आज मला आमच्या तेव्हाच्या त्या जिद्दीचे केव्हा केव्हा हसू येते. क्वचित कौतुकही वाटते. शंकरराव देवांचा नकार घेऊन साता-याला परतायचे नाही, असे मी ठरविले होते. मी पुण्याहून मुंबईला आलो. आत्माराम पाटलांचे तिकीट जिंकून आणायचे, अशा निर्धाराने मी सरदार पटेलांचे घर गाठले. मरीन लाईन्सवरील आपल्या चिरंजीवांच्या घरी सरदार तेव्हा राहत होते. माझी आणि त्यांची ओळख नव्हती. म्हणजे व्यक्तिगत ओळख नव्हती. काँग्रेस हायकमांडचे एक जबरदस्त नेते म्हणून मी त्यांना ओळखत होतो; पण मला त्यांनी ओळखावे, असा माझा संबंध केव्हा आला नव्हता.
सकाळी मुंबईस उतरल्यावर थेट सरदार पटेलांच्या घरीच मी दाखल झालो.
'मी यशवंत चव्हाण, सातारा काँग्रेसचा कार्यकर्ता...' माझा मीच सरदारांना परिचय करून दिला आणि आत्माराम पाटील यांच्या तिकिटाचे सारे प्रकरण त्यांच्या कानांवर घातले. सातारा काँग्रेसच्या तरुण कार्यकर्त्यांचा आग्रह त्यांना सांगितला. वल्लभभाईंशी मी जवळजवळ अर्धा-पाऊण तास तरी बोलत होतो. त्यांनी माझे सगळे बोलणे ऐकून घेतले.
सरदारांना भेटून मी लगेच सातारला परतलो आणि पाठोपाठ आत्माराम पाटील यांना तिकीट मिळाल्याची बातमीही आली. सरदारांनी प्रदेश काँग्रेसला सांगितले, की प्रदेश काँग्रेसने आपणहून निर्णय घेतला, हे आम्हांला केव्हाच समजले नाही, पण आमचा आग्रह पुरा झाला होता. आमचा उमेदवार उभा राहणार होता. त्याचा आनंद मात्र वर्णनातीत होता.
एकदा आत्माराम पाटील उभे राहिल्यानंतर त्यांच्यासाठी प्रयत्न करण्यात आम्ही कसूर करणे शक्यच नव्हते. निवडणुकीने आम्ही पुरते झपाटलो होतो. एकीकडे ब्राह्मणेतर चळवळीचे खरे उमेदवार, दुसरीकडे लोकशाही स्वराज्य पक्षाचे प्रतिष्ठित उमेदवार यांच्याशी आमचा मुकाबला होता; आणि आम्ही शर्थीने ती लढाई लढविली. माझ्या मंतरलेल्या काही दिवसांत त्या मोहिमेचा काळ नक्कीच समाविष्ट करावा लागेल. दिवस-रात्र निवडणूक-प्रचाराचे व्यवधान असे. मी सायकलवर बसत असे, यावर आज कोणी कदाचित विश्वासही ठेवणार नाही. पण १९३७ च्या निवडणूक-मोहिमेत मी निम्मा जिल्हा तरी सायकलवरून हिंडलो असेन. बहुतेक वेळा सोबतीला जोडीदार कार्यकर्तेही सायकलवर असत. गप्पा मारत मारत एका गावाहून दुस-या गावाला जावे. अनेक वेळा मी एकटाही गेलो होतो. तिथे गावक-यांना जमवावे, ओळखीपाळखी करून घ्याव्यात, काँग्रेसचे ध्येयधोरण समजून सांगावे, असा आमचा कार्यक्रम असे. मध्यरात्रीपर्यंत आमच्या छोट्या छोट्या सभा चालू असत. लाऊडस्पीकर, कलापथके, इत्यादींच्या वापराचा जमाना अजून यायचा होता. प्रौढ-मतदान नसल्याने तेव्हा मतदारही मर्यादित असत. गावातून तेवढी जागृतीही नसायची आणि त्यातून प्रतिष्ठितांच्या शब्दाबाहेर बोलण्या-वागण्याची बंडखोरी गावक-यांत आलेली नव्हती. आम्हाला या सगळ्या अडथळ्यांतून मार्ग काढावा लागला. काँग्रेसचे स्वातंत्र्य-आंदोलन, सत्याग्रहाच्या चळवळी यांचे कुतूहल होते; ते तर आम्ही सांगतच होतो, पण स्वराज्य मिळाल्यावर शेतकरी कसा सुखी होईल, याची चित्रे आम्ही रंगवत होतो. 'सावकारी पाशातून शेतक-यांची मुक्तता' ही आमची घोषणा तेव्हा जास्त कुतूहलाची झाली.

 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
			 
									 
			