• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण यांचे समीक्षा लेखन आणि भाषणे ७०

शिक्षणाचे मूल्य व मूल्यात्मक शिक्षण

यशवंतरावांनी उच्च शिक्षणाचा दर्जा खालावला आहे याची खंत व्यक्त केली आहे. हा दर्जा खालावण्याला शिक्षक आणि शिक्षणसंस्थांना ते जबाबदार धरतात. हे दोन घटक प्रामाणिकपणे काम करत नाहीत यामुळे दर्जा घसरतो. एकूणच शिक्षणपद्धतीत दोष आहे असे सांगून, ही शिक्षणपद्धती विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करायचे सोडून केवळ पदव्यांचा हव्यास विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण करते. एकदा पदव्या मिळविणे महत्त्वाचे ठरले की शिक्षण, ज्ञान मिळविणे गौण ठरते आणि पदवी मिळविणे महत्त्वाचे. ही पदवी मिळविण्यासाठी निरनिराळे मार्ग शोधले जातात व त्यातून गैरमार्गाचा अवलंब केला जातो. विद्यापीठे, पदव्या देणा-या पेढ्या ठरल्या म्हणजे गुणवत्तेकडे कुणीही लक्ष देत नाही. उच्च शिक्षणाचा दर्जा हे मुख्य कारण त्यांना वाटते. यशवंतरावांनी एकंदरीत उच्चशिक्षणाबाबत तीव्र हळहळ व्यक्त केली आहे. या पदव्या देण्यासाठी रात्रीची महाविद्यालये चालविणे, बहि:शाल पदव्या, पत्रद्वारा प्रशिक्षण देणे हे त्याचे द्योतक आहे. यामुळे खरे ज्ञानदानाचे काम विद्यापीठाकडून होत नाही. म्हणूनच शिक्षणाचा दर्जा ढासळला असावा असे त्यांना वाटते. म्हणून "असत्याकडून सत्याकडे, अंधारातून प्रकाशाकडे, मृत्यूपासून अमृताकडे, घेऊन जाणारे 'ज्ञान हेच अमृत' आहे. तेच तुम्हाला समर्थ बनवेल व समाजजीवनही समर्थ बनवेल." असा विश्वास ते व्यक्त करतात.

मातृभाषेतून शिक्षणाची गरज

शिक्षण समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचते करायचे असेल तर ते मातृभाषेतून द्यावे लागेल. कारण शिक्षण सर्व थरांपर्यंत, सर्व माणसांपर्यंत, सर्व समाजघटकांपर्यंत कधीच पोहोचले नाही. सर्व स्तरांतील, सर्व समाजांतील लोकांना शिक्षण घ्यायचे असेल तर ते मातृभाषेतूनच देणे आवश्यक आहे या मताचा यशवंतराव आग्रह धरतात. महाराष्ट्र राज्य निर्मितीत मराठी भाषेचा सिंहाचा वाटा आहे. मराठीचे माहेर असलेल्या मराठवाड्यातील मराठी भाषिकांच्या विकासाला महत्त्व देतात. मराठी भाषेचा विकास होण्याच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले. मराठी भाषेच्या निर्मितीस चालना दिली, मराठी शुद्धलेखन समितीची निर्मिती केली. 'जास्तीतजास्त लोकांकडून बोलली जाते व जी बोललेली लोकांना समजते ती प्रमाण मराठी भाषा' म्हणून स्वीकारावी असा निर्णयही भाषातज्ञांच्याकडून मान्य करून घेतला. म्हणून ज्ञानभाषा व लोकभाषा एक झाल्यास सर्वसामान्य लोक शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत. पण या भाषेचा विकास फक्त ललित साहित्याच्या संदर्भात होऊन चालणार नाही. निरनिराळ्या वैज्ञानिक व शास्त्रीय माहितीचा ज्यावेळी ती भाषा आविष्कार करू लागले त्यावेळीच तिचा खरा विकास होईल असे ते म्हणतात. साहित्यिकांनी, शास्त्रज्ञांनी, इतिहासकारांनी, विचारवंतांनी या मराठीच्या विकासास हातभार लावावा अशी विनंती ते करतात. ते म्हणतात, "नव्या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचे काम आम्हाला करावयाचे आहे. जुने अमृतासारखे जे शब्द आहेत ते शब्द तर आम्हाला वापरायचे आहेतच, पण तुमच्या आमच्या जुन्या पिढीला माहीत नसणारे अमृतासारखे विचार अजून आपल्याला शोधून काढावयाचे आहेत. नवीन शास्त्रीय विचारांचा, शास्त्रीय ज्ञानाचा एक नवा इमला आपल्याला महाराष्ट्राच्या जीवनामध्ये उभारावयाचा आहे आणि या सगळ्या विचारांचे पोषण करणारे, त्यांना तोलणारे शब्द आणि भाषा तुम्हा आम्हाला निर्माण करावयाची आहे." उच्च शिक्षण हे मातृभाषेतूनच दिले पाहिजे. कारण विद्यार्थ्यांचा सुरुवातीचा काही काळ परकी भाषा शिकण्यात निघून जाईल. म्हणजे इंग्रजी जर राहिली तर ही भाषा ज्यांचा मक्ता आहे त्यांचेच सांस्कृतिक जीवनामध्ये साम्राज्य स्थापन होण्याची शंका ते व्यक्त करतात. म्हणून नवा विचार, नवे रंगरूप घेऊन मराठी भाषा संपन्न बनावी याचबरोबर इतर भाषांचाही ते तिरस्कार करत नाहीत. ते म्हणतात, "उच्च शिक्षण हे मातृभाषेतून असावे की नसावे ? असल्यास त्याची सुरुवात कोठून व्हावी?  माझी स्वत:ची या प्रश्नासंबंधी काही ठाम मते आहेत. मी तीन भाषांचा, ज्याला थ्री लॅंग्वेज फॉर्म्युला म्हणतात याचा पुरस्कर्ता आहे. मातृभाषा, मातृभाषेच्या जोडीला हिंदी आणि हिंदीच्या जोडीला काही काळ तरी इंग्रजी हिंदुस्थानमध्ये राहणे आवश्यक आहे, असे माझे मत आहे." असा विचार 'लोकभाषा हीच ज्ञानभाषा' या विषयावर कोपरगाव येथे के. जे. सोमय्या कॉलेजच्या पायाभरणीच्या वेळी मांडला. मराठीच्या अभिमानापोटी इतर भाषांचा द्वेष न करण्याचाही सल्ला ते देतात. तसेच इतर भारतीय भाषांच्या विकासाला अडथळा होणार नाही यासाठी काळजी घ्यायला सांगतात.