• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण यांचे समीक्षा लेखन आणि भाषणे-१८ प्रकरण ३

प्रकरण ३ - ललित वाङ्मयप्रकारांची समीक्षा


यशवंतरावांनी सर्वच साहित्य प्रकार आवडीने वाचले आहेत. त्यांची कादंबरी वाचनाची आवड तशी जुनीच आहे. किंबहुना साहित्य वाचनाची आवड कांदबरी वाचनापासून सुरू झाली. हरिभाऊंच्या ऐतिहासिक, सामाजिक कादंब-या, तसेच नाथमाधव व डॉ. केतकर, फडके, खांडेकर, माडखोलकर, साने गुरुजी यांसारख्या श्रेष्ठ लेखकांच्या, कादंबरीकारांच्या कादंब-या त्यांनी वाचल्या. फडक्यांचा प्रत्यक्ष विद्यार्थिदशेत त्यांना सहवास लाभला त्यामुळे आपण त्यांच्या कादंबरीचे भोक्ते होते हेही ते प्रांजळपणे नमूद करतात. साने गुरुजींची 'श्यामची आई' असो की मॅक्झिम गॉर्कीची 'आई' कादंबरी. या कादंबरी वाचनाने त्यांच्या मनाची कालवाकालव होत होती. अशा स्वरुपाचे अक्षर वाङ्मय वाचले की ते स्वत:लाही हरवून जाताना दिसतात.

महाराष्ट्रातील माणसाला राजकारणाबद्दलही जबरदस्त आकर्षण वाटते. माडखोलकरांनी 'राजकारण' हा विषय घेऊन कादंबरी लेखन केले. समकालीन राजकीय विचारांचा व व्यक्तिचित्रांचा निर्देश त्यांच्या कादंबरीमध्ये असे. त्यांच्या पत्रकारितेचा, राजकारणाचा जो प्रदीर्घ अनुभव होता त्याच्या आधारे त्यांनी राजकीय कादंब-या लिहिल्या. यशवंतरावांचा राजकारण हा जिव्हाळ्याचा विषय असल्याने भाऊसाहेबांच्या राजकारण व सामाजिक जीवनावर भाष्य करणा-या कादंब-या त्यांनी वाचल्या. ते म्हणतात, "माडखोलकरांच्या साहित्याचा मी तसा पहिल्यापासूनच वाचक आहे. कादंबरीकार माडखोलकर मी वाचले होते. परंतु त्याहीपूर्वी त्यांचे टीकात्मक लेख मी अगदी पहिल्यापासून वाचीत आलो होतो." भाऊसाहेबांना माडखोलकरांच्या राजकीय कादंब-यांनी एक नवीन दालन उपलब्ध करून दिल्याचेही ते नमूद करतात. तसेच त्यांच्यासारख्या समर्थ राजकीय कादंब-यांची उंची इतर साहित्यिकांनी गाठली नाही असेही ते सांगतात. त्यांच्या 'मुक्तात्मा' या कादंबरीत साहित्याची बांधीलकी आहे असाही ते उल्लेख करतात. अरुण साधूंच्या राजकीय कादंब-याबाबत ते लिहितात, "राजकारणाचे मराठी कादंब-यांतील चित्रण अतिशय अपुरे व फसवे आहे. काही उदाहरणे सांगायची तर अरुण साधूंच्या 'सिंहासन' या कादंबरीत मला प्रचाराचा वास येतो. राजकीय कादंब-या लिहिण्याचा साधूंचा प्रयत्न आहे. पण त्यांचा थाट प्रचारकी आहे. 'सिंहासन' कादंबरीपेक्षा 'रिपोर्टिग' वाटते." यावरून यशवंतरावांच्या विचारांची स्पष्टता तर जाणवते शिवाय त्यांच्या राजकीय कादंब-या त्यांच्या मनाची मुळीच पकड घेऊ शकणार नाहीत हे तितक्याच परखडपणे ते नोंदवतात. 'कोसला', 'जरिला', 'झूल', यासारख्या भालचंद्र नेमाडेंच्या कादंब-या, अनिल अवचटांची 'माणसं' यासारख्या कलाकृतीने आपण अस्वस्थ झाल्याची नोंद ते करतात. मीना जोशी यांची इंदिरा गांधी यांच्या जीवनावरील चरित्रपट कादंबरी, भा. द. खेरांची लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनावरील 'अमृतपुत्र' ही चरित्रपर कादंबरी, तसेच 'हिरोशिमा' ही भा. द. खेरांची हिंदुस्थानच्या परराष्ट्र धोरणाचे चित्रण करणारी कादंबरी आहे. 'सारंग' ही कुमार धनवडे यांची ग्रामीण पार्श्वभूमीवरील ग्रामीण जीवनातील दारिद्रयाचा शोध घेणारी कादंबरी, सारंग नावाच्या बैलाचे चित्र साकारणारी कादंबरी. या आणि यांसारख्या कितीतरी कादंब-यांना प्रस्तावना देऊन, कधी अभिप्राय लिहून कादंबरी या वाङ्मयप्रकाराबाबातची आपली रसिकता त्यांनी नोंदविली आहे. ही त्यांची साहित्य आस्वादकाची भूमिकाच त्यांच्या साहित्य लेखनास प्रेरणादायी ठरली असावी.

कादंबरी कथात्मक वाङ्मयप्रकाराचे विस्तृत रूप आहे असे लक्षात घेता यशवंतराव कादंबरीत जीवनदर्शनाची किंवा सामाजिक समस्येचा तपशीलाची अपेक्षा करतात. कादंबरीतील सौंदर्याचा विचार फारसा न करता आशयाच्या संपन्नतेचा, त्यातील जीवनविषयक मूल्यांचा विचार ते महत्त्वाचा मानतात. वाचकांची वैचारिक आणि भावनात्मक भूक शमविण्याचा प्रयत्न कादंबरीतून व्हावा ही यशवंतरावांची अपेक्षा कादंबरीच्या रचना सौंदर्यापेक्षा विचार सौंदर्यालाच महत्त्व देणारी आहे.