प्रकरण ५ - जीवननिष्ठ समीक्षादृष्टी
मराठी साहित्य क्षेत्रात यशवंतरावांनी विविधांगी आणि विपुल लेखन केले आहे. आत्मचरित्र, चरित्रलेख, व्यक्तिचित्रे, वैचारिक लेखन या ललित लेखनाबरोबरच त्यांनी समीक्षेच्या क्षेत्रातही मोलाची कामगिरी केली आहे. "मी साहित्य समीक्षक नाही. एक रसिक मराठी भाषक साहित्यप्रेमी आहे." असे यशवंतरावांनी जरी नम्रपणे नमूद केले असले तरी रसिक मर्मज्ञ आणि समतोल टीकाकार हा वाङ्मयीन प्रगतीचा एक महत्वाचा घटक आहे. काव्यानंद व साहित्याचा आस्वाद घेताना यशवंतरावांना पराकोटीचा आनंद होता. काव्याचे आणि साहित्याचे वाचन हा त्यांचा विरंगुळा होता. "राजकारण राहूनही वेळात वेळ काढून साहित्याचा आस्वाद चाखण्याचा मी प्रयत्न करतो" असे ते सांगतात. हे यशवंतरावांचे विचार त्यांच्या साहित्य विचाराच्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानून त्यांची समीक्षाविषयक भूमिका प्रस्तुत मुद्दयात पाहावयाची आहे.
यशवंतरावांनी समीक्षाशास्त्राची मांडणी किंवा ऊहापोह केलेला नसला तरी वेळोवेळी त्यांनी ग्रंथाबद्दल वा कलाकारांबद्दल प्रकट केलेली मते, भूमिका आणि निवडक पुस्तकांना लिहिलेल्या प्रस्तावना म्हणजेच साहित्यातील आस्वादक समीक्षेचा एक आदर्श नमुनाच होय. या प्रस्तावनांचे चिकित्सक मूल्यमापन करणे म्हणजे यशवंतरावांमधील समीक्षकाचा शोध घेणे होय. तसेच त्यांनी प्रकट केलेली भूमिका आणि प्रसंगानुसार त्यांनी व्यक्त केलेली मते समीक्षक म्हणून त्यांचे स्वरुप दर्शवणारी आहेत.
बालपणापासून यशवंतरावांनी केलेल्या चौफेर वाचनामुळेच अभ्यासलेल्या ग्रंथाची आस्वादक समीक्षा करण्याची कुवत यशवंतरावांना लाभली होती. विविध ठिकाणी सभासंमेलनामध्ये त्यांनी जी विधाने साहित्यकृतींबद्दल केली आहेत त्या विधानांमध्ये साहित्यिक गुण तर दिसतात शिवाय रसिक गुणही दिसतात. "साहित्यप्रेमी हा आजच्या लोकशाही युगात एक नम्र समीक्षकच असतो." याची यशवंतरावांना जाणीव दिसते. एवढेच नव्हे तर अशा साहित्यिकांनी निर्माण केलेले साहित्य हे सुद्धा एका अर्थाने जीवनाची समीक्षा आहे, अशी साहित्याबाबत त्यांची धारणा होती.
साहित्यात जीवनाचे प्रतिबिंब असते, ते संसाराचे नुसते चित्र नसते. साहित्य हेच मुळी जीवन आहे. जीवनरसाने ते तुटुंब भरलेले आहे. 'साहित्य निर्मिती करावी, पण खरे म्हणजे जीवनावरचा लोभ सोडू नये, जीवनावरचे प्रेम कायम ठेवावे. जीवनाच्या निरनिराळ्या क्षेत्रांत काम करणा-या सगळ्या माणसांचा नाही म्हटले तरी साहित्याशी संबंध येतो." यशवंतरावांचा साहित्यासंबंधीचा दृष्टिकोन सर्वस्पर्शी होता. म्हणून साहित्य आणि समाजजीवन यांची यशवंतरावांच्या साहित्यविषयक भूमिकेत जाम सांगड आहे. यशवंतरावांना साहित्याचे भव्य, विशाल आणि दिव्य स्वरुप अभिप्रेत आहे. यशवंतराव हे साहित्यप्रेमी आहेत. साहित्यप्रेमी हे सुद्धा लोकशाही युगात एक नम्र समीक्षकच असतात. तीच भूमिका आपल्याकडे घेऊन यशवंतराव वैचारिक प्रवर्तन व प्रबोधनाच्या दृष्टीने मराठी साहित्य समीक्षेकडे पाहतात. साहित्याची अंतिम प्रेरणा मानवी मूल्यांची जाणीव करून देणारी असावी असे त्यांना वाटते. मानवी मूल्यांचा प्रत्यय हीच वाङ्मयाची आपण शेवटची कसोटी मानली तर मानवी मूल्यांची किंवा गुणांची वाढ करणे हे आम्ही आमचे साध्य मानले पाहिजे. अशा प्रकारे समाजाच्या रचनापर्वात साहित्यिकांनी कोणते कार्य करावयास पाहिजे याबाबत यशवंतराव आपली भूमिका मांडतात. साहित्य हे जीवनाच्या कुशीत जन्मते. त्याची निर्मिती जीवनातील शाश्वत सत्याच्या आधारावर झालेली असते प्रत्येक साहित्यकृती ही स्वत:चा असा एक आकृतीबंध साधीत असते. एका व्यक्तिमनाने शब्दाच्या साहाय्याने घेतलेला आपल्या एका असाधारण अनुभवांचा तो शोध असतो. शब्दांच्या साहाय्याने साक्षात करण्याचे काम एक निर्मितीक्षम व्यक्तिमन तेथे करीत असते. त्याचाही ठसा साहित्याच्या भाषेवर उमटलेला असतो. " म्हणून लोकजीवनातून साहित्य निर्माण होते, असे मानण्यात येते. लोकजीवनाचे प्रतिबिंब प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे साहित्यावर पडत असते व त्यावर पुन्हा साहित्याचा लोकजीवनावर परिणाम होतो." असे चक्र चालूच असते असे यशवंतराव सांगतात. ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, तुकाराम वगैरे संतांच्या जीवनाचा व साहित्याचा प्रतिध्वनी आजव्या जीवनात उमटलेला दिसतो. या संतांनी लिहिलेली गीते, अभंग आणि भजने यात लोकजीवनाचे प्रतिबिंब आढळते आणि साहित्यामुळे सर्वसामान्य माणसांना मन:शांती मिळते. म्हणून साहित्याचा आनंद समाजाचा महान ठेवा आहे व तो जास्तीजास्त लोकांना स्वच्छ हवेप्रमाणे उपलब्ध व्हावा असे यशवंतरावांना वाटते. भाषा हे माणसाचे प्रभावी व महत्त्वाचे संपर्क साधन आहे. भाषेमुळे माणूस इतर प्राण्यांपेक्षा वेगळा ठरला आहे. माणसाइतकीच भाषा जिवंत असणे आवश्यक आहे. नैसर्गिक, सामाजिक, राजकीय, पर्यायाने सांकृतिक बदलाबरोबर तिच्यात होणारा बदल अपरिहार्य असतो. किंबहुना बदलाला सामोरे जाणारी भाषाच जिवंत राहू शकते. समर्थ होऊ शकते.