महाराष्ट्राचे भवितव्य
महाराष्ट्र राज्य हा जगन्नाथाचा रथ आहे. या रथास भक्तांचा हात लागल्याशिवाय तो हालणार नही. म्हणजेच महाराष्ट्राचा गाडा जनतेच्या मदतीशिवाय चालणार नाही. महाराष्ट्राच्या सर्वांगीण उन्नतीचे कार्य, दिशा स्पष्ट करताना कार्यकर्त्यांना ते सांगतात, "... महाराष्ट्राच्या भवितव्याची ही मोठीच मोठी, लांबच लांब फार आहे... त्या सफरीतील आम्ही प्रवासी आहोत... ही सफर तुम्हा आम्हाला पुरी करावयाची आहे... ती सफर आज मला माझ्या डोळ्यांसमोर दिसते आहे. विजेच्या प्रकाशाने लखलखत्यासारखी मला दिसते आहे... ती लांबची सफर आहे... पण ती पुरी केलीच पाहिजे... कारण त्यात जनतेचे कल्याण आहे..." यशंतरावांनी महाराष्ट्राच्या भवितव्याची आणि जनसामान्यांची प्रगतीविषयक भूमिकाच भाषणातून व्यक्त केली आहे. त्यांचे हे स्वप्न केवळ राजकीय सत्ता मिळविण्याचे नव्हते. तर समतेसाठी आवश्यक ते समाजपरिवर्तन घडवून आणण्याचे होते आणि खरे लोकराज्य निर्माण करण्याचे होते. कारण ते जे बोलत ते मनापासून बोलत. अस्सल सातारी मराठी भाषेत बोलत. ही भाषा वाटेल तितक्या सोप्या शब्दांमध्ये आणि परिणाम होईल असा त-हेने वापरत असत. म्हणूनच स्वातंत्र्यानंतरचे प्रश्न सामान्यांना त्यांच्या भाषेत आणि कल्पनेत समजावून देत. या गुणामुळेच महाराष्ट्रात कार्यकर्त्यांचे मोहोळ ते उभे करू शकले.
यशवंतरावांनी आर्थिक विकासावर त्यांच्या भाषणातून अधिक भर दिला. आर्थिक प्रश्न सोडविताना ग्रामीण मजूर, भूमिहीन यांचा त्यांनी प्रामुख्याने विचार केला. हे विचार त्यांनी प्रामुख्यने 'पुरोगामी आर्थिक धोरण', 'आमचा आर्थिक पवित्रा', 'नाणे सुधारणा आणि विकसनशील देश', 'अर्थमंत्रिपदाची चार वर्षे ! एक ताळेबंद', 'अविकसित देशाचा आर्थिक विकास', 'औद्योगिक विकासाच्या समस्या', 'तिस-या पंचवार्षिक योजनेच्या उंबरठ्यावर', 'आर्थिक प्रश्नांचे राजकी स्वरुप', 'आर्थिक विकास', 'खेड्यातील सहकार', 'बँकांकडून अपेक्षा', ' छोटे उद्योगधंदे' यासारख्या विषयांतून त्यांनी आर्थिक विषयांचा परामर्श घेतला. छोटे शेतकरी, शेतमजूर व बेकार तरुण यांची त्यांनी गांभीर्याने दखल घेतली. एकूणच देशाच्या अर्थखात्याला पूरक असे वळण लावण्याच्या हेतूने त्यांनी विचार मांडले. ते म्हणतात, "तुलनात्मक दृष्ट्या अविकसित असलेल्या देशांचा त्वरित आर्थिक विकास होणे हे प्रगत देशांच्या हिताचे आहे हे सांगण्याच्या दृष्टीने धोकादायक असते. शिवाय एखाद्या भागाची अर्थव्यवस्था अगतिक व मागासलेली असणे हे आर्थिकदृष्ट्या पुढारलेल्या देशांच्या दृष्टीनेही धोकादायक असते." या देशात आर्थिक समस्या अतिशय