यशवंतराव चव्हाण यांचे समीक्षा लेखन आणि भाषणे ८९

पुढच्यास ठेव मागचा शहाणा असे आपण साध्या जीवनामध्ये म्हणतो." " माणसाचे मन शिक्षणाच्या संस्काराने अधिक संपन्न केल्याशिवाय समाज ख-या अर्थाने समाज बनत नाही." "ज्यामुळे ज्ञानाचा पाठलाग करण्याची ज्ञानाची सफर पुरी करण्याची शक्ती आणि दृष्टी माणसात निर्माण होते ते शिक्षण होय." अशा कितीतरी म्हणी, वाक्प्रचार, सुभाषिते व कलात्मक सौंदर्ययुक्त वाक्यरचना त्यांनी तयार केल्या. जागोजागी सुभाषितांचा वापर करून वक्तृत्वात एक प्रकारचा वेगळेपणा निर्माण केला. भाषणातील विचारांचा ओघ व विचारांचा आविष्कार यांना अनुकूल असा बदल ते आवाजात करत. त्यामुळे श्रोत्यांवर सहज प्रभाव पडत असे. शिवाय चांगल्या वाक्यांचा उपयोग, विनोद, कोटी, टोला, कोपरखळी यांचाही उत्तम रीतीने वापर केला असल्याने त्यांची भाषणे प्रभावी बनत. शिवाय काळ, वेळ आणि विषयाचे भान ठेवूनच ते बोलत. त्यांच्याकडे समयसूचकता तर होतीच शिवाय हजरजबाबीपणाही होता. १८६५ मध्ये नांदेड येथे भरलेल्या ४७ व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष पु. ल. देशपांडे होते. तर उद्घाटक यशवंतराव होते. आचार्य अत्रेही व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांनी सुरुवातीस भाषण केले. त्या भाषणात उपरोधिक शैलीत ते म्हणाले, "मुंबईहून एवढा मोठा प्रवास करून मी आलो. रस्ते दगड-धोंड्यांनी भरलेले, धूळ तर अवर्णनीय होती. मराठवाड्यातल्या रस्त्यावरील धूळ खात खात येथपर्यंत येऊन पोहोचलो. नामदार यशवंतरावांच्या राज्यात रस्त्याची ही स्थिती...!" यशवंतरावांनी तेवढ्याच मिस्किलपणे असे उत्तर दिले, "आचार्य अत्रे यांनी धुळीची तक्रार केली पण नेहमी दुस-याला धूळ चारणा-याने एकदा तरी स्वत: धूळ खावी ना!"

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळी यशवंतराव पुण्याच्या नाट्यगृहाचे उद्घाटन करण्यासाठी गेले. त्यावेळी पुण्याच्या नगरसेविका श्रीमती भीमाताई दांगट या बांगड्या घेऊन स्टेजवर यशवंतरावांना देण्यासाठी गेल्या व "सूर्याजी पिसाळ चालता हो" म्हणून ओरडल्या.सभेत एकच गोंधळ झाला. गोंधळ शांत झाल्यानंतर यशवंतरावांनी एकच वाक्य उच्चारले व म्हणाले, "इतक्या नाट्यपूर्ण पार्श्वभूमीवर जगातल्या कोणत्याही नाट्यगृहाचे उद्घाटन झाले नसेल." किंवा सोलापूरच्या दयानंद महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला. त्यावेळी ते काही वेळ निस्तब्ध उभे राहून म्हणाले, "विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आता जे काही केलं त्यामुले मला माझ्या कॉलेज जीवनाची आठवण झाली आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही आता जो दंगा केलात त्यापेक्षा दसपटीने मी केला होता." इस्लामपूर येथील राजरामबापू पाटील यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाच्या वेळी अनेक लोकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सांगलीच्या श्री. कडलास्कर यांनी गांधी टोपी यशवंतरावांच्या हस्ते घालावी असा आग्रह धरला, तेव्हा यशवंतराव म्हणाले, "मी कधीच कुणाला टोपी घातली नाही." या ठिकाणी त्यांचा हजरजबाबीपणा दिसून येतो. त्याचप्रमाणे आणखी एक प्रसंग सांगता येईल.  गोहत्ती येथील काँग्रेस अधिवेशनात त्यांनी काही लोकांना त्यांच्या बंगल्यावर जेवायला बोलावले होते. निमंत्रितांमध्ये कलकत्त्याचे एक व्यापारी होते. ते व्यापारी शाकाहारी आहेत हे जेवायला बसल्यावर समजले. जेवताना ते व्यापारी म्हणाले, "जगातील सर्व शक्तीमान प्राणी शाकाहारी आहेत." त्यावर यशवंतराव म्हणाले, "होय, जगातील सर्व उपयुक्त प्राणी शाकाहारी आहेत." व्यापारी पुन्हा म्हणाले, "हे सर्व प्राणी शक्तिमान आहेत कारण ते शाकाहारी आहेत." त्यावर साहेब म्हणाले, " आणि म्हणूनच त्यांच्यावर स्वार होणे सोपे आहे." अशा प्रकारे त्या शाकाहारी माणसाचा अहंकार न दुखावता त्यांनी समर्पक असे उत्तर दिले. यशवंतरावांच्या अशी काही प्रासंगिक संभाषण चातुर्यामुळे त्यांच्याकडे असलेले प्रसंगावधान, वैचारिक समतोलपणा, मिश्किल स्वभाव, चिमटे घेणारा उपहास, उपरोध, प्रसंगावधान, संयमीपणा इ. अनेक गुणवैशिष्टयांचे दर्शन होते. प्रभावी वक्ते म्हणून त्यांचा नावलौकिक होताच. शिवाय प्रतिपक्षावर कठोर उपहास करून, कधी हास्यापद बनवत तर कित्येकांना तिखट-गोड चिमटे घेत अनेकांना खुलवित. पुष्कळांना अंतर्मुख व्हायला लावत. अशा प्रकारे यशवंतरावांच्या भाषणांत विवेक आणि विचारशीलपणा जागोजागी पाहावयास मिळतो.

यशवंतरावांची भाषणे ही प्रेरणादायी व लोकजागृती करणारी अशीच आहेत. त्यांच्या भाषणशैलीबाबत डॉ. भगवान कवठेकर म्हणतात, "ज्ञानेश्वराच्या ओवीत यशवंतराव जीवनाची भव्यता. विशालता आणि दिव्यता बघत असत. तर तुकारामाच्या अभंगात जीवनाचे रूप, स्वरुप आणि आशय ते बघत. शाहिरांच्या पोवाड्यात मराठीचा व मराठयांचा पराक्रम त्यांना नतमस्तक व्हायला लावीत असे पंडितांच्या विद्वत्तेविषयी ते विनम्र होऊन आपला आदर शब्दरुपाने, वक्तृत्वाने व्यक्त करीत असत. वेरूळ अजिंठ्याच्या लेण्यातून दर्शित होणारे कालविश्व त्यांना अभिमानास्पद वाटत असे, तर मराठी लावणीतील मुग्ध शृंगाराला जीवनातील शिवत्वाचा पवित्र स्पर्श झाला असल्याचे त्यांना जाणवत असे."