१९३० साली राष्ट्रीय चळवळीत उतरलो, त्या वेळी माझ्या मनात काहीशी खळबळ निर्माण झाली होती. एक द्वंद्व उभे राहिले होते. माझ्यासमोर दोन विचारप्रवाह उभे राहिले. त्या वेळी सत्यशोधकांची चळवळही फोफावली होती आणि राष्ट्रीय चळवळीचा फुलोराही फुलला होता. दोन्हींचे आकर्षण निर्माण व्हावे अशी स्थिती होती. तथापि स्वातंत्र्य-चळवळीचा स्फुलिंग प्रखरतेने मनात होता; त्याविषयी अंत:करणात स्थिरता होती; परंतु चळवळीचे स्वरूप कोणते, आपल्या कल्पनेला मूर्त स्वरूप कसे द्यावयाचे, यासंबंधी अनिश्चितता होती. सत्यशोधक चळवळीच्या पाठीमागे असलेली सामाजिक न्यायाची भूमिका योग्य वाटत होती; पण स्वातंत्र्यवादी राजकीय विचार तेथे कसे कोणी बोलत नाही, याची खंत असे - तर इकडे स्वातंत्र्य-चळवळीला सामाजिक, आर्थिक स्वरूपाची अशी एक बाजू असावी, असे मला नेहमी वाटे. केवळ असहकार पुरा पडेल का, असेही मनात येई. आम्ही कराडचे काँग्रेस कार्यकर्ते यासंबंधी विविध प्रकारे चर्चा करीत असू.
१९३० ते ३४ असा तो काळ - आमच्यासमोर त्याच सुमारास समाजवादी वाङ्मय येऊ लागले होते. समाजवादाचा विचार त्या वेळी नवा होता. काँग्रेस-समाजवादी विचारसरणीचा विचार
मांडणा-या कार्यकर्त्यांबरोबरचा माझा संबंधही घनिष्ठ होऊ लागला होता आणि त्याच प्रमाणात इतर पुढा-यांचा माझ्या मनावरील दाब कमी होत चालला होता.
काँग्रेस-अंतर्गत समाजवादी विचारसरणी स्वीकारलेला एक फार मोठा गट त्या वेळी तयार होत असतानाच राजकीय क्षितिजावर एम्.एन्.रॉय यांच्या विचाराची शलाका झळकू लागली होती. माझी या विचाराच्या उमद्या मंडळींशी घसट वाढली. रॉय यांचा विचार त्या वेळी मला अधिक स्वीकारार्ह वाटला. वैचारिक स्थित्यंतराच्या त्या काळात मी खूप ऐकले आणि वाचले.
सातारा जिल्ह्यात त्या वेळी डाव्या विचारसरणीची मंडळीही एकत्र येऊन कार्य करण्याच्या उद्योगाला लागली होती. कै. विष्णुपंत चितळे हे त्यांमध्ये एक प्रमुख होते. ही विचारसरणी समजून घेण्यासाठी मी 'मार्क्स'वादी महत्त्वाचे वाङ्मय वाचून काढले; कै. विष्णुपंतांचा या विषयावरचा अभ्यास सूक्ष्म होता. तासन् तास आम्ही एकत्र बसून चर्चा करीत असू. मार्क्सवादाचे पर्याय समजून घेण्यास या चर्चेचा मला अतिशय उपयोग झाला. कै. चितळे हे तेव्हापासूनचे माझे एक मित्र झाले. आमची ही मैत्री मनाची होती. बेचाळीसच्या आंदोलनात कम्युनिस्ट पक्ष जरी चळवळीपासून अलग होता, तरी विष्णुपंत चितळे आमच्याशी व्यक्तिश: संबंधित होते.
तथापि, या सर्व विचारांतून माझ्या ठिकाणी अद्यापि स्थिरता निर्माण झालेली नव्हती. समाजवादी, रॉयिस्ट आणि म. गांधींवरील श्रद्धा अशा त्रिकोणात मी त्या वेळी उभा होतो; आणि त्यांतले कोणते तरी एक मला निवडावयाचे होते.