• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

ऋणानुबंध (11)

कराडला त्या वेळी 'केसरी,' 'ज्ञानप्रकाश' व 'नवा काळ' एवढीच वर्तमानपत्रे वाचावयास मिळत असत. अन्नसत्याग्रहाचे काय झाले, हे समजण्यासाठी मी रानातल्या वस्तीवरून रोज दोन-तीन मैल गावात येत असे. कंबरेइतक्या पाण्यातून नदी ओलांडून मी येत असे. त्या वेळी वृत्तपत्र वाचावयास मिळणे हे सहजसुलभ नव्हते. ज्या कोणाकडे वृत्तपत्र येत असेल, त्याच्याकडे जाऊन ते वाचावे लागे. मी रोज तसे करीत असे. क्रांतिकारकांच्या उपोषणाने मी अस्वस्थ झालो होतो. भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांची सर्व शक्ती उपासमारीने संपत आली होती. परंतु त्याहीपेक्षा त्यांच्या नंतर एक महिन्याने उपवास सुरू केलेले जतींद्रनाथ यांस उपवासाने प्रेतकळा आल्याची वर्णने येत होती. एक तर सरकारने शुद्धीवर आले पाहिजे किंवा प्राणाने देह सोडून गेले पाहिजे, अशा अटीतटीने क्रांतिकारकांचा उपवास सुरू झाला होता. वर्तमानपत्रांत त्या वेळी येणारी वर्णने चित्तथरारक होती. का कोणास ठाऊक, परंतु जतींद्रनाथांच्या उपोषणाने मला घायाळ केले होते. शेवटचे वीस दिवस तर जतींद्रनाथांची प्रकृती क्षणाक्षणाला घसरत असल्याचे वृत्त येऊ लागले. धडधडत्या अंत:करणाने मी ते वाचीत होतो. जतींद्रनाथांच्या सुटकेच्या बाबतीत सरकारने धरलेला निष्ठुरपणा यमासही लाजविणारा होता, असे मला वाटे. जतींद्रनाथ हे काही थोड्या घटकांचे सोबती असताना व पंजाब सरकार त्यांना सोडून भावाच्या ताब्यात देण्यास तयार असतानाही त्यांजपासून जामीन घेतल्यावाचून त्यांस सोडू नये, अशी सरकारने अपमानास्पद अट घातली. परंतु या अटीपुढे मान वाकविण्यास जतींद्रांचा भाऊ कबूल नव्हता, दुसरे काही जण जामीन भरण्याच्या तयारीने पुढे आलेही; परंतु स्वत: जतींद्रनाथांचीच जामिनावर सुटका करून घेण्याची तयारी नव्हती. जणू काही इहलोकीच्या बंदिवासातून कायमची सुटका करून घेण्याच्या क्षणाचीच वाट ते पाहत होते !

माझ्या बालमनावर या घटनांचा चिरकालचा परिणाम झाला. देशासाठी देह सोडणारे जतींद्र माझे कोणी जवळचे आप्त आहेत, असे माझ्या मनाने ठामपणे घेतले. बासष्ट दिवस जतींद्रनाथांनी देशासाठी तीळ तीळ आहुती दिली आणि बासष्टाव्या दिवशी लाहोरच्या तुरुंगात भर दुपारी एक वाजता सूर्याला साक्ष ठेवून त्यांनी स्वदेहाची पूर्णाहुती दिली. मातृदेशासाठी झिजून झिजून त्यांनी आत्मार्पण केले.

जतींद्रांचा आत्मयज्ञ ही एकच एक घटना त्या दिवशी सर्वांमुखी होती. वृत्तपत्रांत मी त्या आत्मयज्ञाचे वृत्त वाचले आणि ...

या प्रसंगाने मी भांबावून गेलो. जतींद्रांनी देशासाठी प्राण दिला या घटनेने मला बेचैन केले. काय होते आहे, ते समजेनासे झाले. देहाचे व्यापार सुरू होते; परंतु मनाचे व्यवहार उधळले होते. परमदु:खाच्या खोल गर्तेत मी कुठे तरी पडलो आहे, असे स्पंदन मनात कुठे तरी चालू होते. परंतु कुठे जावे, काय करावे, कोणाला सांगावे, हे काही सुचत नव्हते. बधिर झालेल्या मनाने मी तसाच चालायला लागलो आणि चालता चालता रडायलाही लागलो. मी केव्हा रडायला लागलो हेही मला समजले नाही. गावातली घरे ओलांडून मी पुढे चाललो होतो. ती निर्मनुष्य घरे मला भयाण वाटली. सायंकाळी नदी ओलांडून जाताना नेहमी घरट्याकडे परतताना भेटणारे पक्ष्यांचे थवे मला त्या दिवशी आढळले नाहीत. रानात भिरभिरणारा वारा सुस्तावला होता. झाडेझुडपे स्तब्ध झाली होती. सारे वातावरण कुंद बनले होते. माझ्या मनाचे प्रतिबिंब मला जणू चराचरांत दिसत होते. त्यामुळे तर मी अधिकच व्याकूळ झालो. दिवस संपून गेला होता.