• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

ऋणानुबंध (22)

अगदी अलीकडे मी अनुभवलेला आनंदाचा व आशेचा क्षण असाच अनपेक्षितपणे आला. १९७७ च्या जानेवारीमध्ये परराष्ट्रमंत्री म्हणून मी रुमानियाला भेटीसाठी गेलो होतो. हिवाळ्यातील बर्फाच्छादित युरोपचे माझे हे पहिले दर्शन. त्या वर्षी बर्फही काहीसे जास्तच पडले होते. रुमानियाच्या भेटीचा माझा हा शेवटचा दिवस होता. आदल्याच दिवशी 'ब्रशाव्ह' या बुखारेस्टपासून शंभर एक मैलांवर असलेल्या शहरी जाऊन आलो होतो. येताना वाटेत हिवाळी शुभ्र सौंदर्याने नटलेल्या कार्पेथिएनच्या रांगा डोळे भरून पाहिल्या होत्या. या पर्वतराजीच्या कुशीत वसलेल्या एका सुंदर स्थळी, राष्ट्रपतींच्या विश्रामधामी जाऊन, अध्यक्ष चाऊ शेस्की यांच्याशी पुरेपूर दोन तास महत्त्वाच्या चर्चाही झाल्या होत्या. या शेवटच्या दिवशी विदेश-मंत्र्यांची निरोपाची गाठभेट व आमच्यातर्फे द्यावयाचा रात्रिभोज एवढेच काम शिल्लक उरले होते. गेले चार दिवस ओळीने युरोपियन खाना खाऊन कंटाळलो होतो. त्या दिवशी दुपारी राजदूत श्री. कौल यांच्या घरी हिंदुस्थानी 'डाळभात' खाण्याचा आमचा बेत होता. आमचे जेवण चालू असतानाच, अडीच वाजण्याच्या सुमारास टेलिफोनची घंटी वाजली. टेलिफोन घ्यावा, म्हणून श्री. कौल उठून गेले. मीही माझे जेवण संपविले व निवांत हात धूत होतो. तेवढ्यात राजदूत घाईघाईने माझ्याकडे आले व म्हणाले, 'तो बेलग्रेडचा फोन आहे. तेथील कॉन्सल मला काही सांगत नाही. तुमच्याशी प्रत्यक्ष बोलावयाचे, म्हणतो. तुमच्यासाठी काही मेसेज आहे.'

मी टेलिफोन घेतला, तेव्हा त्या कॉन्सलने आपले नाव सांगितले व प्रधानमंत्र्यांचा १७ तारखेचा संदेश हिंदीत वाचून दाखविला. संदेश होता, की त्या संध्याकाळी प्रधानमंत्री लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा करणार आहेत. मला काहीशी कल्पना होती; परंतु खात्री नव्हती. पण आता संदेश ऐकून मनावरचे ओझे एकदम हलके झाले. आणखी दोन देशांचा दौरा करून मला परत जायचे होते. परंतु आता परत जाण्यात औचित्य होते. सार्वत्रिक निवडणुकांना आम्ही कायमचे मुकलो की काय, अशी धास्ती गेले कित्येक महिने वाटत होती, ती नाहीशी झाली. मी माझ्या पत्नीला त्या दिवशी तेथूनच पत्र लिहिले. त्यात म्हटले आहे, की '...बहुतेक सर्व राजबंदी सुटतील व निवडणुकीचे वातावरण प्रस्थापित होईल. धिस् इज अ गेन. हवा मोकळी होईल. आज मी आनंदात आहे.'

... आणि तो दिवस खराच आनंदाचा होता. बुखारेस्ट शहराचे आकाश ढगाळलेले होते. हवा व वातावरण तीव्रतम थंडीमुळे उदास होते. पण तो संदेश ऐकल्यानंतर दिवसभर माझ्या मनात सकाळच्या कोवळ्या उन्हाचा उल्हास होता - एका नव्या, आशावादी दृष्टीने देशाच्या भवितव्याकडे पाहण्याची संधी पुन्हा प्राप्त झाली.