• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

ऋणानुबंध (72)

भारताच्या निरनिराळ्या भागांत हिंडून आल्यावर आणि भारतातील विविधता पाहिली, तेव्हा भारत म्हणजे काय, याची मला कल्पना आली. कृष्णा, कोयना आणि गोदावरीच्या तीरांवरील भारत मी पाहिला होता. परंतु सिंधूच्या तीरावरील, लेहच्या परिसरातील भारत, ब्रह्मपुत्रेच्या द-याखो-यांतील भारत, गंगाकाठचा भारत, नागभूमीत पर्वतराजींवर उभा असलेला भारत, राजस्थानच्या मैलोन् मैल लांब पसरलेल्या वाळवंटातील भारत, नर्मदा, तापी व साबरमतीच्या तीरांवरील भारत आणि दक्षिणेत रामेश्वरापर्यंत पसरलेला, नारळ-पोफळींनी शेकारलेला भारत, गोमंतकातील काजूसारखा आटोपशीर भारत, सागराच्या धडका परत फिरविणारा लांबच लांब किना-याचा भारत, असा हा विविधतेने नटलेला भारत पाहिला; डोळे भरून पाहिला. रोमहर्षक काव्य मनात साठविले. देशाटनाने बरेच काही साध्य झाल्याचा प्रत्यय आला. भारताचे वर्णन करणारी पुस्तके पुष्कळ वाचली होती. त्यामुळे भारत जेवढा समजला, त्याच्यापेक्षा किती तरी पटींनी अधिक ज्ञान देशाटनाने मिळाले. दिल्लीला गेल्यानंतर संरक्षणाच्या कामासाठी भारतभ्रमण पुष्कळ करावे लागले, परंतु हे भ्रमण इथेच थांबणार नव्हते. त्यातूनच पुढे जागतिक भ्रमण, पृथ्वीपर्यटन सुरू व्हायचे होते आणि तसे ते सुरू झालेही.

परदेशी जाण्यासाठी भारताचा किनारा प्रथम मी १९६३ मध्ये ओलांडला. संरक्षण-व्यवस्थेच्या सरकारी कामासाठी त्या वेळी रशिया, इंग्लंड आणि अमेरिका या देशांची सफर केली. १९७० नंतरची पाच वर्षे तर दरसाल जगाच्या निरनिराळ्या देशांतून भ्रमण केले आहे. त्या पाच वर्षांत माझी पृथ्वीप्रदक्षिणा झाली. केवळ देशाटनाचेच नव्हे, तर पृथ्वीपर्यटनाचे अनेक अनुभव, अनेक प्रकारची माणसे, त्यांच्या चालीरीती, संस्कृती, इतिहास, राजकारण, साहित्य, कला, संगीत, निसर्गशोभा, जगाचे वैज्ञानिक वैभव, उद्योगाची उभारी अशी पुष्कळ माहिती संग्रहीत झाली. पृथ्वीपर्यटन झाले, तरी पृथ्वीची संपूर्ण माहिती सापडली, असा दावा कोणालाच करता येणार नाही. पुष्कळ माहिती मिळाली, असेच म्हटले पाहिजे.

माझे सर्वच परदेशी प्रवास हे सरकारी कामासाठी म्हणून असत. इंग्लंड, अमेरिका, लॅटिन अमेरिका, रशिया, युगोस्लाव्हिया, इजिप्त, सीरिया, थायलंड, ताश्कंद, मलेशिया, केनिया, लेबनान, सायप्रस, इटली, फ्रान्स, स्वीडन, कॅनडा, रोम, सिंगापूर, सिलोन, बांगला देश, जपान, मेक्सिको, जमेका, कॅरेबियन सी मधील लहान लहान देश, गियाना, हवाना, बहामा, आफ्रिका, पेरू, इत्यादी जगाच्या पश्चिमेकडील आणि पूर्वेकडील अनेक राष्ट्रांत काही महत्त्वाच्या कामांकरिता जावे लागले. विविध देशांच्या प्रवासात असताना, नियोजित कामातून फुरसतीचे जे क्षण सापडतील, त्या वेळी, सामान्यत: तेथील ऐतिहासिक प्रसिद्ध स्थळे, इमारती, सांस्कृतिक जीवन, शिक्षण संस्था, विद्यापीठ, संरक्षणविषयक प्रशिक्षण संस्था, प्रबोधिका, शिल्पकला, वस्तुसंग्रहालये, बुकस्टॉल्स, नाट्यगृहे, वाद्यवृन्द आणि यांशिवाय त्यांच्या जीवनातील जे जे उत्तम असेल, ते पाहण्याचा, त्यांतील बारकावे समजून घेण्याचा मी प्रयत्न केला. या भ्रमंतीत अनेकानेक गोष्टी पाहावयाची संधी मला मिळाली. परदेशांत वर्षानुवर्ष स्थायिक झालेल्या भारतीयांना भेटण्याचा आनंदही मिळाला.