• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण यांचे समीक्षा लेखन आणि भाषणे ९६

भाषणातून त्यांचे सखोल वाचन, मनन आणि चिंतन यांचे प्रतिबिंब पाहावयास मिळते. साहित्य, शिक्षण, माणूसपणाची उभारणी, श्रमशक्ती, संस्कृती, कृषी-औद्योगिक धोरण, सहकार, विज्ञान, संगीत, शेती, संरक्षण, अर्थ, परराष्ट्र धोरण, सामाजिक तत्त्वज्ञान, राजकारण यासारख्यां असंख्य विषयात त्यांनी विचारपूर्वक व्यक्त केलेले चिंतन पाहावयास मिळते. या भाषणातून त्यांनी महाराष्ट्राच्या लोकजीवनाचा आणि लोकसंस्कृतीच्या उन्नयनचा विचार मांडला. शिवाय मरगळलेल्या सामाजिक जाणिवा दूर करण्याचे महत्त्वाचे काम यशवंतरावांच्या भाषणांनी केले आहे. यशवंतरावांची ही भाषणे निबंधांसारखी वाटतात. निबंधाला ज्याप्रमाणे आकर्षित करणारी सुरूवात, सुभाषितांची पेरणी करीत विचारांना दिशा देणारा गाभा आणि वाचणा-याला योग्य दिशा दाखवणारा, विषयाचे सार सांगणारा, विषयाचे तात्पर्य प्रकट करणारा शेवट असतो तशीच यशवंतरावांच्या भाषणांची मांडणी असे. निबंधाचे स्वरुप कोणालातरी बोलल्यासारखे असते, त्यातून लेखख वाचकांशी संवाद साधत असतो. वाचताना नकळत दोघांच्या मनाच्या तारा, विचारांच्या तारा जुळल्या जातात. याच धर्तीवर यशवंतरावांनी सुद्धा श्रोत्यांना व समाजाला आपले विचार सांगितले आहेत. एकूणच त्यांनी मराठी माणसाला स्वत:च्या उज्ज्वल भवितव्याच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रेरणा देणारा विचार मांडला. चांगल्या पद्धतीने आदर्श राष्ट्राची उभारणी करण्याचा मनोदय त्यांनी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला. विविध क्षेत्रांना व्यापून टाकणार कल्पनाशक्ती त्यांच्या यै वैचारिक लेखनातून दिसते.

इतर विषयावर दिलेली भाषणे आशय, आविष्कार, विषय व अभिव्यक्तीच्या दृष्टीने महत्त्वाची असल्याने तीही अभ्यासविषय बनतात. त्यांच्याजवळ प्रतिभा होती. जिव्हाळा होता. भाषणांत कसला दर्प नसे. त्यातून त्यांचे शालीन, नम्र व्यक्तिमत्त्व प्रकट होते. देश, धर्म, संस्कृती आणि महाराष्ट्र हे यशवंतरावांच्या श्रद्धेचे विषय असल्याचे जाणवतात.कलात्मक नवनिर्मितीमध्ये रमलेले यशवंतराव राजकारणी असूनही एक साहित्यिक म्हणून त्यांची वाङ्मयीन कामगिरी दखलपत्र आहे. त्यामुळे राजकारणी विचारवंत लेखक म्हणून मराठी साहित्याच्या इतिहासात त्यांचा कायमचा ठसा उमटलेला आहे.

यशवंतरावांचे प्रासंगिक लेखन हे विभिन्न स्वरुपाचे आहे. सर्व लेखनाचा पोत एकसारखा नाही. हे लेखन स्फुट स्वरुपाचे आहे. या लेखनातूनही मराठी भाषेचा एक नम्र पाईक या नात्याने सामान्य वाचकासंबंधी मनात अत्यंत आदराची भावना ठेवून लेखन केले आहे. या लेखनाचा एकंदरीत विचार करता यशवंतराव चव्हाण यांचे मराठी साहित्यात निश्चित असे स्थान निर्माण झाल्याचे दिसते. ते स्थान निश्चित होण्यासाठी त्यांच्या साहित्यातील एकूण वाङ्मयीन घटक कारणीभूत ठरतात.

यशवंतराव चव्हाणांच्या बहपरिमाणयुक्त व्यक्तित्वाचा वाङ्मयीन मूल्यांच्या दृष्टीने विचार केल्यास त्यांचे साहित्य श्रेष्ठ वाटते. स्वतंत्र शैलीचा एक साहित्यिक म्हणून यशवंतरावांचे स्थान मराठी वाङ्मयात निश्चित होते. या साहित्यिकाची भाषा अलंकारिक काव्यमय असून ललित गद्याच्या जवळपास जाणारी आहे. त्यामुळे त्यांचे साहित्य वाचकांच्या अभिरुचीला मान्य होईल असेच आहे. त्यांचे साहित्य अनुभवाच्या श्रीमंतीबरोबर अभिव्यक्तीच्या सौंदर्याचा आणि सामर्थ्याचा,जीवनमूल्यांचा, कलामूल्यांचा एकाच वेळी प्रत्यय देते. आनंद देते. उद्बोधनही करते. स्थलवर्णन,  प्रवासवर्णन व व्यक्तीवर्णन यांची सुंदर चित्रणे आली आहेत. त्यांच्या लेखनात निसर्गावर आधारित रुपकांची आणि उपमांची विविधता आढळते. त्यांच्या ललितगद्य, आत्मानुभव वृत्ती व समाजहिताची तळमळ जाणवते. त्यांच्या साहित्यामध्ये भावभावांचा हळूवारपणा दिसतो. त्यात कौटुंबिक वात्सल्य, बंधु-भगिनी प्रेम,राष्ट्रप्रेम, शौर्य, विनोद, टिंगल,चेष्टा, अर्थकारण, आत्मानुभव इ. विषय दिसतात. धार्मिक भावभावना व श्रद्धाही त्यांच्या साहित्याचा विषय आहे.  त्यांच्या साहित्यातून पुराणकालीन कथा, साधुसंतांची भक्ती, श्रद्धा निसर्गाची ओढ, मायबोलीवरील प्रेम, सामाजिक आणि आर्थिक जीवनाचे चित्रण, नाविन्याची जाणीव, कौटुंबिक जिव्हाळा, सौंदर्य आणि रसिकवृत्ती यांचाही अंतर्भाव झालेला दिसतो. या सर्व रसायनातून प्रकट होणारा यशवंतरावांचा आविष्कार न्याहाळणे,त्यातून पुढे आलेली अवलोकने नोंदवणे, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या पैलूंचा, त्यांच्या साहित्यिक शैलीचा विचार मांडण्याचा प्रांजळ प्रयत्न केला आहे.