• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण यांचे समीक्षा लेखन आणि भाषणे- ३२

विविध कार्यक्षेत्रातील महनीय प्रवक्त्यांवर यशवंतरावांनी लेखन केले. लेखन विषय विविध थरातले. कार्यप्रांतातले, परिस्थितीतले आणि विचार पातळीतले असे आहेत. हे चरित्र लेखन सलगपणे केलेले नाही. ते प्रसंगानुसार झालेले आहे. लेख, अग्रलेख यांच्या रुपामध्ये विशेषत: अंग भाजून काढणा-या, समाज ढवळून काढणा-या विविध लढ्याच्या वेळी किंवा मृत्यूच्या करुण प्रसंगाच्या निमित्ताने अथवा जयंत्या, पुण्यतिथीच्या, शताब्दी निमित्ताने. त्या त्या प्रसंगी त्या त्या महनीय व्यक्तींचे जे देदिप्यमान दर्शन झाले त्याचा प्रत्यय देण्याचा आटोकाट प्रयत्न यशवंतरावांनी चरित्रलेखनातून केला आहे. तसेच चरित्र या वाङ्मय प्रकाराबद्दलची आपली भूमिका प्रसंगानुरुप व्यक्त केली आहे.

प्रत्येक वाङ्मयप्रकाराला स्वत:चे असे स्वतंत्र लेखन तंत्र असते. चरित्र या वाङ्मयप्रकाराचे स्वरुपही तसे स्वतंत्र आहे. तसा हा वाङ्मय प्रकार उद्बोधक असा आहे. "सत्यपूर्ण व कलात्मक व्यक्तिदर्शन' असे त्याचे स्वरुप असते. द.न. गोखले म्हणतात, " चरित्र म्हणजे एका माणसाच्या किवा जीवनखंडाचा 'वृतान्त' सांगणारी 'कलाकृती' ही माझी प्रथमपासून समजूत होती नि आजही आहे. अर्थात हा वृत्तांत असल्यामुळे जे घडले, जे ऐतिहासिक सत्य आहे, जे प्रत्यक्षात नि वास्तव आहे त्यापासून चरित्रकार मुळीच दूर जाऊ शकत नाही. म्हणजे घटित सत्य हा त्याचा आशय किंवा गाभा असतो. पण चरित्र हा जसा 'वृतान्त' आहे तशीच 'कलाकृती'ही आहे. सर्व वाङ्मयीन कलाकृतींच्या मागे मनुष्यसंबंद्ध जिव्हाळ्याची जिज्ञासा असते.' व्यक्ती हाच चरित्राचा केंद्रबिंदू असल्याने चरित्रातून व्यक्तीच्या भावजीवनाला स्थान मिळते. म्हणूनच म. फुले, म. गांधी, न्या. रानडे, गोखले , लो. टिळक, पं. नेहरु यांसारख्या कृतीप्रवण व्यक्तींच्या चरित्रातून व्यक्ती आणि कृती यांची सजीव एकात्मता पाहावयास मिळते. या राष्ट्रनेत्यांचा संबंध राष्ट्र, समाज आणि संस्कृती यांना नवे वळण देणा-या व्यापक चळवळीशी येतो. म्हणूनच अशा व्यक्तींचे ऐतिहासिक महत्व व व्यक्तिगत जीवन अथवा राजकीय, सामाजिक जीवन जाणून घेण्याच्या जिज्ञासेपोटीच यशवंतरावांना चरित्र लेखनाचा छंद शालेय जीवनापासून लागला.  लो. टिळकांचे चरित्र, त्याचप्रमाणे नेपोलियन, मॅझिनी, डी. व्हॅलेरा, गॅरीबाल्डी यांची चरित्रेही त्यांनी विद्यार्ती जीवनात वाचून काढली होती. या संदर्भात ते लिहितात, "चरित्र वाचनाची आवड मराठीने मला लावली. अगदी लहानपणापासून ती कायम राहिली असे नव्हे तर वाढतच गेली आहे. जिज्ञासेची क्षेत्रे जशी वाढत गेली तशी त्या क्षेत्रांशी संबधित स्त्री पुरुषांच्या जीवनाविषयी औत्यक्य वाढले आणि चरित्रग्रंथाची त्यात आत्मचरित्रे व आठवणीही (मेमॉयर्स) आल्या. आवड कायम राहिली." आपल्या चरित्रविषयक वाचनाच्या काही आठवणींची नोंद यशवंतराव अशा प्रकारे करतात. शिवाय चरित्र वाचनाचे त्यांच्या व्यक्तीमत्त्वावर कसे परिणाम घडत गेले ते ही सांगतात. अशा प्रकारचे ग्रंथ वाचताना ते चरित्र नायक कोण