विरंगुळा - ५१

आता आज रात्री पुनर्रचनेच्या ठरावावर चर्चा होईल त्यावेळी ते कदाचित बोलतीलही असे वाटले. या शहीद नगरात पोहोचल्यापासून 'थंडी'चा अक्षरश: अनुभव घेतला. जवळची होती ती सर्व पांघरुणे घेऊन व शेजारी शेगडी ठेवूनही पहिल्या रात्री मी येथे ओळीने तासभर निवांत झोपू शकलो नाही. पत्र्याच्या झोपडीत आम्ही रहातो आहोत. रात्री बारानंतर पत्रे इतके थंड होतात की जणू बर्फच. मुंबईत राहाणाऱ्या लोकांना या थंडीचा अर्थच कळू शकणार नाही.

एक दिवस शहर फेरफटका मारला. शिखांचे 'सोन्याचे' मंदिर पाहिले. तांब्याच्या पत्र्यावर सोन्याचे पाणी दिलेले आहे. सभोवताली विस्तीर्ण तलाव आहे. त्यामुळे वातावरण प्रसन्न असते. 'जालियनवाला' बागही पाहिली. बाकी येथे प्रेक्षणीय असे काही नाही. पाकिस्तानची हद्द येथून १०-१५ मैलावर आहे. लाहोर येथून फक्त ३० मैल आहे. भाकरा-नानगल पहावयास जाण्याचा विचार बहुधा मला सोडावा लागणार असे दिसते. उद्या रात्री येथून निघावे लागेल. फ्राँटियरने मेलने नंतर पुढे मुंबईकडे.
------------------------------------------------------------

श्रीनगर (स्टेट गेस्ट हाऊस)
५ जून १९५६
 
प्रिय वेणूबाईस,

आज ५ जूनला (१९५६) दुपारी एक वाजता येथे पोहोचलो. मुंबईहून दिल्लीपर्यंतचा प्रवास नेहमीप्रमाणे छान झाला. मानसिक विश्रांती त्या मानाने कमी मिळाली. ज्यावेळी मी मुंबई सोडली त्यावेळचे मुंबईचे वातावरण अस्वस्थ करणारे होते. निराश मन:स्थितीतच मुंबई सोडली. एका अर्थाने मी दूर जात होतो हेही बरेच होते. दृष्टिआड सृष्टी झाली म्हणजे किंचित काल का होईना विस्मृतीच्या सहाय्याने मनाची विफलता कमी होण्यास मदत होते.

दिल्लीहून रात्री ९॥ वाजता गाडी होती. उशिराच सुटली. सकाळी ६॥ ला पठाणकोटला पोहोचलो. पठाणकोट हे हिंदुस्थानातील उत्तरेकडील रेल्वेने शेवटचे स्टेशन आहे. फाळणीपूर्वी हे एक अगदी अप्रसिद्ध असे पंचवीस-तीस हजार वस्तीचे तालुका ठिकाण होते. पाकिस्तानच्या जन्मानंतर काश्मीरमध्ये शिरण्याने सर्वच महत्त्वाचे ठरले. पश्चिम पंजाबमधे गेले; त्यामुळे पठाणकोटला आज काश्मीरच्या प्रवेशद्वाराचे महत्त्व आले आहे. या गावची लोकसंख्या आता सुमारे सव्वा लाख आहे. बऱ्यापैकी लष्करी विमानतळ आहे. दोन-तीन तास स्टेशनच्या वेटिंगरूममध्ये काढले. या ठिकाणचा उन्हाळा ही भयंकर गोष्ट आहे. उत्तरेकडील उन्हाळा पाहिला म्हणजे हे लोक कसे दिवस काढतात याचेच आश्चर्य वाटते.