• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

ऋणानुबंध (26)

माझी आई तशी शाळेतली सुशिक्षित नव्हे. पण देवराष्ट्राच्या सगुण मातीचे गुण घेऊन ती वाढलेली होती. ती घरातली मोठी, तशी मनानेही मोठी ! तिने आयुष्यात कोणाचा राग केला नाही, रखरख केली नाही, द्वेष केला नाही. मनाने धार्मिक आणि वृत्तीने सरळ; आयुष्यात तिच्या वाट्याला दु:खच फार आले; आणि तरी ती सोशीक राहिली. ती सरळ आणि सोशीक होती, हे तिच्या म्हातारपणी मला एकसारखे प्रतीत होत असे. सरळ हृदयाची म्हातारी माणसे काही चांगले ऐकले-पाहिले की प्रेमाश्रूंचा वर्षाव करू लागतात. त्यांचे डोळे पाणावतात. हे आपोआप घडते. मी अनेकदा हे अनुभवले आहे आणि त्या आनंदाश्रूंनी भिजलो आहे.

आमच्या घरची तशी गरिबीच. वडील १९१७ सालच्या तापसरीत वारले. मागे कुणाचा आधार नाही. आम्ही तीन भावंडे आणि एक बहीण. वडील वारले, तेव्हा मी चार वर्षांचा आणि सर्वांत थोरले बंधू सतरा-अठरा वयाचे. विट्याला थोडी शेती, पण ती अर्धपोटी राहण्याइतकी ! खेड्यात याचे कुणास काही वाटत नसे, सर्वच माणसे तशी ! त्यांच्यातीलच एक आम्ही ! फरक होता, तो घरच्या संस्कारांचा ! संपत्तीने नसली तरी संस्काराने आई श्रीमंत होती आणि ती श्रीमंती आम्हा मुलांपर्यंत पोचविण्याचा तिचा सततचा प्रयत्न होता. 'ईश्वर आपल्या पाठीशी आहे' ही तिची निष्ठा होती. या निष्ठेनेच तिने जीवनभर संकटांशी सामना केला. हिंमत सोडू नये, असा उपदेश करताना ती म्हणत असे -

'नका, बाळांनो, डगमगू
चंद्र-सूर्यावरील जाई ढगू ॥'

पहाटे दळण दळताना तिच्या हलक्या मांडीवर झोपून पृथ्वीमोलाचा संदेश देणारी आईची ही ओवी मी किती तरी वेळा ऐकली आहे. ओव्या म्हणण्यात ती रंगून जात असे. पुढे पुढे ती नव्या नव्या ओव्या रचून म्हणू लागली होती. निदान शे-पाचशे ओव्या तिने रचल्या आणि म्हटल्या. ही ओवी त्यांपैकीच एक आहे आणि माझ्या मोठेपणीही तिने मला ही ऐकविली आहे. रामायण-महाभारतातल्या कथांचे सार ह्या तिच्या ओवीत असे.

मला आठवते, कराडला मारुतीबुवांच्या मठामध्ये ती रामायण ऐकायला जात असे. आठ-नऊ  वर्षांचा असताना ती मलाही बरोबर नेत असे. त्या काळात या मठामध्ये नाशिककरबुवा म्हणून एक प्रख्यात पुराणिक पुराण सांगत असत. व्यासंग मोठा, वाणी रसाळ, प्रतिपादनाची हातोटी सुरेख - यांमुळे बुवांच्या तोंडून रामायण ऐकण्यासाठी मठ भरलेला असे. याच काळात मी मन लावून रामायण ऐकले. रामायणाच्या कथेतील सर्व ऋषिमुनी, देव व स्त्रिया यांचे उठावदार वर्णन बुवा मोठे झोकदार करीत असत.