असे स्वतंत्र प्रज्ञेचे विचारवंत हे लोकशाहीत आवश्यक असतात. भारतीय लोकशाहीच्या इतिहासात राजकीय विचारवंत म्हणून ज्यांनी त्या त्या काळात निर्भयपणे मतप्रतिपादन केले, अशांत केळकर हे अग्रगण्य होते. सामाजिक क्षेत्रात म. फुले, आगरकर, डॉ. आंबेडकर यांचे जे स्थान आहे, तेच केळकरांचे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आहे. कारण प्रस्थापित मतप्रवाहाच्या उलट्या वा वेगळ्या दिशेने जाण्यात केवळ हट्टीपणाच असतो असे नाही, तर बहुमताच्या धुंदीमुळे इतरांना न दिसणारे पर्यायही अशा अल्पसंख्य विचारवंतांना दिसू शकतात. म्हणून बहुमत हा लोकशाहीचा कार्यात्मक संकेत असेल, तर बुद्धिनिष्ठ अल्पमत सामाजिक विवेकाची राखणदारी करते; आणि दुसरे असे, की एखाद्या देशाचा राजकीय इतिहास म्हणजे काही केवळ विजयी राजकारणी पुरुषाचा इतिहास नव्हे, किंवा सत्तासंघर्षाचाही इतिहास नव्हे; तर समाजाची राजकीय घडण व मशागत करणा-या विचारवंतांचे जीवनही त्याच इतिहासाचा अविभाज्य भाग असतो. म्हणून ब्रिटिशांच्या राजकीय इतिहासात एडमंड बर्कला किंवा अलीकडच्या काळात प्रा. लास्की, किंग्स्ले मार्टिन यांना जे गौरवास्पद स्थान, तेच केळकरांसारख्या राजकीय विचारवंतांना दिले पाहिजे. मग त्यांची मते आपल्याला पटोत वा न पटोत. मला वाटते, केळकरांच्या सर्व जीवनाची ही बैठक आहे, ते त्यांचे तत्त्वज्ञान आहे. हे जर आपण समजून घेतले, तर केळकरांच्या जीवनकार्याचे यथायोग्य मूल्यमापन होऊ शकेल.
केळकरांचे हे जीवनकार्य कोणते? लोकमान्य टिळकांचे विश्वासू सहकारी, त्यांच्या तत्त्वज्ञानाचे मीमांसक आणि टिळकांमागून त्यांच्या निष्ठा सांभाळून राजकारण करणारे पुढारी हा केळकरांच्या राजकीय जीवनाचा आलेख. केळकरांवर अन्याय होण्याचे एक कारण, लोकांनी ते प्रतिटिळक होतील, अशी बाळगलेली अपेक्षा. केळकरांनी आपण प्रतिटिळक होऊ किंवा आहोत, असा कधीच आव आणला नाही. टिळकांचे गुण त्यांच्याजवळ नव्हते, हे त्यांनाही माहीत होते. पण टिळकांवरील त्यांची निष्ठा डोळस होती. त्यात भावनेचा गाभा असला, तरी केळकरांचा पिंड बुद्धिनिष्ठ असल्याने ते अंधभक्त झाले नाहीत. त्यांना राजकीय अंधपणा कधीच आला नाही. त्यामुळे टिळकांच्या राजनीतीची मूलतत्त्वे आत्मसात करून, केळकरांनी आपले पुढचे राजकारण केले. तसे करण्याचा त्यांचा अधिकार होता. पण खरे असे दिसते, की केळकरांचे स्वत:चे जे व्यक्तित्व होते, त्याच्यातूनच त्यांचे पुढचे राजकीय जीवन निर्माण झाले. केळकरांचीच उपमा द्यावयाची झाली, तर इंद्रधनुष्यातला एक रंग संपून दुसरा कोठे सुरू होतो, हे जसे समजत नाही, तसे टिळकांचे राजकीय अनुयायित्व संपून केळकरांचे वैचारिक नेतृत्व कुठे सुरू होते, हे कळत नाही, इतके बेमालूम ते मिसळून गेलेले होते. म्हणूनच केळकर प्रतिटिळक झाले नाहीत, कारण त्यांचे व्यक्तिमत्त्वच भिन्न प्रकृतीचे होते.
ती भिन्न प्रकृती कोणती? तर केळकर बुद्धि प्रामाण्यवादी होते. दुसरे म्हणजे प्रतिपक्षाबद्दल त्यांच्या मनात न्यायबुद्धी असे. दुसऱ्यांच्या म्हणण्यातील तथ्य ते मान्य करीत. तिसरे, ते ऐकांतिक विचाराचे नव्हते, व्यवहारी व मध्यममार्गी होते. या तीन वैशिष्ट्यांमुळे केळकरांचे राजकीय तत्त्वज्ञान नेहमीच विवाद्य ठरले. त्यामुळेच त्यांची चेष्टाही झाली. पण केळकरांची मध्यममार्गावर जी श्रद्धा होती, त्यामागे एक तर त्यांचे त्याला अनुकूल असे सौम्य व बुद्धिवादी व्यक्तित्व होते; आणि दुसरे, अनुभवी व्यवहारवाद होता. केळकरांची ही मध्यममार्गाची विचारशैली अभिनिवेशाच्या दृष्टीने उणी असली, तरी त्यांचा युक्तिवाद प्रभावी असावयाचा. केळकरांनी मध्यमक्रमासंबंधी जे विवेचन केले आहे त्यात म्हटले होते, की मध्यमक्रम म्हणजे निखालस वाइटाशी समेट किंवा तडजोड असा नाही, तर जे सामान्यत: चांगले म्हणून समजले जाते, त्याचीच मर्यादा शोधून तारतम्याने जे युक्त वाटेल, त्याचे आचरण करणे म्हणजे मध्यमक्रम होय. 'सद्गुणाच्या आचरणातही तारतम्याने सुचणारे मर्यादादर्शन' असे त्याचे शास्त्रीय वर्णन केळकरांनी केले आहे.