यशवंतरावांचे सखोल वाचन, मनन आणि चिंतन जसे त्यांच्या लेखनातून पाहावयास मिळते त्याचेच प्रतिबिंब त्यांच्या भाषणांतून पाहावयास मिळते. आत्मविश्वास आणि प्रचंड वाचन यांच्या जोरावर एखाद्या विषयावर विचार कसे मांडावेत याचे उत्तम प्रात्यक्षिकच जणू ते इतर वक्त्यांसमोर ठेवत. सर्वसामान्य माणसांच्या हृदयापर्यंत जाऊन पोहोचणे त्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे होते आणि म्हणूनच की काय अत्यंत साध्या, सोप्या, सर्वसामान्यांना कळेल अशा भाषेत भाषण करत. श्रोत्यांची मने भारून टाकणारे चैतन्य, त्यांना स्फुरण चढवणारी ओजस्विता आणि त्यांना सतत प्रसन्न वाटणारे विचार यांनी त्यांचे वक्तृत्व नटलेले असे. या वक्तृत्वात गर्दी खेचून घेण्याचे आणि तिला खिळवून ठेवण्याचे विलक्षण सामर्थ्य होते. या वक्तृत्वकलेमुळे यशवंतरावांना महाराष्ट्रात व भारतात नावलौकिक मिळाला.
यशवंतराव ज्या काळात लहानाचे मोठे झाले त्या काळात उच्च नैतिक मूल्यांनुसार वागणारे आणि त्या मूल्यांचा आदर्श समाजासमोर ठेवणारे अनेक नेते महाराष्ट्राला लाभले होते. ही माणसे मोटी उपक्रमशील होती. देशाबद्दल, संकृतीबद्दल आस्था ठेवून होती. निरपेक्ष देशसेवा करावी, सामाजिक व आर्थिक विषमता दूर करावी, ज्ञानसाधना करावी, पाश्चात्य संस्कृतीचे आंधळे अनुकरण टाळावे, प्रामाणिकपणे व नेकीने जीवन जगावे अशा प्रकारची मूल्ये या लोकांनी त्या काळात लोकांसमोर ठेवली. हीच मूल्ये यशवंतरावांनी स्वीकारली आणि अखेरपर्यंत या मूल्यांचा त्यांनी पुरस्कार केला.
यशवंतरावांनी वक्तृत्वाचा अपूर्व गुण लहानपणापासून जोपासला होता. कराडच्या टिळक हायस्कूलमध्ये शिक्षण घेत असल्यापासून ते निबंध स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धेत भाग घेत असत. इ.स. १९३१ मध्ये पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयाने आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेत यशवंतराव सहभागी झाले होते. या संदर्भात आठवण सांगताना यशवंतराव लिहितात, "विद्यार्थ्याला तेथे आयत्या वेळी विषय देऊन दहा मिनिटे बोलायला सांगत. 'ग्रामसुधारणा' हा विषय देऊन मला बोलायला सांगण्यात आले. माझे भाषण ऐकून परीक्षक खूश झालेले दिसले. त्यांनी मला आणखी दहा मिनिटे वेळ वाढवून दिला. भाषण झाल्यावर सर्वांनी माझे कौतुक केले व त्या स्पर्धेत मला पारितोषिक मिळाले." यशवंतरावांकडे वक्त्याला लागणारे सर्व गुण होते आणि त्यांची जोपासना त्यांनी लहानपणापासून केली. पुढे वक्तृत्व हा त्यांच्या सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग बनला. इंग्रजी, मराठी, हिंदी या तीनही भाषात यशवंतराव भाषण देत असत. ज्या वेगाने ते हिंदी व इंग्रजी भाषा बोलत. पण त्यांचे मराठी वक्तृत्व मात्र असामान्य होते. आपल्या भाषासिद्धीवर, विषय प्रभुत्वावर व वाक्सामर्थ्यावर यशवंतरावांचा प्रचंड विश्वास होता. साहित्य संमेलन, विज्ञान संमेलन, वेगवेगळ्या वाङ्मय महोत्सवाचे अध्यक्ष म्हणून यशवंतरावांनी व्यक्त केलेले विचार वैचारिकदृष्ट्या अभ्यासनीय आहेत. संयमाने बोलणारे, लोकांच्या सद्भावनांना साद घालणारे, लोकाची विचारशक्ती जागृत करणारे, उपरोधाने विरोधकांचे चिमटे घेणारे, स्वपक्षीय कार्यकर्त्यांसमोर उपदेशाचे डोस पाजणारे, विवेक व विचारपूर्वक अशी व्याख्याने म्हणून त्यांचा उल्लेख करावा लागेल.
साहित्य, शिक्षण, माणुसकी, श्रमशक्ती, संस्कृती,कृषी-औद्योगिक धोरण, सहकार, विज्ञान, संगीत, शेती, संरक्षण, इतिहास, सामाजिक तत्त्वज्ञान, अर्थकारण, राजकारण यांसारख्या असंख्य विषयांवर त्यांनी आपल्या भाषणातून विचार व्यक्त केले आहेत. या विचारांतून कर्तबगार, लोकमान्य व चिंतनशील व्यक्तिमत्त्व असणारा व भविष्याचा व्यापक वेध घेण्याची क्षमता असणारा एक विचारवंत म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. यशवंतरावांनी अनेक मोठ्या व्याख्यात्यांची व्याख्याने ऐकली होती.