गुंतागुंतीच्या आहेत त्या सोडविणे अत्यंत गरजेचे आहे असा विचार त्यांनी अनेक ठिकाणी मांडला. समाजातील प्रत्येक घटकाला समान संधी ही सामाजिक न्यायाच्या कल्पनेतील महत्त्वाची बाब आहे आणि म्हणूनच बुद्धी असूनही केवळ पैशाच्या अभावामुळे तिला वाव मिळत नाही. असे होता कामा नये. असा विचार त्यांनी प्रकट केला. आर्थिक प्रगतीच्या मार्गात बिकट समस्या अडचणी व संकट असल्याचेही ते स्पष्ट करतात. विषमता ही आर्थिक प्रश्नाशी निगडित आहे. म्हणून त्यांनी या विषयावर अधिक भाष्ये केली आहेत. शेती, मनुष्यबळ, नागरीकरण, औद्योगिकरण, लोकसंख्या, जमीनसुधारणा इ. क्षेत्रात प्रगती करावयाची असेल तर मनुष्यबळाचा उपयोग करून आर्थिक सुधारणा करावी असा सल्ला ते देतात. यशवंतरावांचे हे आर्थिक विचारांवरील मत म्हणजे मनन करून, शोधून काढलेले कार्यकारणभावनात्मक ज्ञान असेच आहे. त्यांच्या या मतांचा संबंध मनाशी नसून बुद्धीशी आहे हे त्यांचे या विषयांवरील विचार वाचले म्हणजे लक्षात येते.
भाषणे म्हणजे जीवनभाष्यच
यशवंतराव ग्रामीण संस्कृतीत वाढले पण त्यांनी शहरी संस्कृती आत्मसात केली होती, ती केवळ अध्ययनशीलतेच्या बळावर. त्यांची भाषणे म्हणजे जणू काही जीवनभाष्यच असत. आपल्या भाषणांनी ते हजारोंना मंत्रमुग्ध करत. लाघवी भाषा, मृदू आवाज आणि चपखल शब्दरचना यामुळे त्यांचे भाषण रंगतदार होत असे. १८५० च्या आरपासच्या महाराष्ट्राचे व ग्रामीण भागाचे ते असे वर्णन करतात, "त्या काळी खेड्यापाड्यातून किंवा गावाच्या बाजूने दुपारी आपण गेलो तर काही हालचाल दिसत नसे. सर्व गाव जणू काही झोपल्यासारखे वाटे. शेतीवर जेथे विहीर असे तेथे विहिरीतून पाणी काढल्याचा आवाज क्वचित ऐकू यावयाचा. दुपारच्या उन्हाने थकून भागून गेलेली माणसे आणि जनावरे चुपचाप पडून असायची. पडझड झालेली जीर्ण घरे, मोडकळीस आलेले वाडे आणि तुटलेली शेती हे त्या काळच्या महाराष्ट्रातल्या खेड्यांचे स्वरुप होते अद्यापही थोडीफार हीच अवस्था आहे." अशी रीतीने तत्कालीन महाराष्ट्राचे आणि सामाजिक जीवनाचे वर्णन त्यांनी केले आहे. महाराष्ट्र म्हणजे फक्त सातारा, सांगली, कोल्हापूर असे न मानता बेळगाव कारवार पासून ते दक्षिणेकडून सातपुड्याच्या पर्वतापर्यंत तर पश्चिमेला पश्चिम समुद्राला बरोबर घेऊन उंबरगावच्या सीमेपर्यंत पोहोचला आहे तर पूर्वेला औरंगाबाद-नांदेडच्या पुढे गोदावरीच्या काठाने चांदा-भंडा-याच्या बाजूने जातो, असे महाराष्ट्राच्या चतु:सीमेचे वर्णन ते करतात. एवढेच नव्हे तर महानुभावीय कालखंडात महाराष्ट्राचे 'लीळाचरित्र' या ग्रंथांत जे वर्णन केले आहे त्याचेही उदाहरण ते देतात.