विरंगुळा - १८

नांदी भैरवीची

संकल्पपूर्तीचं आव्हान स्वीकारणं आणि संकल्पसिद्धीच्या आड येणाऱ्या संकटांचं, समस्यांचं निराकरण करणं, त्या सोडविणं म्हणजेच जीवनविकास. यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनात एकामागून एक अशा अनेक संकटांची, कठीण समस्यांची मालिका लागलेली आढळते. त्या समस्यांचे बंध तुटण्याची मालिकाही दिसते. अगदी जन्मापासूनची ही मालिका आहे.

ज्यांच्या जीवनाचा बोध घ्यावा, महत्ता आजमावण्याचा प्रयत्न करावा अशा आधुनिक भारतात निरनिराळ्या प्रदेशात वैशिष्ट्यपूर्ण स्थान प्राप्त झालेल्या ज्या अनेक व्यक्ती आहेत त्यांपैकी थोड्या व्यक्ती अशा आहेत की, त्यांच्या जीवनात वर्तमान युगाचा मथितार्थ सूचित होतो. वर्तमान युगाच्या प्रेरणा, ध्येयवाद, स्थित्यंतरे आणि महत्त्वाच्या घडामोडी यांचा अन्वयार्थ उमटलेला असतो अशा थोड्या व्यक्तींपैकी यशवंतराव हे एक आहेत. विसाव्या शतकातील विचारवंतांनी, व्यासंगी अभ्यासकांनी, लेखकांनी यशवंतराव चव्हाण यांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी असा अभिप्राय नोंदवून ठेवलेला आहे.

एका घटनेमागून दुसरी घटना होत जाणे हेच जीवनाचे स्वरूप असते. व्यक्ती जीवनाप्रमाणेच सामाजिक आणि राष्ट्रीय जीवनालाही ही गोष्ट लागू आहे. एका घटनेमागून दुसरी घटना होणे म्हणजे इतिहास नव्हे. काही विशिष्ट घटना किंवा घटनांची मालिका इतिहास या संज्ञेस प्राप्त होतात. काही घटना महत्त्वाच्या असतात, काही नसतात. समाजात किंवा राष्ट्रात गुणात्मक, अर्थपूर्ण, वैशिष्ट्यपूर्ण होणारा बदल म्हणजेच इतिहास होय. इतिहास घडतो तो अशा घटनांच्या मालिकांमुळे घडतो. यशवंतराव इतिहासाचा विषय घडला तो वैशिष्ट्यपूर्ण घटनांतून त्यांनी आयुष्यभर जी वाटचाल केली त्यातून घडला.

यशवंतरावांची जन्मकथा ही पहिली घटना! सातारा जिल्ह्यातील (पूर्वीच्या) 'देवराष्ट्र' या खेड्यात मामाच्या घरात त्यांचा जन्म झाला. आई विठाबाई यांचा जीवनमरणाचा झगडा म्हणजे या मुलाचा जन्म. प्रसूतीतून आईची लवकर सुटका झाली नाही. विलक्षण कठीण समस्या निर्माण झाली. अर्धीअधिक रात्र उलटली तरी खेड्यातील अनुभवी सुइणींना प्रसुती घडविण्यात यश आले नाही. विठाबाई बेशुद्ध झाल्या. खेड्यात डॉक्टर, वैद्य कोणी नाही. शहर बारा-पंधरा मैल दूर. बैलगाडी हे एकच वाहन. घरात वृद्ध आजी होत्या. त्यांनी सागरोबाला हात जोडले. सागरोबा हे देवराष्ट्रचं देवस्थान. सोरटी सोमनाथचे बारा ज्योतिर्लिंगाचे स्थान म्हणजे सागरोबा, ही देवराष्ट्रवासियांची श्रद्धा. आजीनं सागरोबाला साकडं घातलं. विनवणी केली की माझ्या हाताला यश दे, तुझं नांव घरात कायम राखीन! आजीची तळमळ सागरोबापर्यंत पोहोचली असावी. विठाबाईची सुटका झाली. आजीनं सागरोबाला वचन दिलं होतं. सागरोबानं हाताला यश दिलं म्हणून मुलाचं नाव ठेवलं 'यशवंत'. जन्मवेळी संकट आलं आणि मागोमाग संकटांचे बंधही तुटले.