• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण यांचे समीक्षा लेखन आणि भाषणे-१२

साहित्य निर्मिती करावी, पण खरे  म्हणजे जीवनावरच लोभ सोडू नये. जीवनावरचे प्रेम कायम ठेवावे. जीवनाच्या निरनिराळ्या क्षेत्रांत काम करणा-या सगळ्याच माणसांचा नाही म्हटले तरी साहित्याशी संबंध येतो. मग हे काम जीवनाच्या कोठल्याही क्षेत्रातले असो शब्दांच्या मदतीशिवाय ते आपणास पार पाडता येत नाही. शब्दांचा वापर करून त्यांच्यामार्फत विचार मांडावयाचा असतो. मग हे प्रकटीकरण कोणी लेखनाद्वारे करील किंवा कोणी वाचेद्वारा करील पण या प्रकटीकरणातूनच शेवटी साहित्यनिर्मिती होत असते."

यशवंतरावांची साहित्याकडे पाहण्याची दृष्टी व्यापक आहे. "साहित्यिक विचारवंतांनी प्रकट केलेले साहित्य कोणत्याही रंगाचे असले तरी चालेल पण आजूबाजूच्या परिस्थितीचा डोळसपणे अभ्यास करून समाजात सर्व थरांत निर्माण झालेल्या अस्वस्थतेची जाणीव असणारे समाजचिंतन त्यात असले पाहिजे." असे चिंतनशील व समाजोपयोगी साहित्य निर्माण व्हावे असे त्यांना वाटते. अशा स्वरुपाचे साहित्य समाजामध्ये परिवर्तन घडवून आणेल असा विश्वास त्यांना होता. तसेच असे साहित्य समाजाला मार्गदर्शन करील, समाजाची कुवत वाढवेल, मने व्यापक करील आणि नव्या जाणिवा निर्माण करील. ज्या साहित्यात अन्यायाविरुद्धची चीड आहे, देशातील आर्थिक, सामाजिक विषमतेच्या, दारिद्रयाच्या प्रश्नाचे विवरण आहे. सामान्य माणसाचे प्रेम आहे आणि ज्या साहित्यात सामाजिक समता आणणारे, समाजातील सर्व घटकांना वाव देणारे लेखन आहे तेच साहित्य खरे साहित्य होऊ शकेल असे यशवंतरावांना वाटे.

मराठी साहित्य हे राष्ट्रीय जीवनापासून अलिप्त राहू शकत नाही हे यशवंतरावांना मान्य होते. राष्ट्रीय आंदोलने आणि सामाजिक चळवळी यांची प्रतिबिंबे मराठी वाङ्मयात अवश्य पडावीत याविषयी त्यांचे दुमत नव्हते. साहित्यिकांचे तत्त्वज्ञान व विचार त्याच्या सामाजिक परिस्थितीवरून ठरत असते. 'माणूस' ख-या अर्थाने भौतिक, सामाजिक परिस्थितीतच घडतो. 'माणूस' हाच साहित्याचा केंद्रबिंदू आहे. आणि या विषयाच्या अनुभूतीतून साहित्य निर्माण झाले पाहिजे आणि साहित्यिकाच्या साहित्य रचनेत समाज मनाचे प्रतिबिंब पडले पाहिजे असे त्यांना वाटते. यशवंतराव साहित्याचे स्वरुप सांगत असतानाच त्या साहित्याचा समाजजीवनासाठी आरशासारखा उपयोग झाला पाहिजे असे मत व्यक्त करतात. लोकजीवन समृद्ध करण्यासाठी साहित्याचा उपयोग व्हावा, ज्ञानाच्या आणि विज्ञानाच्या क्षेत्रात मूलभूत संशोधन करण्यासाठी साहित्यिकांनी पुढाकार घेऊन तशा स्वरुपाची साहित्यनिर्मिती करावी. साहित्य हे संवेदनशील व पारदर्शक असावे या संदर्भात ते म्हणतात, "साहित्य हे थर्मामीटरमधील पा-यासारखे संवेदनशील असते. निदान असावे. समाज मानसामध्ये जे असते तेच साहित्यात अवतरते. मराठी साहित्याचा इतिहास हेच सांगतो." यावरून त्यांच्या विचारांची दिशा लक्षात येते. त्यांच्या साहित्य विचाराचे समाज हेच सूत्र आहे. त्यांच्या सर्वच विचारांमध्ये 'समाज' हा केंद्रीभूत आहे. समाजाभोवतीच त्यांचे सर्व विचार पिंगा घालताना दिसतात. समाजाचे प्रश्न, समस्या, सुखदु:खे सोडविण्यासाठी यशवंतरावा राजकारणाबरोबरच साहित्याचा उपयोग आणि वापर करून घेतात. यशवंतरावांनी समाजकारणाचे साहित्याचे आणि राजकारणाचे एकत्रीकरण केले. त्यांच्यातील राजकारणी समाजाचे, राष्ट्राचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य देतो. समाजाचे अंतिम कल्याण करण्यासाठी झटतो. साहित्यिकानेही समाजाचे प्रश्न मांडावेत. त्यांच्या समोरच्या समस्या चित्रित कराव्यात. साहित्य आणि समाज यांची फारकत न होऊ देता साहित्याने समाजाच्या कल्याणासाठी प्रयत्न करावेत. बंधूभाव वाढविण्यासाठी मदत करावी. ऐक्यभावना वाढीस लावावी. प्रादेशिक भेद संपुष्टात आणण्यासाठी साहित्यिकांनी प्रयत्नशील राहण्याचा संदेश ते देतात. कारण साहित्याचा आणि समाजाचा अतूट संबंध असल्याचे ते सांगतात. तसेच साहित्यिकांची सामाजिक बांधिलकी स्पष्ट करतात. साहित्यिकांनी श्रेष्ठ दर्जाचे साहित्य निर्माण करावे आणि राष्ट्रालाही मोठे करावे असेही त्यांना वाटते.