१९५२ च्या निवडणुकीत यशवंतरावांना अपेक्षेप्रमाणे यश मिळाले आणि नंतर मोरारजी देसाई यांच्या मंत्रिमंडळात ते पुरवठा खात्याचे मंत्री झाले. यानंतरच 'विरंगुळा' या पुस्तकाची खरी सुरुवात होते. १९५३ मध्ये यशवंतरावांनी वेणूताईंना मुंबईत आणले. मात्र मंत्री म्हणून यशवंतरावांना सतत दौरे करावे लागले. त्यावेळी आधीच्या सवयीप्रमाणे पत्राद्वारे वेणूताईंशी संवाद करीत. सुरुवातीच्या पत्रामध्ये त्यांनी वेणूताईंना लिहिले आहे –
'तू आजारातून बरे व्हावेस याच्याइतकी प्रिय गोष्ट माझ्या आयुष्यात उरलेली नाही. तुझ्याकरता नव्हे, पण निदान माझ्यासाठी तुला बरे होणे जरूर आहे.' यापुढील सर्व पत्रांमधील राजकीय भागच रामभाऊ जोशी यांनी उदधृत केलेला आहे. आणि ते उचित आहे.
१९५२ च्या सप्टेंबर महिन्यात इंदूरला झालेल्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या बैठकीचे वर्णन यशवंतरावांनी फार मार्मिकपणे केलेले आहे. मौलाना आझाद यांनी संयुक्त राष्ट्रसंघासंबंधी बोलताना, त्या संघटनेसंबंधी फार आशा नसली तरी शांतताप्रिय भारताला यूनोतच राहणे कसे आवश्यक आहे हा युक्तिवाद ढंगदार भाषेत कसा केला हे या पत्रात सांगितले आहे. राजप्रमुखपद रद्द करण्यासंबंधीचा ठराव चांगल्या रीतीने मांडला गेला. पं. नेहरूंच्या खुलाशानंतर हा तात्त्विक ठराव मागे घेतला गेला असला तरी पंडितजींच्या भाषणातील भूमिका आपल्याला पटली नव्हती हे यशवंतरावांनी स्पष्टपणे लिहिले आहे.
गांधीजींचे शिक्षण ज्या राजकोटमध्ये झाले त्या राजकोटला गांधी जयंतीला यशवंतराव गेले असताना तेथील 'रचनासमिती'त एक हजार स्त्री-पुरुष चरख्यावर सूत काततांना त्यांनी पाहिले तेव्हा गांधीजींच्या विधायक कार्याची आठवण होऊन 'आजचा दिवस माझ्यासाठी एक चांगला शिक्षणाचा दिवस होता' असे त्यांनी लिहिले. या पत्रात, ढेबरभाईंचे व्यक्तिचित्र यशवंतरावांनी पुढील तीन चार वाक्यांमध्ये बहारीने रेखाटले आहे. ''अत्यंत विनयशील आणि मृदू स्वभावाचे असे हे गृहस्थ आहेत. आपला मुद्दा सहजासहजी न सोडण्याइतके कणखरही दिसले. मनुष्य स्वभावाची पारख करण्याची धूर्तता असली पाहिजे. परंतु हा गुण कोणाच्या लक्षात येऊ नये याची ते काळजी घेत आहेत की काय असे वाटण्याइतके शब्द मोजून-तोलून धिमेपणे बोलणारे 'गृहस्थ' आहेत.'' अमेरिकेला डॉ.जिवराज मेहतांच्या घरातील जुन्या पिढीतील साधीसुधी माणसे, जिवराज मेहतांच्या पत्नी हंसाबेन आणि त्यांच्या घरात नुकतीच आलेली अमेरिकन सून यांच्या एकत्र कुटुंबाचे मनोरंजक वर्णन यशवंतरावांनी थोडक्यात केले आहे.
१ जानेवारी १९५३ पासून पुढे 'विरंगुळा' मध्ये यशवंतरावांनी वेणूताईंना लिहिलेली काही पत्रे आहेत. आणि त्यांनी केलेल्या नोंदी अधिक आहेत. या सर्व नोंदी राजकीय संदर्भ म्हणून महत्त्वाच्या आहेत.