आहे हे पाहूनच निवड करत असत. तशी यशवंतरावांची वाचनाची पद्धत वेगळी होती. साधारण एकाच वेळी ते चार-पाच त-हेच्या पुस्तकांचे वाचन करत असत. गंभीर, विचारप्रधान चरित्र हा वाङ्मय प्रकार ते आवडीने वाचत असत. त्यामुळे जिज्ञासेची क्षेत्रेही वाढत गेली. त्याचप्रमाणे त्या त्या संबंधित स्त्री पुरुषांच्या जीवनाविषयी औत्सुक्येही वाढत गेली. "याच काळातील एक छोटीशी आठवण सांगितली पाहिजे. योगायोगाने जोतिबा फुले यांचे पंढरीनाथ पाटील यांनी लिहिलेले छोटेखानी चरित्र मी वाटले ते चरित्र आज ज्याला चोपडे म्हणता येईल, अशा आकाराचे होते. परंतु या छोटेखानी चरित्रग्रंथाने माझ्या जाणिवेच्या कक्षा रुंदावल्या हे मला कबूल केले पाहिजे." असे यशवंतरावांनी स्पष्टपणे नोंदवले आहे. यशवंतराव नेहमी जुने-नवे एकत्र सांधून भविष्याचा अचूक वेध घेणारे समन्वयवादी द्रष्टे नेते होते. त्यामुळे जगाच्या आणि मानवी जीवनाच्या प्रगतीच्या दृष्टीने थोर पुरुषांच्या कर्तृत्वातला इतिहास पाहणे त्यांना महत्वाचे वाटते. थोर पुरुषांची चरित्रे ही राष्ट्राची बहुमोल संपत्ती असते. अशा व्यक्तींचा आदर्श समोर ठेवून आपण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचा मार्ग चोखाळणे हे सामान्यांचे कर्तव्य असते. म्हणून अशा व्यक्तींच्या कार्याचा, त्यांच्या मार्गांचा, हेतूचा, ध्येयाचा उलगडा होण्यासाठी चरित्र लेखनाचा उपयोग होतो. नव्या पिढीला नैतिक शिक्षणाचे धडे चरित्र लेखनातून मिळतात. थोरांचे असे आदर्श समोर ठेवण्याने सामान्य माणसाचे स्वत:चे व्यक्तिमत्त्व घडविण्यास निश्चित उपयोग होतो, असा त्यांचा विश्वास होता. ते म्हणतात, "चाळीशीनंतर माणसे चरित्र वाचनाकडे वळतात. असे एका सुप्रसिद्ध टीकाकाराने म्हटल्याचे माझ्या वाचनात आहे. आमची पिढी पंधराव्या सोळाव्या वर्षापासूनच या वाचनाकडे वळली होती असे म्हटले तरी चालेल." यशवंतरावांना चरित्रवाचनाची ओढ लागण्याची कारणेही त्यांनी विशद केली आहेत. बी. ए. च्या वर्गात यशवंतराव चव्हाण शिकत असताना त्यांना चरित्रवाङ्मय हा साहित्य प्रकार अभ्यासक्रमात होता. त्यावेळी त्यांनी लिटन स्ट्रची लिखित 'क्वीन व्हिक्टोरिया' आणि इतर काही प्रसिद्ध चरित्रे अभ्यासली होती. तेव्हापासून या वाङ्मयप्रकाराबाबत त्यांच्या मनात ओढ निर्माण झाली ते म्हणतात, "ते दिवस मंतरलेले होते. स्वातंत्र्य चळवळीने आमची मने भारून टाकलेली होती. काही नव्या प्रेरणा घेऊन देशाच्या आकांक्षाची क्षितिजे उंचावणा-या विचारांची झेप असलेल्या एका तरुण नेत्याने जीवन समजून घेण्याची ओढ होती." यशवंतरावांना राजकारण आणि इतिहास हे विषय आवडत. त्यामुळे ऐतिहासिक व्यक्तींची चरित्रे व राजकीय व्यक्तींच्या चरित्रांचा ते मनमुराद आस्वाद घेत असत. मानवी जीवन प्रवाह म्हणजे जुन्याचा बोध नव्याचा शोध आहे. त्यामुळे गतकालीन व समकालीन व्यक्तींबद्दल त्यांच्या मनात कुतूहल असे. या जाणिवेतूनच या लोकांनी काय म्हटले आहे व काय म्हणावयाचे आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता त्यांना लागली होती. त्यासाठीच त्यांनी चरित्र या वाङ्मयाचा उपयोग केला.