विकसनशील राष्ट्रांच्या प्रश्नांबाबत यशवंतराव सहानुभूतीचा दृष्टिकोन बाळगणारे होते. विकसित राष्ट्रांच्या व्यवहारात आणि वागण्यात, भारताच्या दृष्टीनं अनुकूल बदल घडवून आणण्यासाठी ते प्रयत्नशील राहिले. भारत-अमेरिका, भारत-रशिया, भारत व मध्यपूर्वेतील राष्ट्रे, भारत-पाकिस्तान, भारत-बांगला देश आणि भारत-चीन यांच्यातील राजनैतिक संबंध सुधारावेत आणि ते दीर्घकाळ टिकून राहावेत यासाठी अलिप्ततेचं धोरण कायम ठेवून त्यांनी मोठ्या मुत्सद्देगिरीनं पावले टाकली. शेजारी राष्ट्रांशी हार्दिक संबंध निर्माण करून समाजवादी देशांशी सहकार्य करणे हे जागतिक प्रश्नांचा उलगडा होण्याच्या दृष्टीनं महत्त्वाची परराष्ट्रनीती ठरली आहे. अविकसित देशांशी राजनैतिक आणि आर्थिक सहकार्य राखणे आणि साम्राज्यशाही, वसाहतवादी धोरणाविरुद्ध जी शक्ती असेल तिच्याशी भागीदारी असणं भारताच्या परराष्ट्र नीतीमध्ये अनुस्यूत आहे. जागतिक शांतता हे भारताच्या परराष्ट्र नीतीचं महत्त्वाचं सूत्र आहे. ही सूत्रं समोर ठेवूनच यशवंतरावांनी स्नेहाचे संबंध प्रस्थापित केले.
यशवंतराव १९६२ साली दिल्लीला पोहोचले ते चीनशी युद्धभूमीवर सामना करण्यासाठी! परंतु एक दशक उलटून गेल्यानंतर यशवंतरावांच्याच हातानं या दोन देशांच्या मैत्रीची निरगाठ बसावी यासाठी अनुकूल प्रक्रिया सुरू झाली. राष्ट्राच्या आणि व्यक्तीच्या जीवनांत योगायोग म्हणतात तो हा!
परराष्ट्र-व्यवहार खात्याची सूत्रं त्यांनी १९७४च्या ऑक्टोबरमध्ये स्वीकारली आणि लगेचच कामावर कबजा प्रस्थापित केला. त्यांच्या परदेश दौऱ्याचा प्रारंभ नोव्हेंबर महिन्यात झाला. १७ नोव्हेंबरला ते श्रीलंका भेटीसाठी गेले. ३ डिसेंबर ते १० डिसेंबर अशी बांगला देशास भेट दिली. या दोन्ही राष्ट्रांमधील मैत्री राजनैतिक पातळीवर घट्ट बनविण्याचं काम पहिल्या दोन महिन्यातच केलं. त्यानंतर १९७५च्या जानेवारी महिन्यांत युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष मार्शल टिटो यांच्याशी चर्चा करण्यासाठी १९ जानेवारीला गेले. मार्शल टिटो हे पाश्चिमात्य जगातले एक समर्थ राजकारणी मुत्सद्दी मानले जात असत. संपूर्ण १९७५ सालात त्यांनी आठ वेळा परदेश दौरे करून जगातल्या मुत्सद्यांशी विविध प्रश्नांच्या संदर्भात चर्चा केल्या. गियाना, क्युबा, जमेका, मेक्सिको, लेबनान, इजिप्त, पेरू-अमेरिका, युरोप-अमेरिका आणि वर्ष अखेरीपर्यंत अफगाणिस्तान, इराक, कुवेत, बहारीन, फ्रान्स या देशांचा दौरा करून मुत्सद्यांशी वाटाघाटी केल्या. त्यांचं हे देशाटन १९७७ सालापर्यंत होत राहिलं. यशवंतरावांचा मुत्सद्दीपणा, राजनीती, राजकीय चातुर्य जागतिक पातळीवर प्रस्थापित करणारा त्यांच्या राजकीय आयुष्यातील हा कालखंड होय.