• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

ऋणानुबंध (16)

मित्र-मंडळींबरोबर मी तेथील दिवाणखान्यात शिरत असतानच 'याऽऽ' असे म्हणत नामदार बाळासाहेब खेर आमच्यासमोर येऊन उभे ! मला आश्चर्याचा धक्का बसला. बाळासाहेबांना मी त्यापूर्वी सभेतून चार-दोन वेळा पाहिले होते. परंतु अचानक रीतीने आपण येथे यावे आणि बाळासाहेबांनी मोकळेपणाने स्वागत करावे, या घटनेचा अर्थ मला समजेना.

'हे यशवंतराव चव्हाण.' माझ्या मित्रांनी माझी ओळख सांगितली. बाळासाहेबांनी ती आनंदाने स्वीकारल्याचे माझ्या ध्यानात आले.

'पार्लमेंटरी सेक्रेटरी म्हणून यांना घेण्याचे मी ठरविले आहे !' बाळासाहेबांनी मित्राकडे पाहून माझ्याबद्दल सांगितले आणि 'काय, ठीक आहे ना?' म्हणून माझा अभिप्राय विचारला.

'ठीक... पण घरी जाऊन नंतर कळवतो !' असे काहीसे गोंधळलेल्या मन:स्थितीत मी म्हटल्याचे मला आठवते.

३१ मार्च, १९४६च्या अकरा वाजता झालेली ती बैठक माझ्या लक्षात राहिली आहे. माझे ते हितचिंतक मित्र बाळासाहेबांचे निकटचे स्नेही होते.

बाळासाहेबांचे आश्चर्य बरोबर घेऊन मी मुंबईचा मुक्काम आटोपला आणि कराडला आलो. घरात बंधूंचा आणि मित्रांचा सल्ला घेतला. कोणाचा विरोध नव्हताच. तरीपण दहा-बारा दिवस मला काहीच निश्चित ठरविता न आल्याने मी काहीच कळविले नाही. दहा-बारा दिवस वाट पाहून, 'कधी दाखल होणार?' अशी मुंबईची तार आली. मग मात्र मित्रांनी व घरच्याही लोकांनी आग्रह धरल्याने मला मुंबईस जावे लागले.

१४ एप्रिलला मी मुंबईला आलो. जुन्या सचिवालयात त्या वेळी बाळासाहेबांची कचेरी होती. सचिवालयाची माझी ती पहिली ओळख. कुठे जायचे, कोणाला विचारायचे, याची माहिती नाही. बुजलेल्या मन:स्थितीने, श्री. खेरांच्या कार्यालयाची चौकशी करीत करीत शेवटी त्यांच्या दाराशी पोहोचलो. त्यांच्या (कालांतराने माझ्या) कार्यालयातील नीतिनियमांचे रखवालदार विठ्ठल व महमद चपराशी त्या दारापाशी त्या वेळी उभे होते. मोठ्या अदबीने मी त्यांना, श्री. खेरसाहेबांना भेटण्याची परवानगी मागितली. परंतु श्री. खेर यांच्याकडे कोणी तरी मंडळी आली असून ते कामात असल्याचे समजले. म्हणून मी तेथेच घुटमळत राहिलो. थोड्या वेळानंतर त्यांतलाच एक चपराशी पुढे आला आणि 'तुम्हांला मोरारजींना भेटायचे आहे का? ते एकटेच आहेत', असे सांगू लागला.

श्री. मोरारजींना मी त्यापूर्वी कधीच भेटलो नव्हतो. त्यामुळे थोडा विचार केला. श्री. खेरसाहेब कामातून मोकळे होईपर्यंत मोरारजींना भेटावे, असे एकदा वाटले; परंतु माझे त्यांच्याकडे काहीच काम नव्हते. तेव्हा उगीच कशाला भेटा, म्हणून मी थोडा अडखळलो. तथापि, ठीक आहे, खेर नाहीत, तोपर्यंत मोरारजी, असा विचार करून मी श्री. मोरारजींच्या कार्यालयात प्रवेश केला. १४ एप्रिल १९४६ हा तो दिवस. मी माझी ओळख त्यांना सांगितली मात्र, 'तुम्ही अजून दाखल नाही झाला?' असे एकाएकी श्री. मोरारजी मला म्हणाले. त्याच्याही पुढचे आश्चर्य असे, की 'होम-डिपार्टमेंटमध्ये तुम्ही काम कराल?' असे त्यांनी विचारले; आणि क्षणाचाही विलंब न लावता मी एकाएकी 'हो' म्हणून गेलो. या सर्वच घटना आश्चर्यकारक घडल्या. मला अजूनही असे वाटते, की मी श्री. खेर यांना प्रथम भेटलो असतो, तर कदाचित यापेक्षा काही वेगळे घडले असते. जेवढ्या आकस्मिकपणे माझी पार्लमेंटरी सेक्रेटरी म्हणून नियुक्ती झाली, तेवढीच ही गृहखात्याची नियुक्तीही ठरली.