• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण यांचे समीक्षा लेखन आणि भाषणे- ३६

साहित्यिकांनी लिहिलेली बहुतेक आत्मचरित्रे कलात्मक स्वरुपाची असतात. त्यांच्या साहित्यिक व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव त्यांच्या आत्मचरित्र लेखनावर पडलेला असतो त्यांच्या आत्मचरित्र लेखनाला त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे काही फायदे मिळत असतात. यशवंतराव चव्हाण असा साहित्यिकांच्या आत्मचरित्राबद्दल लिहितात, "अत्र्यांचे 'क-हेचे पाणी' साहित्यिक गुणांनी श्रीमंत आहे. पण मला त्यांचे 'मी कसा झालो' हे पुस्तक अधिक आवडले होते. ते अधिक व्यक्तिगत होते. क-हेच्या पाण्यामध्ये आपण एक ऐतिहासिक महत्त्वाची व्यक्ती झालो आहोत ही जाणीव सतत जागी असल्याचे जाणवते, पण हा काही दोष नाही. 'ना. सी. फडके यांचे आत्मचरित्रही मी आवडीने वाचले. ते माझे आवडते प्राध्यापक आहेत. कमलाबाई तर आमच्या वर्गात होत्या. त्यामुळे ते आत्मचरित्र वाचताना काही Nostalgia ची भावना येऊन जाते." यशवंतरावांना अशा साहित्यिकांची आत्मचरित्रे वाचताना अधिक अप्रूप वाटते कारण साहित्यिकांच्या प्रत्यक्ष जीवनात घडलेल्या अनेक अनुभवांचा तो आपल्या साहित्यकृतीत अनेक प्रकारांनी उपयोग करून घेत असतो. त्या अनुभवांना आपल्या मुक्त सर्जशील मनाने आपणास हवा तसा नवा आकार देत असतो.

यशवंतरावांनी साहित्यावर आणि तद्नुषंगाने साहित्यिकांवर जीवापाड प्रेम केले. मराठी साहित्य मोठे झाले पाहिजे. मराठी साहित्य निर्माण करणा-या साहित्यकारांना आपल्या साहित्याच्या कक्षा रुंदावण्यासाठी तशी संधी निर्माण झाली पाहिजे. अशी त्यांची भावना होती. महाराष्ट्र कलेने आणि कलाकारांनी समृद्ध बनावा अशी त्यांची इच्छा होती. कलेच्या आणि कलावंतांच्या अभिवृद्धीसाठी त्यांनी अनेक उपक्रम सुरु केले. कलाकारांना सन्मानाची वागणूक दिली. कधी स्वत: कलाकारांपर्यंत गेले तर कधी कलावंताला सन्मानाने आमंत्रित करून जवळीक साधली. कलाकारांच्या बाबतीत त्यांच्या मनात कसलाही भेद नसे. त्यामुळे कलाकारांबाबत एक प्रकारचा जिव्हाळा निर्माण होत असे. या जिव्हाळ्यातून त्यांनी अनेक कलाकारांची आत्मचरित्रे वाचली. त्यांच्या जीवनातील चढ-उतार जाणून घेतले हंसा वाडकर आनंदीबाई शिर्के, स्नेहप्रभा प्रधान, आनंदीबाई विजापुरे, आनंद साधले, जागीरदार इ. लेखक कलाकारांची आत्मचरित्रे वाचली. यशवंतरावांच्या मते आयुष्यात घडलेल्या घटनांचे सूक्ष्म विश्लेषण करता येणे ज्यांना शक्य होते तेच चांगले आत्मचरित्र लिहू शकतात. "म्हणूनच कलाकारांची आत्मचरित्रे अधिक अंतर्मुख तर राजकीय सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांची आत्मचरित्रे सामान्यत: अधिक बहिर्मुख असतात असा अनुभव येतो त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आत्मचरित्रातून खूप माहिती मिळाली तरी कलावंतांची  आत्मचरित्रे चटका लावून जातात." यशवंतरावांच्या ठिकाणी ते मूलगामी प्रेम होते, जी रसिकता होती त्याची प्रचीती येते. यशवंतराव कलावंतांचे नुसते बोलके चाहते नव्हते तर कलाकारांच्या जीवनातील ठळक ध्येये, आशाआकांक्षा, जीवनातील चढउतार आपणास ठोस स्वरुपात माहीत व्हावेत या इराद्यातूनच त्यांनी आत्मचरित्रे वाचली.

१९७० नंतर बरीच दलित आत्मचरित्रे लिहिली गेली. विशेषत: नवजागृत समाजातून ती निर्माण झाली. नव्या जाणिवा घेऊन उदयाला आलेले साहित्य नवे घाट घेऊन निर्माण झाले. तथाकथित साहित्य प्रकारांचे संकेत, आकृतीबंध झुगारून देऊन दलित आत्मचरित्रे लिहिली गेली. त्या त्या समाजस्तराची शेकडो वर्षे झालेली उपेक्षा कळाली. ती समजावी म्हणूनच ती आत्मचरित्रे लिहिली गेली. साहित्यक्षेत्रातील या नव्या प्रवाहाकडे यशवंतरावांचे लक्ष असे. लक्ष्मण माने यांचे 'उपरा' हे दलित आत्मचरित्र प्रसिद्ध चा प्रशंसापूर्वक उल्लेख येई. एखादे साहित्य आवडले म्हणजे त्या साहित्यिकाची बूजही ते मनापासून राखीत असत.

साहित्यक्षेत्रात एखाद्या विशिष्ट काळात अनेक कारणान विशिष्ट साहित्यप्रकार लोकप्रिय होतो. काही काळ त्याची एक लाट निर्माण होते. अशा काळात उत्साही मंडळी लेखन करत असतात. आयुष्यातील काही विशिष्ट टप्पा ओलांडल्यानंतर शेवटी माणूस अशा ठिकाणी येऊन पोचतो की त्या वेळी थोडे थांबून त्याला आपल्या गतजीवनाकडे वळून बघावेसे वाटते. अशा वेळी "राजकीय, सामाजिक कार्यक्षेत्रातील किंबहुना सार्वजनिक क्षेत्रात भास घेणा-या व्यक्तीने आत्मचरित्र लिहिणे आवश्यक आहे, हे तिचे एक कर्तव्य आहे असे मला वाटते. कारण त्यामुळे ऐतिहासिक महत्त्वांच्या घटनांचे धागेदोरे उलगडणे सुलभ होईल. आपल्याकडे वस्तुनिष्ठ विश्लेषणात्मक इतिहास लेखन व होण्याचे एक कारण म्हणजे अशा सामग्रीचा अभाव, असे मला वाटते." असे यशवंतराव नमूद करतात.