दल वाद असे. मला 'मेघदूत'ने मोहून टाकले होते. 'मेघदूत'च्या कल्पनेनेच माझे मन भारावले होते. मेघाबरोबर निरोप पाठविण्याची ती कल्पनाच मनाचा ठाव घेणारी, निम्मे-अर्धे मेघदूत मी पाठ केले. देवराष्ट्रात शेतावर जाताना मी 'मेघदूत' घेऊन जायचा. शेताच्या कडेने झुळझुळ वाहणारा 'सोनहिरा', आंब्याची गर्द आंबराई, चैत्र-वैशाख-ज्येष्ठाचे ते दिवस. आंब्यावर कुठे तरी बसलेली कोकिळा कुहूऽकुहू करायची आणि 'आषाढस्य प्रथम दिवसे .... ' माझे पाठांतर सुरू असायचे. विरहाने व्याकूळ झालेल्याचा तो मेघाबरोबरचा निरोप म्हणताना मन मोहून जायचे. नकळत दृष्टी आकाशाकडे जायची. चैत्र-वैशाख महिना. डोळ्याला तो निरोप्या दिसायचा नाही. पण आंबराईतल्या सुगंधाने मोहरलेल्या मनाने कुठे तरी असलेल्या मेघाला तो निरोप ऐकू जाईल, अशा आवाजात म्हणत राह्यचे, हाच आनंद.