विरंगुळा - ५९

मुंबई
१२-१२-५५

माझी भूमिका एकदम समजण्यास किंचित अवघड वाटेल. कारण त्याचा पूर्व इतिहास सर्वांना माहीत नाही. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची मागणी मी सोडलेली नाही. परंतु आज ज्या पद्धतीने प्रयत्न चालू आहेत त्यामुळे मुंबई तर जाईलच परंतु महाराष्ट्रातील काँग्रेसही नष्ट होईल असे दुहेरी संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे मला स्पष्ट बोलावे लागले. नेहरू की महाराष्ट्र असा प्रश्न उभा करताना नेहरू ही एक व्यक्ती या दृष्टीने आजच्या भारताचे मूर्तिमंत प्रतीक आहे. राष्ट्रीय ऐक्य आणि आर्थिक समतेचा कार्यक्रम म्हणजे नेहरू या अर्थाने इकडे पाहिले पाहिजे.

मी अत्यंत विचारपूर्वक बोलण्याखेरीज गत्यंतर राहिले नाही. तेव्हा आणि अंतिम महाराष्ट्राच्या हिताचे म्हणून माझे मत मांडले आहे. मराठी वृत्तपत्रांनी सूडबुद्धीने प्रचार चालविला आहे. एक वादळ माझेभोवती उठविले आहे. कदाचित राजकीयदृष्ट्या माझी नाव या वादळात बुडेलही. पण माझी माझ्या विचारावर नितांत श्रद्धा आहे. मी यातून एक पाऊलही मागे घेणार नाही. कारण स्वार्थाचे दृष्टीने मी काही केलेले नाही. असे माझे मत आहे. मला ग्वाही देत आहे.
-यशवंतराव
------------------------------------------------------------
प्रशासकीय क्षेत्रातील बदलाची दखल घेण्यास कोणाचेच चित्त ठिकाणावर नव्हते, शांत नव्हते. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीला अन्य काही पर्याय असू शकतो हे राज्यातील जनतेला मान्य नव्हतं. दरम्यान १९५६ मध्ये द्विभाषिक राज्याचे वारे दिल्लीहून सुटले. ते महाराष्ट्रांत पोचले. तेव्हा महाराष्ट्रात खळबळ उडाली. ६ ऑक्टोबर १९५६ ला मुंबई राज्य विधानसभेचं अखेरचं अधिवेशन सुरू झालं. दिल्लीच्या निर्णयानुसार महाराष्ट्राचं महाद्वैभाषिक राज्य निर्माण करण्याच्या दृष्टीनं घटनेत करायच्या दुरुस्तीस विधानसभेला मान्यता द्यावी लागणार होती. या प्रश्नाच्या चर्चेच्या वेळी द्वैभाषिक मुंबई राज्याचा निर्णय घाईनं करण्यात आल्याबद्दल विरोधी पक्षांनी कठोर टीका केली. दिल्लीकरांनी मोरारजींना विश्वासात घेऊन द्विभाषिकाचा अंतिम निर्णय केलेला नव्हता. त्यामुळे तेही नाराज होते. या निर्णयामागे कोणतंही तत्त्व नाही आणि हा निर्णय लोकशाही विरोधी आहे असं श्री. एस. एम. जोशी यांनी मत व्यक्त केलं. घटना दुरुस्तीवर विधानसभेत तीन दिवस उलटसुलट चर्चा झाल्यावर अखेरीस ता. ९ ऑक्टोबरला १४४ अनुकूल विरुद्ध २७ असं मतदान होऊन विधानसभेत घटनेत करायच्या दुरुस्तीला अखेर मंजुरी दिली.

हे सर्व सव्यापसव्य झाल्यानंतर ता. १६ ऑक्टोबरला जुन्या मुंबई राज्यातील सौराष्ट्र, कन्नड, वऱ्हाड, मराठवाडा इथल्या आमदारांची संयुक्त बैठक होऊन, यशवंतरावांच्या नेतृत्वावर ३३३ मतांनी शिक्का मोर्तब करण्यात आलं. नेतेपदाच्या शर्यतीतून मोरारजींनी माघार घेतली. दुसरे प्रतिस्पर्धी श्री. भाऊसाहेब हिरे १११ मतं मिळाल्यानं ते पराभूत झाले.