• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

ऋणानुबंध (108)

सत्तेची जाणीव असलेला मध्ययुगीन भारतातील राजा म्हणून शिवाजी महाराजांचे वर्णन करता येईल. राज्य निर्माण करणे म्हणजे भौगोलिक मर्यादा असलेला प्रदेश ताब्यात घेणे; पण सत्ता निर्माण करणे हे त्यापेक्षा मोठे आहे. त्या वेळी भारताचा राजकीय नकाशा भिन्नरंगी होता. अनेक प्रतिस्पर्धी सत्ता होत्या. मोगलांचे प्रचंड साम्राज्य होते. विजापूरची आदिलशाही होती. पोर्तुगीज होते. जंजि-याचा सिद्धी होता. इंग्रजही व्यापारी तळ ठोकून होते. या सगळ्या सत्तापुंजांना तोंड देऊन प्रतिस्पर्धी सत्ता निर्माण करणे हे शिवाजी महाराजांचे ध्येय होते. त्या सर्वांना रणांगणात आव्हान देणे शक्य नव्हते. शिवाजी महाराजांची तेवढी तयारी नव्हती. म्हणून सत्तेचा आधारभूत प्रदेश निर्माण केला. ते हे स्वराज्य. ते लहानसे होते. आजच्या महाराष्ट्रापेक्षा लहान होते. पण त्या सत्तेने दरारा निर्माण केला. सत्ताकारणाची नवी पठडी चालू केली. व्यक्तिनिरपेक्ष राजकारणाचा पायंडा पाडला. दक्षिणेतील सत्ताधीशांना जवळ करण्याचे प्रयत्न केले. शिवाजी महाराजांच्या दक्षिणेतील दिग्विजयाचा अर्थ या दृष्टीने समजून घेतला पाहिजे.

औरंगजेबाला तो अर्थ समजला. मोगल साम्राज्याला ते आव्हान होते. ते आव्हान पुढे सव्वाशे वर्षे टिकले. मराठ्यांच्या उत्तरेतील राजकीय शक्तीचे उगमस्थान हे होते. महादजी शिंदे हे त्याचे अठराव्या शतकातील प्रतीक. पण शक्तिकेंद्र तेच होते; आणि तेही दक्षिणेत. भारतातील राजकारणाचा गुरुत्वमध्य दिल्लीहून दक्षिणेकडे सरकत होता. एखाद्या कल्पनेचे यश-अपशय अनेक पिढ्यांच्या कर्तृत्वावर अवलंबून असते. शिवाजी महाराजांचे मोठेपण ह्या कल्पनेला जन्म देण्यात आणि त्याला आपल्या आयुष्यात यश मिळवून देण्यात आहे. हे त्यांच्या राजकीय प्रगल्भतेचे, प्रतिभेचे, मुत्सद्दीपणाचे उत्तम उदाहरण आहे.
ही कल्पना, शिवाजी महाराज संकुचित धर्मनिष्ठेच्या आहारी गेले असते, तर जमली नसती. तसे असते, तर त्यांनी विजापूरकरांशी सख्य केलेच नसते. 'दक्षिणेची पातशाही आम्हा दक्षिणीयांच्या हाती राहिली पाहिजे', असा आग्रह धरला नसता. दक्षिणेतील हिंदू, मुसलमान राजे एकत्र करावेत आणि दिल्लीच्या सत्तेला आव्हान द्यावे, हा त्यांचा सत्ताकारणातला नवा पवित्रा होता. हिंदुस्थानचे राजकारण बहुकेंद्री होते आणि त्याचा लाभ आपली सत्ता वाढविण्यासाठी, प्रबळ करण्यासाठी घेतला पाहिजे, हे ते राजकारण होते. राजकारणाकडे पाहण्याचा धर्मातीत दृष्टिकोन असल्याखेरीज हे घडले नसते. धर्माचे राज्य याचा अर्थ धर्मवेडाचे राज्य नव्हे, धर्मांधतेचे राज्य नव्हे, ही त्यांची खात्री होती. म्हणून सत्तेच्या खेळीमध्ये त्यांनी धर्म आणला नाही.

पण हे करीत असताना धर्माचे, धर्माच्या मुख्य हेतूचे शिवाजी महाराजांचे भान कधी सुटले नाही. धर्मच्छळ न करता धर्मराज्य म्हणजे नीतिराज्य निर्माण करता येते, हे शिवाजी महाराजांनी सिद्ध केले. उलट, औरंगजेबाने जिझिया कर बसविला, तेव्हा त्याच्या निषेधार्थ त्यांनी जे पत्र लिहिले, त्या वेळी त्यालाच त्यांनी आठवण दिली, की 'तुमचा कुराणावर विश्वास असेल, तर त्यात ईश्वर सर्वांचा आहे, केवळ मुसलमानांचा नाही.' हे सगळे पत्रच शिवाजी महाराजांचे धर्मविषयक धोरण स्पष्ट करणारे आहे. शिवाजीच्या काळी पोर्तुगीजही होते. त्यांची धर्मनीती सर्वश्रुतच आहे. तेव्हा अशा समकालीन धर्माधिष्ठित राज्यांपेक्षा शिवाजी महाराजांचे राज्य वेगळे होते. यातच त्यांचे वेगळेपण आहे, मोठेपण आहे. त्यांनी धर्मस्थापनेची कीर्ती सांभाळली, पण दुस-या धर्माचा छळ न करता.