चरित्रे आणि आत्मचरित्रे
मी साधारणपणे सर्वच साहित्यप्रकार आवडीने वाचीत असतो. अर्थात अलीकडे विषयांची विविधता व ग्रंथांची विपुलता इंग्रजी भाषेत जास्त असल्यामुळे या भाषेतील पुस्तके अधिक वाचण्यात येतात. परंतु वाचनाचा खरा आनंद, जिव्हाळा मराठीतील उत्तम पुस्तके वाचण्यात आहे. जाणत्यांनी शिफारस केलेली व उत्तम परीक्षण आलेली पुस्तके मी मिळवितो व पुष्कळदा खरेदीही करतो. काही लेखक आपुलकीने आपली पुस्तके भेटीदाखलही पाठवितात. अधूनमधून मराठी वाचण्यासाठी दिल्लीतील महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वाचनालयाचीही मदत घेतो. ही वस्तुस्थिती आहे. गेल्या पाच-सहा वर्षांत माझे पुष्कळसे वाचन प्रवासातच होते. प्रवासात नित्याच्या कामाच्या कागदपत्रांच्या वाचनासोबतच साहित्याचे वाचन हा एक उताराच असतो, असे म्हटले, तरी चालेल.
सर्वच पुस्तके अथपासून इतिपर्यंत वाचणे शक्य होत नाही. अर्थात आवडणारी पुस्तके संपूर्णच नव्हे, तर चिंतनपूर्वक वाचतो. सामान्यत: एकाच वेळी माझे चार-पाच त-हेच्या पुस्तकांचे वाचन चालू असते, असे म्हटले, तरी हरकत नाही. गंभीर, विचारप्रधान ग्रंथ, चरित्र वा आत्मचरित्रे, कथा-कवितासंग्रह आणि कादंबरी अशी या प्रवाहाची वाटणी प्रसंगानुसार असते. गंभीर व विचारप्रधान ग्रंथात माझे आवडीचे विषय राजकारण आणि इतिहास हे आहेत. चरित्रे व आत्मचरित्रे मी वाचतो. अर्थात चरित्रनायक कोण आहे, याच्यावर निवड निश्चित अवलंबून असते. विद्यार्थी-जीवनात महापुरुषांची चरित्रे वाचण्यास आम्हांला मुद्दाम सांगितले जाई. केळकरांनी लिहिलेले टिळक चरित्र, अण्णासाहेब लठ्ठे यांनी लिहिलेले शाहू महाराजांचे चरित्र, केळुसकरांनी लिहिलेले शिवाजी महाराज, त्याचप्रमाणे नेपोलियन, मॅझिनी, डी व्हॅलेरा, गॅरिबाल्डी यांची चरित्रे मी विद्यार्थि-जीवनातच वाचली.
याच काळातील एक छोटीशी आठवण सांगितली पाहिजे. योगायोगाने जोतिबा फुले यांचे पंढरीनाथ पाटील यांनी लिहिलेले छोटेखानी चरित्र मी वाचले. ते चरित्र आज, ज्याला चोपडे म्हणता येईल, अशा आकाराचे होते. परंतु या छोटेखानी चरित्रग्रंथाने माझ्या जाणिवेच्या कक्षा रुंदावल्या, हे मला कबूल केले पाहिजे.
बी. ए. ला आम्हांला चरित्रवाङ्मयाचा एक साहित्यप्रकार म्हणून अभ्यास करावयाचा होता. त्या वेळी लिटन स्ट्रॅची लिखित 'क्वीन व्हिक्टोरिया' आणि इतर काही प्रसिद्ध चरित्रे मी अभ्यासिली. चरित्र हा वाङ्मयप्रकार म्हणून वाचण्यातला खरा आनंद या वेळी अनुभवला.