साहित्याचा समाज-जीवनासाठी आरशासारखा उपयोग होतो, कारण या साहित्यात सर्वसाधारण लोकांच्या सांस्कृतिक, आर्थिक आणि सामाजिक प्रवृत्तीचे प्रतिबिंब सापडते. यातच साहित्याच्या उत्पत्तीचे व जनतेच्या अभिव्यक्तीचे रहस्य दडलेले आहे. हे असे सत्य आहे, की ज्याला समस्त मानवी इतिहासाचा पुरावा देता येईल.
भारतीय संस्कार आणि भाव यांचा अफाट सागर भारतीय जनजीवनात साहित्याच्या रूपाने उसळत आहे. मराठी साहित्य या विशाल सागराचा एक महत्त्वपूर्ण अंश आहे, हे आम्ही विसरता कामा नये. ह्या सागरातील लाटा निराळ्या तटांवर आदळून एका तटाचा विशेष संदेश दुस-या तटाला नेऊन पोहोचवितात. ह्या लाटांचा उठणारा ध्वनी केवळ एका प्रदेशापुरता मर्यादित राहत नाही, तर त्याचा प्रतिध्वनी सा-या देशात उठतो आणि हा प्रतिध्वनी भारतीय साहित्यसागरातही उठलेला आढळतो. आजच्या स्वतंत्र भारतात, भारतीय भाषा त्या लाटांप्रमाणे आहेत, ज्या भारताच्या एकरूपी विशाल सागरात नेहमीच उठत असतात, प्रत्येक लाटेचे सौंदर्य आगळेच आहे आणि तिला स्वतंत्र अस्तित्व आहे; पण या सर्व लाटांचा समावेश शेवटी त्या महासागरातच आहे. ह्या लाटा स्वैर संचार करीत साहित्याला नवीन स्वर देत असतात व त्यातूनच भारतीय साहित्याचे मधुर संगीत निर्माण होते.
आजच्या युगात, आम्हाला अशा संगीताची आवश्यकता आहे, जे एकतेच्या तालावर आम्हाला निरनिराळ्या स्वरांत गाता येईल. भाषांच्या ह्या स्वरांत एक नवे चैतन्य असेल, एक नवे आवाहन असेल आणि एक नवा संदेश असेल. त्यातून आम्हाला नवी शक्ती, नवी प्रेरणा आणि नवी स्फूर्ती मिळेल. असे झाल्यास जीवनात नवे चैतन्य निर्माण होईल आणि भारतातील प्रत्येक भाषा सजीव राहील.
विदर्भ साहित्य संमेलन, १९६४
उद्घाटन भाषण.